पहिल्यांदाच ड्रोनच्या मदतीने जखमी सैनिकाची सुटका
491 दिवस युद्धभूमीवर अडकलेल्या युक्रेनियन सैनिकाला जीवदान : भूसुरुंगांनी वेढलेल्या परिसरातून थरारक बचावमोहीम
युद्धभूमीवर जखमी झालेल्या सैनिकाला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी युक्रेनच्या सैन्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत एक थरारक बचावमोहीम राबविली. कोस्त्यांतिन व्लासेंको या युक्रेनियन सैनिकाला जड वाहतूकक्षम ड्रोनच्या मदतीने युद्धक्षेत्रातून बाहेर काढण्यात आले. जगात प्रथमच अशाप्रकारे जखमी सैनिकाची ड्रोनच्या सहाय्याने सुटका करण्यात आल्याचा दावा आहे. तब्बल 491 दिवस युद्धभूमीवर अडकून पडलेल्या या सैनिकाच्या सुटकेसाठी युव्रेनच्या सैन्याला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला.
वृत्तसंस्था, कीव्ह
कोस्त्यांसिन व्लासेंको हे पूर्व युक्रेनमधील कुपियांस्क आघाडीवर तैनात होते. या परिसरात रशियन सैन्याकडून सातत्याने हल्ले होत असल्याने परिस्थिती अत्यंत धोकादायक झाली होती. व्लासेंको आणि त्यांचा एक सहकारी काँक्रिटच्या निचरा पाइपमध्ये तयार केलेल्या तात्पुरत्या आश्रयस्थानी राहत होते. याचवर्षी 14 फेब्रुवारी रोजी रशियन ड्रोनने केलेल्या हल्ल्यात व्लासेंको यांच्या सहकाऱ्याचा मृत्यू झाला. या हल्ल्यातील स्फोटकांचे तुकडे लागल्याने व्लासेंकोही गंभीर जखमी झाले. त्यांच्या दोन्ही पायांना मोठी दुखापत झाली. त्यांना तातडीने वैद्यकीय उपचाराची आवश्यकता होती, मात्र शत्रूच्या नियंत्रणाखाली असलेल्या धोकादायक परिसरात पोहोचणे बचाव पथकासाठी जवळपास अशक्य होते.
संसर्ग वाढल्याने स्वत:च कापला पाय
गंभीर जखमांमुळे व्लासेंको यांच्या उजव्या पायात गँगरीन हा गंभीर आजार पसरला. वेळेवर उपचार न मिळाल्याने त्यांची प्रकृती अधिकच खालावली. अखेरीस परिस्थितीच्या तीव्रतेमुळे त्यांनी स्वत:च चाकूच्या सहाय्याने आपला पाय कापून वेगळा केला होता. या भीषण परिस्थितीतही युक्रेन सैन्याने त्यांच्याशी संपर्क कायम ठेवला. ड्रोनच्या मदतीने त्यांच्या ठिकाणाजवळ अन्न, पाणी आणि औषधे पोहोचविली जात होती. साधारणदर 4-5 दिवसांनी आवश्यक साहित्य त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात येत असे. गंभीर जखमी अवस्थेत व्लासेंको रांगत जाऊन हे साहित्य गोळा करत होते. या मदतीमुळे त्यांना शत्रूच्या परिसरात दीर्घकाळ तग धरता आला.
जमिनीवरील बचावाचे प्रयत्न ठरले अपयशी
व्लासेंको यांना बाहेर काढण्यासाठी युक्रेन सैन्याने सुरुवातीला जमिनीवरून चालणाऱ्या मानवरहित रोबोटिक वाहनाचा वापर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, रशियन सैनिकांच्या नजरेस हे वाहन पडले आणि त्यांनी ते नष्ट केले. त्या परिसरात पायी सैनिक पाठविणेही अत्यंत धोकादायक होते. आजूबाजूला भूसुरुंगाचा सापळा, शत्रूच्या हल्ल्यांचा धोका आणि आकाशात टेहळणी करणारे ड्रोन यामुळे बचावकार्य अधिकच कठीण झाले होते.
6 महिन्यांची तयारी
अशा परिस्थितीत जखमी सैनिकाला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी युक्रेनच्या 30 व्या मेकॅनाइज्ड ब्रिगेड आणि 92 व्या असॉल्ट ब्रिगेडमधील सैनिकांनी जड वाहतूकक्षम ड्रोनच्या सहाय्याने सुटकेची योजना आखली. या मोहिमेच्या तयारीसाठी सुमारे 6 महिने लागले. सैनिक, ड्रोन ऑपरेट आणि तांत्रिक तज्ञांनी एकत्रितपणे काम करून जखमी सैनिकाला हवेत उचलून सुरक्षित ठिकाणी नेण्याची व्यवस्था तयार केली.
130 किलो वजन उचलणाऱ्या ड्रोनचा वापर
या बचावमोहिमेसाठी युक्रेनमधील गुरझुफ डिफेन्स कंपनीने विकसित केलेल्या ‘हेवी अयुदाग-6“ या जड ड्रोनची निवड करण्यात आली. जखमी सैनिकाला सुरक्षितपणे बांधून हवेत उचलता यावे, यासाठी ड्रोनमध्ये विशेष व्यवस्था करण्यात आली होती. ड्रोनवरील कॅमेरा आणि मायक्रोफोनच्या सहाय्याने ऑपरेटला सैनिकाशी संपर्क साधणेही शक्य होते. ड्रोन व्लासेंको यांच्या ठिकाणी पोहोचला, त्यांना विशेष पट्ट्यांच्या सहाय्याने सुरक्षितरित्या बांधण्यात आले आणि हळूहळू जमिनीवरून हवेत उचलण्यात आले. जखमी सैनिकाचे वजन सांभाळत शत्रूच्या हल्ल्यांचा धोका असलेल्या परिसरातून बाहेर पडणे हे ड्रोनसमोर मोठे आव्हान होते. ड्रोनच्या बॅटरीवर अतिरिक्त ताण येत असल्याने प्रवासादरम्यान बॅटरी बदलण्याचीही व्यवस्था करण्यात आली होती.
