For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कुणासाठी स्वत:साठी...

06:23 AM Dec 17, 2025 IST | Tarun Bharat Portal
कुणासाठी स्वत साठी
Advertisement

मी मलाच आवडत नाही. मला माझा सारखा रागच येतो. मी छान दिसतच नाही..वगैरे वगैरे..असं सतत मनाशी घोळवणाऱ्या व्यक्तींनी आपला गुणदोषांसकट स्वत:चा स्वीकार केलेला नसतो. अशी माणसं स्वत:वर प्रेमदेखील करु शकत नाहीत. अशांना इतर माणसे कितपत स्वीकारणार हा प्रश्नच असतो. स्वत:चा स्वीकार करण्यासाठी व्यक्तीचा स्वत:कडे बघण्याचा दृष्टिकोन आणि समायोजन चांगलं असावं लागतं. ते नेमकं साधायचं कसं हे अनेकांना माहिती नसतं.

Advertisement

मॅडम ती बाकी चांगली आहे हो पण स्वभाव विचित्र! कुणाशी म्हणून तिचं जमत नाही. कशाने बिनसेल सांगता येत नाही. तिच्याशी कसं वागायचं हे कळत नाही. स्वभावानेही वाईट नाही पण सर्किट! तिच्या सोबत जमवून घ्यायचं म्हणजे नाकीनऊ येतात. बाकीच्या सगळ्यांची तारेवरची कसरत हो! मला भेटायला आलेल्या वीणाताई त्यांची मुलगी अवनी हीच्या विषयी बोलत होत्या. मॅडम मला खरंच टेन्शन येतं.. लग्नानंतर या पोरीचं व्हायचं कसं? काहीवेळा हट्टीपणा ही करते. राग तर नाकावर ठेवलेलाच. मूड म्हणजे काय बोलायचे नाही. माझीच मुलगी आहे पण हे असं आमच्या कुटुंबात कुणी नाही हो! आम्ही काही सांगितले तर पटेल, रुचेल असे नाही पण तिची चुलत बहिण आहे ना..सीमा तिचे ऐकते. तिने सांगितलेले पटते तिला. तिच्या सांगण्यामुळेच तुम्हाला भेटायला तयार झाली आहे. नंतर अवनीची भेट झाली. काही काळ ती येतही राहिली. सजगतेची वेगवगळी तंत्र, स्वगताची तर्कशुद्ध छाननी, आवश्यक बदल यासाठी तिनेही प्रामाणिक प्रयत्न केला.

अवनी सारख्या अनेक व्यक्ती पहायला मिळतात. वेगवेगळ्या कुटुंबामध्ये अनेकदा हे वाक्य वेगवेगळ्या व्यक्तींच्या बाबतीत ऐकायला मिळतं. कुटुंबामध्ये एक व्यक्ती जरी अशी असली तरी त्या कुटुंबाचं मन:स्वास्थ्य बिघडू शकतं. परंतु यातही त्या कुटुंबात किंवा त्या व्यक्तीच्या ओळखीत अशी एखादी व्यक्ती असते की जिच्याजवळ त्या व्यक्तिचे चांगले जमते.

Advertisement

आते तु सांगून बघ तुझे ऐकते ती! समजाव तिला. असे उद्गारही आपल्या परिचयाचे असतात. आत्या ही प्रातिनिधिक व्यक्ती चारचौघांसारखीच असते. फक्त त्या व्यक्तीला कसं हाताळायचं हे कसब ती जाणून असते. समोरच्याचा अपमान होणार नाही, तिला रुचेल, पचेल, समजेल अशा भाषेत ती चार गोष्टी नक्की सांगू शकते. ही आते सर्व वयोगटात प्रिय असते. समोरच्याची ब्रेन केमेस्ट्री लक्षात घेऊन कसा संवाद साधायचा याचं तंत्र त्यांना गवसलेलं असतं .I am Ok,You are Ok  असा निरोगी आणि हितकारक दृष्टिकोन असल्यामुळे समोरची व्यक्ती कुठल्या पातळीवरुन, कुठल्या हेतूने बोलतेय हे अचूक हेरुन त्यांच्याशी संवाद साधू शकतात.

याउलट येता-जाता दुसऱ्याच्या कामातले दोष काढणारे, तिरकस बोलुन संबंध बिघडविणारेही अनेक जणं असतात. काहींना आपल्या या स्वभावाची जाणीवही नसते तर काहींना त्यातून बाहेर कसं यायचं हे ठाउक नसतं. प्रयत्न केला तर आपल्या स्वभावातील उणीवा ओळखून त्या दूर करता येणं शक्य असतं. मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे अतिशय गतिमान आणि तीव्र स्पर्धेच्या काळात दैनंदिन जीवनात जगताना ताण-तणावांना, संघर्षाला तोंड देताना आज अनेकांची स्वास्थ्य शब्दाशी फारकत होताना दिसते.

अपेक्षाभंग झाला तर चिडचिड करणं हा स्वभावधर्म बनतो. कुठल्याही गोष्टीवर रागावणं, चिडणं, संतापणं, कटकट करणे अशा प्रतिक्रिया दिल्या जाऊन स्वत:च्या आणि इतरांच्या आयुष्यातील आनंद, सुख, समाधान, शांती ही सगळी चतु:सूत्री हरवून जाते.

विख्यात मानसोपचार तज्ञ डॉक्टर एन. सी. सूर्य यांनी मानसिक आरोग्याची केलेली व्याख्या खूप महत्त्वाची वाटते. या त्यांनी तीन गोष्टी सांगितल्या आहेत.

-तुम्ही स्वत:शी स्वस्थ असला पाहिजेत.

-इतरांना तुमच्या सानिध्यात स्वस्थ वाटलं पाहिजे.

-तुम्ही स्वत: मधील दोष, उणिवा शोधून त्या दूर करत राहिलं पाहिजे.

मुळातच या गोष्टी कळण्यासाठी आपलं लक्ष आपले विचार, भावना याकडे असणे गरजेचे आहे. त्यासाठी स्व जाणीव ((Self-awareness))असणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. यालाच Know theyself किंवा आत्मज्ञान म्हणतात. स्वत:ला स्वत:च्या भावना कळणं, त्या योग्य तऱ्हेने व्यक्त करता येणं, तसंच इतरांच्या भावनांची दखल घेऊन त्यांना समजून घेता येणं एवढं जरी करता आलं तरी बऱ्याच गोष्टी सोप्या होतात. भावनिक हुशारीमुळे नाकावरच्या रागालाही आपण थोपवू शकतो बरं का!

आनंदाने आणि सुखाने जगणं तुमची मानसिक जडणघडण कशी झालेय यावरही अवलंबून असतं. पहा हं, अगदी झोपडपट्टीतही काही माणसं आनंदाने जगतात पण काही राजवाड्यात जरी राहीले तरी सुखी असतीलच असे नाही. संशोधकांच्या मते प्रेम, स्विकार आणि कामगिरी (Aम्प्गनसहू)हे सुखासमाधानासाठी आवश्यक असणारे घटक आहेत. सुखाची प्रत्येकाची कल्पना वेगळी आणि सापेक्ष असते हे जरी मान्य केलं तरी वरील तीन गोष्टींना आपल्या आयुष्यात कितपत स्थान आहे यावरसुद्धा सुखाचा अनुभव अवलंबून असतो.

मी मलाच आवडत नाही. मला माझा सारखा रागच येतो. मी छान दिसतच नाही..वगैरे वगैरे..असं सतत मनाशी घोळवणाऱ्या व्यक्तींनी आपला गुणदोषांसकट स्वत:चा स्वीकार केलेला नसतो. अशी माणसं स्वत:वर प्रेमदेखील करु शकत नाहीत. अशांना इतर माणसे कितपत स्वीकारणार हा प्रश्नच असतो. स्वत:चा स्वीकार करण्यासाठी व्यक्तीचा स्वत:कडे बघण्याचा दृष्टिकोन आणि समायोजन Adjustment) चांगलं असावं लागतं. ते नेमकं साधायचं कसं हे अनेकांना माहिती नसतं. दैनंदिन जीवनात शारीरिक, शैक्षणिक, सामाजिक, कौटुंबिक, आर्थिक, वैवाहिक, व्यावसायिक अशा वेगवेगळ्या स्तरांवर समायोजन करावं लागतं. समायोजन म्हणजे बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणं. ते जमलं की अंतर्गत सुसंगती साधली जाते. निरामय जीवनासाठी सुसंघटित व्यक्तीमत्व आवश्यक असतं. ते असलं की व्यक्ती स्वत:कडून व इतरांकडूनही अवास्तव अपेक्षा करत नाही. स्वत:च्या महत्वाकांक्षेची पातळी देखील स्वत:च्या क्षमतांना अनुसरुन मर्यादित ठेवते. स्वत:च्या क्षमता, मर्यादा याचे भान असल्यामुळे बऱ्याच गोष्टी सुलभ होण्यास मदत होते. स्वभावात लवचिकता असेल, ताठरपणा नसेल तर बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणं जड जात नाही.

आयुष्यात सगळ्यांनाच नेत्रदीपक यश मिळतं असं नाही परंतु स्वत:च्या कुवतीप्रमाणे स्वत:चा विकास घडवून आणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न प्रत्येकाने केल्यास कुटुंबात सुख, शांती, आनंद निर्माण होण्यास मदत होईल. ती सुद्धा एक यशप्राप्ती ठरेल हे मात्र खरे!

अॅड. सुमेधा संजीव देसाई

Advertisement
Tags :

.