For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अशोकनगरात 7 लाखांची जबरी चोरी

11:06 AM Apr 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
अशोकनगरात 7 लाखांची जबरी चोरी
Advertisement

कोल्हापूर पोलिसांकडून वाँटेड जोडगोळी

Advertisement

बेळगाव : एका बंद घराचा कडीकोयंडा तोडून सुमारे 7 लाख रुपयांचा ऐवज पळविण्यात आला आहे. गुरुवार दि. 18 एप्रिल रोजी रात्री ही घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांची छबी सीसीटीव्हीत कैद झाली असून कोल्हापूर व बेळगावात चोरी करताना ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. पोलिसांना ही जोडगोळी वाँटेड आहे. मोहम्मद युसुफखान सौदागर, रा. अशोकनगर यांच्या घरी चोरीची घटना घडली आहे. माळमारुती पोलीस स्थानकात एफआयआर दाखल झाला आहे. चोरट्यांनी 7 लाख 11 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, रोकड व परदेशी चलन पळविल्याचे उघडकीस आले आहे. कुटुंबीय घरात नसताना रात्रीच्यावेळी मोटारसायकलवरून आलेले दोघे जण हातात अवजारे घेऊन महम्मद युसुफखान यांच्या गेटमध्ये प्रवेश करतात. घरातील 6 लाख रुपये किमतीचे सोने व हिऱ्याचे दागिने, 7 हजार रुपये किमतीची चांदी, 30 हजार रुपये रोकड व 4 हजार रुपयांचे परदेशी चलन असा एकूण 7 लाख 11 हजारांचा ऐवज पळविला आहे. घटनेची माहिती समजताच माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. प्राथमिक माहितीनुसार ही जोडगोळी केवळ बेळगावातच नव्हे तर कोल्हापुरातही गुन्हे करण्यात सक्रिय आहे. माळमारुती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात झालेल्या वेगवेगळ्या चोरी प्रकरणात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात त्यांची छबी कैद आहे. प्रत्येकवेळी वेगवेगळ्या मोटारसायकलवरून ते बेळगावात येतात. मोटारसायकलवरून बंद घरांची पाहणी करतात. एखादे घर दिसले की कडीकोयंडा तोडून ऐवज लांबविण्यात त्यांचा हातखंडा आहे. टी-शर्ट, मंकी कॅप घातलेल्या गुन्हेगारांच्या पाठीवर एक बॅगही होती.

माहिती देण्याचे आवाहन...

Advertisement

सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन माळमारुती पोलिसांनी या जोडगोळीचा शोध सुरू केला आहे. या गुन्हेगारांविषयी माहिती मिळाल्यास 9480804107 या क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. या जोडगोळीच्या मुसक्या आवळल्यास अनेक चोऱ्यांचा उलगडा होणार आहे.

Advertisement
Tags :

.