For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अनन्य भक्तासाठी परमात्मस्वरूप हे मायपोट आहे

06:23 AM Sep 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
अनन्य भक्तासाठी परमात्मस्वरूप  हे मायपोट आहे
Advertisement

अध्याय आठवा

Advertisement

परमेश्वराबद्दल किंवा परमपुरुषाबद्दल सांगताना भगवंत म्हणतात, त्यामध्ये सर्व भूते सामावलेली आहेत त्याने हे सर्व विश्व व्यापलेले आहे. त्यांची प्राप्ती अनन्य भक्तीने होते. ह्यांचे महात्म्य असे की, चारी वेदांचा विस्तार त्या परमात्म्याचे आंगणही पाहू शकत नाही. परमपुरुषाचे स्वरूप जाणून त्याला प्राप्त करून घेणे ही सर्वात पलिकडची गती असे श्रेष्ठ योगी म्हणतात. असे जरी असले तरी हा परमात्मा, एकनिष्ठ भक्तावर अत्यंत प्रेम करत असल्याने तो त्याचे घर शोधीत येतो आणि त्यांच्या एकनिष्ठ्तेचे फळ त्याला देतो.

अनन्य भक्तासाठी परमात्मस्वरूप हे मायपोट आहे. अनन्य भक्त तेथे गेल्यावर तो स्वत:च परमात्मस्वरूप होतो. त्याची ही अवस्था कायमची असते. त्याला पुन्हा जन्म मिळत नाही. हे एकनिष्ठ भक्त कायावाचामनाने परमात्म्यावाचून दुसरी गोष्टच ऐकत नाहीत, त्यांना हे त्रैलोक्य परमात्म्याने व्यापलेले आहे ह्याची बालंबाल खात्री असल्याने त्यांना सर्वत्र त्याचेच दर्शन घडत असल्याने परमात्मस्वरुपाच्या ठिकाणी ते नेहमी राहत असतात.

Advertisement

ज्यामध्ये सर्व भूते सामावलेली आहेत ज्याने हे सर्व विश्व व्यापलेले आहे. त्या पुरुषाची प्राप्ती अनन्य भक्तीने होते. ह्या अर्थाचा

लाभे अनन्य-भक्तीने पार्था पुरुष थोर तो। ज्यात ही राहती भूते ज्याने विस्तारले

जग ।। 22 ।।

हा श्लोक आपण पहात आहोत.

परमात्मस्वरूपाचे महात्म्य सांगताना माउली म्हणतात, हे गर्वरहित पुरुषांचे मोठेपण आहे, सुखाचे राज्य आहे, हे संतोषी पुरुषांस वाढलेले ताट आहे. संतोषी पुरुष कधीही संसाराची चिंता करत नाहीत. त्यांना परमेश्वरावाचून दुसरा कोणी मालक नसतो. त्याच्यापर्यंत पोहोचण्याला भक्ति हीच सरळ वाट आहे. अनन्य भक्तीने तेथे गेले असता ते ठिकाणच तो होतो. भक्तातला मी पणा जाऊन तो परमात्मस्वरूप कसा होतो त्याबद्दल उदाहरण देताना माउली म्हणतात, थंडीच्या झुळुकांनी कढत पाण्याचे स्वरूप बदलून ते थंड होते अथवा सूर्य उगवल्यावर अंधार प्रकाशमय होतो, त्याप्रमाणे ज्या परमात्मस्वरूपी मुक्कामाला मी मांडलेल्या विश्वरूपी प्रपंचातला भक्त पोहोचतो त्याला प्रपंचच मोक्षरूप झाल्याची प्रचीती येते. त्यांची मोक्षावस्था ही कायमची असते. ज्याप्रमाणे लाकूड अग्नीत गेले की, अग्निरूपच होऊन राहते, त्याला पुन्हा लाकूडपण मिळत नाही अथवा उसाची साखर झाल्यावर त्या साखरेचे परत उसात रूपांतर करता येत नाही. परिसाने लोखंडाचे सोने केले असता परत त्याचे लोखंड करता येत नाही किंवा दुधाचे तूप झाल्यावर पुन्हा त्या तुपाचे दुधात रुपांतर करता येत नाही, त्याप्रमाणे भक्त परमात्मस्वरूप झाल्यावर त्याला पुन्हा जन्म मिळत नाही. भगवंतांनी दुसऱ्या अध्यायात ह्या स्थितीला ब्राह्मीस्थिती असे म्हंटले असून ती एकदा प्राप्त झाली की त्यात कधीही बदल होत नाही असे म्हंटले आहे.

अर्जुना स्थिती ही ब्राम्ही पावता न चळे पुन्हा । टिकूनि अंत-काळी हि ब्रम्ह-निर्वाण मेळवी ।। 72 ।। भगवंताच्या हृदयातली ही अत्यंत गुप्त गोष्ट त्यांनी पार्थाला सांगितली.

क्रमश:

Advertisement
Tags :

.