For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बदलीची सक्ती! कोण देणार मुक्ती?

11:17 AM Apr 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
बदलीची सक्ती  कोण देणार मुक्ती
Advertisement

शहर-उपनगरातील 4 टक्के शिक्षकांच्या होणार बदल्या : कागदपत्रांसाठी धावपळ

Advertisement

बेळगाव : शिक्षकांच्या सक्तीच्या बदली प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. ज्या शिक्षकांनी शहर व उपनगरांमधून अधिककाळ सेवा दिली आहे, त्यांची इतर तालुक्यांमध्ये सक्तीची बदली केली जाणार आहे. या बदली प्रक्रियेतून सूट मिळविण्यासाठी शिक्षकांची गटशिक्षणाधिकारी व जिल्हाशिक्षणाधिकारी कार्यालयात मागील चार दिवसांपासून धावाधाव सुरू झाली आहे. काही वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शिक्षण विभागाने सक्तीची बदली प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. चार दिवसांपूर्वी बदलीला पात्र असलेल्या शिक्षकांची तात्पुरती यादी जाहीर करण्यात आली. बेळगाव शहरात 700 हून अधिक सरकारी शिक्षक आहेत. मराठी, कानडी व उर्दू माध्यमांमध्ये मुख्याध्यापक, सहशिक्षक, विषय शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. यापैकी 4 टक्के शिक्षकांची इतर तालुक्यांमध्ये सक्तीची बदली केली जाणार आहे.

यांना मिळते सवलत...

Advertisement

शिक्षक अथवा त्यांची पत्नी किंवा अपत्य यांना गंभीर प्रकारचा आजार असल्यास, अपत्य दिव्यांग असल्यास, विधवा आणि विधूर, सैनिकाची पत्नी, 50 वर्षांवरील महिला तर 55 वर्षांवरील पुरुष, तसेच गर्भवती व लहान मूल असल्यास शिक्षकांना सक्तीच्या बदली प्रक्रियेतून सवलत दिली जात आहे. परंतु, यासाठी गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडे संबंधित कागदपत्रे सादर करणे गरजेचे आहे.

22 रोजी अंतिम यादी...

सक्तीच्या बदलीची प्राथमिक यादी तयार करण्यात आली असून यातील सवलत मिळणाऱ्या शिक्षकांची नावे कमी केली जात आहेत. ज्यांनी अर्ज केला नाही, अशा शिक्षकांची नावे अंतिम यादीत समाविष्ट केली जाणार आहेत. सोमवार दि. 22 रोजी सक्तीच्या बदली प्रक्रियेची अंतिम यादी जाहीर होणार असल्याचे शिक्षण विभागाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे कागदपत्रांची जमवाजमव करण्यासाठी क्लब रोड येथील जिल्हाशिक्षणाधिकारी कार्यालय, तसेच विश्वेश्वरय्यानगर येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयात शिक्षकांची गर्दी झाली होती.

Advertisement
Tags :

.