कशासाठी? पोटासाठी-की जीवघेण्या कामासाठी?
अॅना सॅबस्टियन पेरियली या पुणे येथे काम करणाऱ्या युवा महिला कर्मचाऱ्याच्या अकल्पित व अचानक झालेल्या दुर्दैवी मृत्यूची उद्योग-व्यापार व व्यवस्थापन क्षेत्रात विविध स्वरूपात काळजीयुक्त चर्चा सुरू आहे. असे होणे स्वाभाविकपण होते. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे 26 वर्षीय व सीए म्हणजेच चार्टर्ड अकौंटंसीसारखी प्रथितयश व्यवस्थापन पात्रता प्राप्त केलेल्या अॅनाने 18 मार्च 2024 रोजी आपली कारकीर्द मोठ्या उत्साह व उमेदीसह सुरू केली व 20 जुलै 2024 रोजी त्यांचा आकस्मिक मृत्यू झाला.
वर नमूद केल्याप्रमाणे उण्यापुऱ्या 4 महिने एवढी अल्प कारकीर्द लाभलेल्या अॅना सॅबस्टियन पेरियली यांचा झालेला धक्कादायक मृत्यू व त्याची कथित व तेव्हढीच दुर्दैवी पार्श्वभूमी उजेडात आली ती अॅनाच्या आई श्रीमती अनिता ऑगस्टीन यांनी अॅनाने आपली कारकीर्द व त्यानंतर अल्पावधीत म्हणजेच सुमारे 4 महिन्यात ज्या पार्श्वभूमीवर अॅनाचा मृत्यू झाला, त्या संदर्भात अॅना काम करणाऱ्या ‘अर्नस्ट अँड यंग’ या प्रथितयश व्यवस्थापन कंपनीचे अध्यक्ष राजीव मेमानी यांना लिहिलेल्या ई-मेल मुळे.
अॅनाच्या आई श्रीमती अनिता यांनी ‘अर्नस्ट अँड यंग’ चे अध्यक्ष राजीव मेमानीना लिहिलेल्या ई-मेल मध्ये आपल्या तरूण मुलीच्या मृत्यूची घटना व दुर्दैवी प्रसंग हा कंपनी व्यवस्थापनासाठी जागृत होऊन व कंपनीच्या कामकाज आणि कार्यपद्धतीवर मुळातून फेरविचार करण्याची कळकळीची विनंती केली आहे. श्रीमती अनिता व कंपनीचे अध्यक्ष यांच्या दरम्यान झालेले ई-मेलचे आदान-प्रदान व त्यावर झालेली साधक-बाधक चर्चा याचा तपशील समाज माध्यमांवर उपलब्ध झाला व त्यातून उद्योग-व्यवसायाशी संबंधीत समाज माध्यमच नव्हे तर संपूर्ण समाजमनच ढवळून निघाले व त्याचे शोकांतिक व तेव्हढेच चिंतनीय परिणाम सर्वदूर दिसून आले हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे.
श्रीमती अनिता ऑगस्टीन यांनी आपल्या ई-मेल पत्राच्या सुरूवातीलाच अॅनाला कराव्या लागणाऱ्या तणावग्रस्त व अतिरिक्त कामाचा उल्लेख केला असून अॅनाला याच कार्यपद्धतीचा कठोर सामना करावा लागला, ही वस्तुस्थिती आहे. त्यांनी याच संदर्भात पुढे नमूद केले की, हा मुद्दा वा कार्यपद्धती ही कंपनीअंतर्गत विशिष्ट विभाग वा व्यवस्थापकाशी संबंधित नसून ही कार्यपद्धती आता अख्ख्या व्यवस्थापनाशी संबंधित असा गंभीर मुद्दा बनला आहे.
त्यानंतर श्रीमती अनिता यांनी नमूद केलेला मुद्दा म्हणजे अॅनाच्या मृत्यूनंतर पुणे येथे झालेल्या अंत्यसंस्काराच्या वेळी पुणे कार्यालयात काम करणाऱ्यांपैकी कुणीही उपस्थित नव्हते. आपल्या मुलीच्या आकस्मिक निधनानंतर त्यांना ही बाब अधिक दु:खद वाटली व खटकली. आपल्या मनातील हे दु:ख व भावना कंपनी व व्यवस्थापनाला कळवाव्यात म्हणून श्रीमती अनिता यांनी कंपनी व्यवस्थापकांची भेट घेतली, मात्र त्यांना व्यवस्थापन तर दूर, मात्र कंपनी व्यवस्थापकांकडूनही कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही. जी कंपनी कामकाज व कार्यशैलीच्या संदर्भातल्या मुद्यांवर भर देणारी असल्याचे सांगण्यात येते अशा कंपनी वा तिच्या व्यवस्थापकांकडून माझ्या सारख्या आईने अशी अपेक्षा ठेवणे गैर आहे का? असा सवालच त्यांनी या संदर्भात व्यक्त केला व तो प्रत्येकाला विचार व अंतर्मुख करायला लावणारा ठरतो.
श्रीमती अनिता यांच्या ई-मेल पत्राला उत्तर वा प्रतिसाद म्हणून ‘अर्नस्ट अँड यंग-इंडिया’ चे अध्यक्ष राजेश मेमानी यांनी कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांशी ई-मेलद्वारा संवाद-संपर्क साधला. हे त्यांचे पत्र समाज-माध्यमांमध्ये उपलब्ध आहे. या पत्रात राजेश मेमानी यांनी सुरूवातीलाच नमूद केल्यानुसार “मी आपल्या दिवंगत सहकाऱ्याच्या कुटुंबाला माझी श्रद्धांजली व संवेदना कळविल्या आहेत. कुटुंबाचे झालेले नुकसान कधीही न भरून निघणारे आहे. मात्र आमच्यापैकी कुणीही अॅनाच्या अंत्यविधीला उपस्थित नव्हते, याचा मला खेद आहे. व्यवस्थापनाची भूमिका म्हणून अशी बाब यापूर्वी झाली नाही व पुढेही होणार नाही”.
कंपनी कर्मचाऱ्यांना केलेल्या या विशेष संवादपत्रात राजीव मेमानी यांनी मान्य केले होते की, गेल्या काही काळामध्ये आपल्यापैकी सर्वांनाच समाज-माध्यमातील मजकुराचा सामना करावा लागला आहे. आमच्यासाठी प्रगत व प्रेरक कार्यपद्धतीची रचना करून त्यांची अंमलबजावणी करणे याला नेहमीच प्राधान्य दिले गेले आहे.
राजीव मेमानी यांनी याच मुद्यावर भर देत स्पष्ट केले की, त्यांच्यासाठी कंपनी कर्मचाऱ्यांचे कल्याण सर्वोपरी राहिले आहे. मी या मुद्याला अधिक प्राधान्यतत्वावर घेणार असून मी त्याची अंमलबजावणी माझे स्वत:चे उद्दिष्ट म्हणून स्विकारले आहे. या अंमलबजावणीची उद्दिष्टपूर्ती झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार अशी ग्वाही देखील राजीव मेमानी यांनी याच पत्रात विशेषत्वाने दिली हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे.
दरम्यान अॅनाच्या दुर्दैवी व अकाली मूत्यूची नोंद घेत राज्य व राष्ट्रीय पातळीवरील वृत्तपत्र, इलेक्ट्रॅानिक माध्यम व त्याच्याच जोडीला समाज माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली. या चर्चेमध्ये प्रामुख्याने विशेष व्यवसाय क्षेत्रात काम करणारे प्रोफेशनल्स व व्यवस्थापन क्षेत्रातील व्यवस्थापकांना प्रसंगी दिवसातील 12 ते 14 तास काम करावे लागून त्यांच्या आरोग्य व आयुष्याकडे पुरतेपणी दुर्लक्ष करावे लागत असण्यावर मोठी चर्चा झाली व त्याचे परिणाम सर्वदूर उमटू लागले.
याच व्यापक सामाजिक चर्चेचा एक भाग म्हणून अॅना ‘अर्नस्ट अँड यंग’ कंपनीमध्ये काम करीत असल्याने या कंपनीसह देशांतर्गत अन्य तीन प्रमुख व आघाडीच्या चार्टर्ड अकाउंटंसी कंपनीची कार्यशैली व कार्यपद्धतीवर टीकेची झोड उठली. या टीकेतील मुख्य वा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या जागतिक पातळीवरील प्रमुख अशा 4 सीए कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना रोजच्या कामाच्या तासांव्यतिरिक्त आठवडी सुटीच्या दिवशी काम करायला लावतात. आठवडी सुटीच्या दिवशी काम करण्याच्या बदल्यात पर्यायी रजा देत नसल्याने त्यांचे आरोग्य चक्र कायमच बिघडलेले असते. याच जाहीर टीकेला जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार या मुख्य कंपन्यांच्या पाश्चिमात्य मुख्यालय वा तेथील कार्यालयांमध्ये मात्र अशी प्रथा-पद्धती नाही.
या कंपन्यांमध्ये नव्याने व आकर्षक पगार-फायद्यांसह दाखल झालेल्या युवा-व्यवस्थापकांनी आपले नवे अनुभव जाहिरपणे जे मुद्दे नमूद केले आहेत. त्यानुसार त्यांना दररोज रात्री उशीरापर्यंत काम करावे लागते व त्यामुळे रोजच झोप आणि आराम याचा बट्याबोळ होतो. वेळी-अवेळी वरिष्ठांकडून ऑनलाईन मिटिंगचा तगादा लावला जातो. संबंधित व्यवस्थापकाची मनमानी व सोयीच्या वेळेनुसार काम करावे लागते. आपली स्वत:ची रजा देखील घेता येत नाही. वरिष्ठांच्या सर्वस्वी मर्जीप्रमाणे नव्या कर्मचाऱ्यांना वागावे लागते व काम करावे लागते. या नव्या अधिकारी-व्यवस्थापकांना अशक्यप्राय असणारी कामे दिली जातात. परिणामी त्यांना त्यांच्या पगारवाढीच्या न्याय्य व देय असणाऱ्या अधिकारापासून हेतुपुरस्सर दूर ठेवण्यात येते. या साऱ्यांमुळे त्यांच्यावर काम आणि कामाशी संबंधीत प्रचंड मानसिक ताण-तणाव असतो. या साऱ्याचाच प्रत्यक्ष परिणाम अॅनाच्या मृत्यूमध्ये झाल्याचा जो दावा तिच्या आईने केला त्याला तरूण उमेदवारांनी जाहीर दुजोरा दिला आहे. त्यामुळेच मूळ प्रश्न कायम राहतो की हे सारे काम कशासाठी? पोटासाठी की जीवघेण्या कामासाठी?
दत्तात्रय आंबुलकर