फोर्ड करणार नाही कार्सचे उत्पादन
पीएलआय योजनेतून घेणार माघार
वृत्तसंस्था /चेन्नई
अमेरिकेतील कंपनी फोर्ड यांनी भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीबाबतची योजना गुंडाळली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. यापूर्वी सदरच्या कंपनीने भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करण्याची योजना आखली होती आणि या निर्मिती केलेल्या वाहनांना विदेशात विक्री करण्याचेही नियोजन कंपनीने केले होते. मात्र सदरची योजना आता फोर्ड कंपनीने मागे घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. सदरच्या निर्मिती प्रक्रियेकरिता सवलत मिळावी यासाठी फोर्डने सरकारच्या पीएलआय योजनेकरीता अर्जही केला होता. परंतु सदरचा अर्ज आता मागे घ्यावा लागणार आहे. भारतातच कार निर्मितीच्या प्रक्रियेसाठी 20 कंपन्यांनी योजनेच्या लाभासाठी अर्ज केला होता. यामध्ये फोर्ड कंपनीचाही समावेश होता. कंपनीच्या भारतातील व्यवस्थापनाने चेन्नईतील कारखान्याच्या कर्मचाऱयांना याबाबतची स्पष्टता दिली असल्याचेही समजते. याचाच अर्थ फोर्ड आता भारतामध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक नाही असाच घ्यायला हरकत नाही.
असा निर्णय का घेतला ?
कंपनीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कंपनीने हा निर्णय घेतला असला तरी त्याबाबत आता चर्चा रंगू लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अपेक्षित वाहन क्षमतेचे उत्पादन घेण्यामध्ये अडथळा येण्यासोबतच अंतर्गत उद्दिष्टे साध्य होऊ शकणार नाहीत अशी भीती व्यक्त झाल्याने फोर्डने निर्णय मागे घेतल्याचे समजते. म्हणूनच सदरच्या कार उत्पादनाच्या प्रक्रियेची योजना कंपनीला गुंडाळावी लागली आहे. लवकरच कंपनी गुजरात आणि चेन्नईमधील आपला कारखाना अन्य कंपन्यांना विक्री करू शकते असेही सांगितले जात आहे. सध्याला दोन्ही कारखान्यांमध्ये कारचे उत्पादन होत नसल्याची बाबही स्पष्ट झाली आहे.