‘प्रगती’साठी मानसिक अडथळ्यांचा चक्रव्यूह भेदायलाच हवा
आपले विचार, आपले आरोग्य आणि आपला आनंदसुद्धा आपल्या मनातच असतो. हे सगळं प्राप्त करायचे असेल तर सर्वप्रथम मन ‘प्रसन्न’ असायला हवे. पण प्रत्यक्षात असे आढळून येते की आयुष्यात हवे ते मिळवण्याच्या मार्गात मन फार मोठा अडथळा ठरते आहे. सकारात्मक वृत्ती, सकारात्मक विचार हे सारे ‘मनावर’ घेतले तर यश, आनंद, वैभव आणि प्रेम मिळवता येऊ शकतं. पण मनाचा ताबा जर राग, द्वेष, सूड, मत्सर, लालसा आणि अहंकार यांनी घेतला तर मात्र आयुष्याची दारुण शोकांतिका होण्यास फारसा वेळ लागत नाही. निर्णय घेणे हा जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे, जो व्यक्तिगत प्रगती, करिअर उन्नती आणि एकूणच कल्याणावर प्रभाव टाकतो. मात्र, अनेक लोक मानसिक अडथळ्यांमुळे निर्णय घेण्यात अयशस्वी ठरतात. हे अडथळे संज्ञानात्मक पक्षपात, भावनिक प्रभाव आणि भीतीमुळे निर्माण होतात. या अडथळ्यांवर उपाययोजना केल्यास अधिक आत्मविश्वासाने आणि प्रभावीपणे निर्णय घेता येतात. या अडथळ्यांना सामोरे जाऊन आणि योग्य उपाययोजना करून, आपण अधिक स्पष्ट आणि आत्मविश्वासपूर्ण निर्णय घेऊ शकतो, ज्यामुळे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात यशस्वी होण्याची संधी वाढते.
तरुणांचे स्वास्थ्य हा राष्ट्रीय विकासाचा एक मूलभूत चालक आहे, जो आर्थिक प्रगती आणि समाजाच्या निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. विशेषत: भारतासहित अनेक देशात गेल्या काही दशकात आरोग्य, शिक्षण आणि उत्पन्नामध्ये लक्षणीय प्रगती झाली असताना, तरुणांचे मानसिक आरोग्य हे एक महत्त्वाचे क्षेत्र आहे जिथे पुढील प्रगती आवश्यक आहे असे संशोधनाअंती आढळून आले आहे. मानसिक आरोग्याच्या समस्यांचे निवारण केल्याशिवाय, हे देश संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टे द्वारे नमूद केलेली सामायिक उद्दिष्टे साध्य करू शकत नाही. विशेषत: एसडीजी 3 (सस्टेनेबल डेव्हपमेंट गोल)ज्याचे उद्दिष्ट ‘उत्तम आरोग्य आणि स्वास्थ्य’ सुनिश्चित करणे आहे. मानसिक आरोग्य हे एसडीजी 3 चा अविभाज्य घटक म्हणून ओळखले जात आहे आणि लक्ष्य 3.4 चे उद्दिष्ट मानसिक आरोग्य आणि तंदुरुस्तीला प्रोत्साहन देणे व 2030 पर्यंत असंसर्गजन्य रोगांमुळे होणारे अकाली मृत्यू एक तृतीयांश कमी करणे हे आहे. युवकांचे कल्याण, निरोगी जीवन सुनिश्चित करणे आणि सुदृढता वाढ यासाठी ध्येय निश्चिती करून यश प्राप्त करणे याला जागतिक स्तरावर प्राधान्याने काम करण्याचा संकल्प करणेत आला आहे. 5 वर्षांखालील मृत्यू रोखण्यासारख्या क्षेत्रात प्रगती असूनही, तरुणांच्या मानसिक आरोग्य सेवांमध्ये यश मिळणे हे आव्हानात्मक झाले आहे. ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’ च्या अंदाजानुसार जगभरातील सातपैकी एक किशोरवयीन व्यक्ती मानसिक विकारांनी ग्रस्त आहे. ही विषमता कोविड-19 महामारी नंतर खूपच वाढली आहे, जागतिक स्तरावर तरुणांमध्ये चिंता, नैराश्य आणि एकलकोंडेपणाचे प्रमाण वाढले आहे. सुमारे 58 टक्के आत्महत्या वयाच्या 50 च्या आधी होतात. यातून दर्शविते की कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये विविध वयोगटातील विशेषत: 15 ते 50 मधील वयोगटामध्ये आत्महत्या मृत्यूंचे प्रमाण अधिक आहे. या वयोगटाला मानसिक आघाडीवर सक्षम करण्यावर स्पष्टपणे लक्ष केंद्रित करणे, तसेच अनेक युवा-केंद्रित मापदंडांवर विशेष लक्ष देऊन प्रगतीसाठी मानसिक अडथळ्यांच्या चक्रव्यहातून बाहेर पडण्याचा मार्ग सर्वांनाच पण विशेष करून युवा वर्गाला दाखवण्याची अत्यंत आवश्यकता आहे.
1.अपयशाची भीती : गैरसमज किंवा चुकीचा निर्णय होण्याच्या भीतीमुळे अनेक लोक निर्णय घेण्यास टाळाटाळ करतात, ज्यामुळे विलंब, टाळाटाळ किंवा कमी जोखमीचा पर्याय स्वीकारण्याची प्रवृत्ती दिसून येते.
2 जास्त विचार करणे आणि गोंधळ : निर्णय घेण्यापूर्वी अत्याधिक माहिती गोळा करण्यामुळे गोंधळ उडतो आणि निर्णय घेण्याची प्रक्रिया लांबणीवर जाते.
- पश्चात्तापाची भीती : भविष्यात पश्चात्ताप होईल या भीतीमुळे लोक निर्णय घेण्यास घाबरतात.
- परिपूर्णतेची मानसिकता : परिपूर्ण निर्णय घेण्याच्या अट्टाहासामुळे अनेक संधी गमावल्या जातात.
- सामाजिक दडपण आणि टीकेची भीती: इतर लोक आपल्याबद्दल काय विचार करतील याची चिंता निर्णय घेण्यास विलंब करू शकते.
- आत्मविश्वासाचा अभाव : स्वत:वरील विश्वास कमी असल्यास निर्णय घेण्याचे टाळले जाते.
- नैराश्य : ही केवळ तात्पुरती खिन्नता नसून एक गंभीर मानसिक आरोग्य समस्या आहे. ती व्यक्तीच्या विचारांवर, भावनांवर आणि वागणुकीवर खोलवर परिणाम करते. योग्य वेळी लक्ष न दिल्यास ती दीर्घकालीन होऊ शकते. आजच्या जलद गतीच्या हायपरकनेक्टिव्हिटीच्या जगात, नैराश्याची काही सुरुवातीची लक्षणे सहज लक्षात येत नाहीत. नैराश्य ही एक गंभीर वैद्यकीय स्थिती आहे ज्यामुळे भावनिक आणि शारीरिक समस्या उद्भवू शकतात आणि एखाद्या व्यक्तीच्या दैनंदिन कार्ये करण्याच्या क्षमतेवर विपरित परिणाम होतो. सुदैवाने, ही एक उपचार करण्यायोग्य स्थिती आहे.
- चालढकल : आपल्या दैनंदिन जीवनात चालढकल म्हणजेच काम पुढे ढकलण्याची सवय अनेकांना जाणवते. एखादं काम आज करायचं ठरवूनही ते उद्यावर, परवा किंवा पुढच्या आठवड्यावर ढकलणं हीच चालढकल. ही फक्त आळसाची खूण नाही, तर कधी कधी मानसिक आणि भावनिक कारणांशीही जोडलेली असते.
9.आकस :‘आकस’ हा मराठीतील एक भावनिक शब्द आहे, ज्याचा अर्थ एखाद्याबद्दल मनात आलेला
राग, मत्सर, द्वेष किंवा कटुता असा होतो. हा भाव बहुतेक वेळा एखाद्या अन्यायाची, अपमानाची किंवा स्पर्धेची भावना मनात साचल्यामुळे निर्माण होतो. याची नेमकी कारणे कोणती तर,मत्सर इतरांच्या यशामुळे किंवा प्रगतीमुळे निर्माण होणारी अस्वस्थता. अन्यायाची भावना आपल्यावर अन्याय झाला असे वाटणे. अहंकाराला धक्का स्वत:च्या प्रतिष्ठेला धक्का बसल्याची भावना. गैरसमज संवादाचा अभाव किंवा चुकीची माहिती.
- संभ्रम : मानवी जीवनात संभ्रम म्हणजेच गोंधळ, द्विधा मन:स्थिती किंवा निर्णय घेण्यातली अनिश्चितता, ही एक नैसर्गिक अवस्था आहे. कधी परिस्थिती अस्पष्ट असते, कधी माहिती अपुरी असते, तर कधी मनातल्या भावनांचा कलह आपल्याला स्पष्ट विचार करू देत नाही. संभ्रमाची मुळे अनेकदा दोन गोष्टींमध्ये अडकलेल्या मनात असतात एक म्हणजे भीती आणि दुसरे म्हणजे आकर्षण. एखादा निर्णय घेतल्यावर काय गमावू, याची भीती आणि दुसरा पर्याय गमावण्याची खंत, या दोन्ही गोष्टी मनात एकाच वेळी असतात.
प्रा.डॉ. गिरीश नाईक