मुख्य न्यायमूर्तीपदासाठी पी. एस. दिनेशकुमार यांच्या नावाची शिफारस
प्रतिनिधी/ बेंगळूर
कर्नाटक उच्च न्यायालयाचे विद्यमान मुख्य न्यायमूर्ती प्रसन्न बी. वराळे यांना सर्वोच्च न्यायालयात पदोन्नती देण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ सर्वोच्च न्यायालयाच्या कोलॅजियमने शुक्रवारी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी न्या. पी. एस. दिनेशकुमार यांच्या नावाची शिफारस केली आहे.
जानेवारी 2015 मध्ये कर्नाटक उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून पी. एस. दिनेशकुमार यांची नेमणूक केली होती. न्यायालयीन आणि प्रशासकीय विभागात अधिक अनुभव असलेल्या न्या. दिनेशकुमार 24 फेब्रुवारी 2024 निवृत्त होणार आहेत. तत्पूर्वी त्यांना मुख्य न्यायमूर्ती म्हणून नेमण्याची शिफारस करण्यात आली आहे. न्या. दिनेशकुमार हे आंध्रप्रदेश उच्च न्यायालयात सेवा बजावणाऱ्या न्या. नरेंदर जी यांच्यानंतर दुसरे सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश आहेत, असा उल्लेख सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्या. संजीव खन्ना आणि न्या. बी. आर. गवाई यांचा समावेश असणाऱ्या कोलॅजियमने पत्रकात केला आहे.