योगसाधना यशस्वी होण्यासाठी योग्य ठिकाणी तप करावे
अध्याय पाचवा
सर्वत्र समदृष्टी बाळगणाऱ्या कर्मयोग्याने इंद्रियजय साधलेला असतो. तो अनुभवयुक्त ज्ञानाने समृद्ध असतो. समाजात होणारा मान, अपमान ह्या सर्व गोष्टी पूर्वकर्मानुसार घडत आहेत हे लक्षात घेऊन तो दोन्हीही गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. सोने, माती ह्या गोष्टी त्याला सारख्याच निरर्थक वाटतात. योगसाधनेला त्यांची मन:स्थिती अनुकूल झालेली असते अशा परिस्थितीत सततच्या योगसाधनेमुळे तो श्रेष्ठ योगी होतो. उत्तम मन:स्वास्थ्य असणे हे योगसाधना करण्यासाठी कसे आवश्यक आहे हे आपण बघितले. योगी सगळ्यांशी समदृष्टीने वागत असल्याने त्याच्या मनात कुणाबद्दलही परस्परविरोधी भावना नसतात. त्यामुळे तो शांत व निर्विकार असतो. त्याला योगसाधना करण्यासाठी परिस्थिती पूर्ण अनुकूल होण्याच्या दृष्टीने त्याने तो दमलेला असताना, त्याला भूक लागलेली असताना, तसेच प्रतिकूल वातावरणात, योगसाधना करू नये असे बाप्पा पुढील श्लोकातून सांगत आहेत.
तप्तऽ श्रान्तो व्याकुलो वा क्षुधितो व्यग्रचित्तकऽ। कालेऽ तिशीतेऽ त्युष्णे वानिलाग्न्यम्बुसमाकुले ।।7।। सध्वनावतिजीर्णे गोऽ स्थाने साग्नौ जलान्तिके।कूपकूले श्मशाने च नद्यां भित्तौ च मर्मरे।।8।। चैत्ये सवल्मिके देशे पिशाचादिसमावृते । नाभ्यसेद्योगविद्योगं योगध्यानपरायणऽ ।।9।।
अर्थ-ताप पावलेला, श्रान्त, व्याकुळ, क्षुधित अथवा चित्त व्यग्र असतांना, अतिशय शीत अथवा अतिशय उष्ण समयी, वायु-अग्नि अथवा जल यांनी अत्यंत युक्त ठिकाणी, ध्वनियुक्त ठिकाणी, अतिजीर्ण झालेल्या गोठ्यामध्ये, अग्नीने युक्त स्थली, उदक सन्निध आहे अशा ठिकाणी, विहीरीच्या काठावर, स्मशानामध्ये, पिशाच इत्यादिकांनी व्याप्त प्रदेशी योग्याने योगध्यानपरायण होऊन योगाचा अभ्यास करू नये.
विवरण-योगसाधना कुठे करावी, केव्हा करू नये इत्यादिबद्दल सविस्तर माहिती बाप्पा वरील तीन श्लोकातून देत आहेत. ते म्हणतात, जेथे शासन व्यवस्था उत्तम आहे, धार्मिक सलोखा चांगला आहे, जेथे दगड, आग व पाणी ह्यापासून उपद्रव होण्याचा धोका नाही अशा एकांत स्थानी मठ बांधून साधकाने योगसाधना करावी. साधनाकाळात साप, विंचू अशा प्राण्यांचा उपद्रव होऊ नये म्हणून दक्षता बाळगावी.
साधक आजारी असेल तर त्याने योगसाधना करू नये. त्याला तहानभूक लागली असेल तर त्याचे मन बेचैन असते तर अशा परिस्थितीत योगाभ्यास करू नये. थंडीपासून स्वत:चा बचाव करावा तसेच उन्हाळ्यात थंड हवा असेल अशा ठिकाणी योगाभ्यास करावा. जेथे गोंगाट होत असेल तेथे मनाची एकाग्रता साधने कठीण जाते म्हणून तेथे साधना करू नये. जेथे निरनिराळ्या कारणांनी जीवाला धोका असेल तेथे योगाभ्यास करणे टाळावे.
पुढील श्लोकात बाप्पा अयोग्य स्थानी अभ्यास केल्यास स्मृतिभ्रंश, मुकेपणा, बधीरपणा इत्यादि रोगांचा सामना करावा लागतो असा इशारा बाप्पा देत आहेत.स्मृतिलोपश्च मूकत्वं बाधिर्यं मन्दता ज्वरऽ। जडता जायते सद्यो दोषाज्ञानाद्धि योगिनऽ।।10।।
अर्थ-जो दोषयुक्त ठिकाणी योगाभ्यास करेल त्याला तत्काळ स्मृतिलोप, मूकत्व, बधिरता, मन्दता, ताप आणि जडता उत्पन्न होतात.
विवरण-योग्य स्थानी योगाभ्यास न केल्यास वायूची गती भलतीकडेच जाऊन मेंदूमध्ये विकृती निर्माण होते, मागचे काही स्मरत नाही, साधक बहिरा, मुका होऊ शकतो, तापाने आजारी पडू शकतो. तेथे कसलाच उपाय चालत नाही. पवित्र, निर्मल ठिकाणी जो योगाभ्यास करेल त्याला वरील दोषांपासून निर्माण होणाऱ्या शारीरिक व्याधी त्रास देणार नाहीत. नर्मदाकाठचे वातावरण साधना करण्यासाठी योग्य मानले जाते. त्यामुळे कित्येक योग्यांनी नर्मदा काठावर योगसाधनेला सुरवात करून साधनेची सांगता गंगाकिनारी केलेली आहे.
क्रमश: