Ichalkaranji Crime ७ हजारांच्या कर्जवसुलीसाठी महिलेला वेश्या व्यवसायासाठी भाग पाडलं
केवळ सात हजार रुपये हातउसने घेतलेल्या रकमेच्या वसुलीसाठी एका विवाहितेला मानसिक छळ करत जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एका महिलेसह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला. उज्वला बळीराम दोरुगडे, सर्जेराव कुंभार (दोघे रा. लक्ष्मीमाळ, कबनूर), विनायक पवार यांच्याविरोधात पीडितेच्या फिर्यादीवरून कारवाई करण्यात आली.
आर्थिक अडचणींतून महिलेने घेतले कर्ज
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, पीडित महिलेच्या पतीचा अपघात झाल्यानंतर आर्थिक अडचणीतून तिने उज्वला दोरुगडे हिच्याकडून सात हजार रुपये उसने घेतले होते. संबंधित रक्कम परत केल्यानंतरही संशयित महिलेने व्याजाच्या नावाखाली सतत तगादा लावण्यास सुरुवात केली. त्यानंतर पीडितेला सर्जेराव कुंभार याच्या हॉटेलमध्ये जबरदस्तीने काम करण्यास भाग पाडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
पीडितेला अपमानास्पद वागणूक
हॉटेलमध्ये काम करत असताना पीडितेला वारंवार शिवीगाळ, अपमानास्पद वागणूक, मानसिक त्रास दिला जात होता. व्याजाची रक्कम मिळत नसल्याच्या कारणावरून उज्वला दोरुगडे हिने पीडितेला आपल्या घरी बोलावून परपुरुषांशी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. विनायक पवार याची ओळख करून देत तो आणेल त्या ग्राहकाशी संबंध ठेवण्यास दबाव टाकल्याचा आरोपही केला आहे. ९ डिसेंबर २०२५ पासून सुरू असलेल्या या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने अखेर पोलिसात धाव घेतली. त्यानुसार संशयित आरोपींविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.