शांततेसाठी...
विविध प्रकारच्या समस्यांमध्ये अडकलेला माणूस खूप धावपळ करत, बळ एकवटत जुन्या समस्या सोडवत नव्या समस्यांना सामोरा जात असतो. हे चक्र अव्याहतपणे, अविरतपणे सुरू असतं! काही माणसं शांत राहत जबरदस्त इच्छाशक्तीच्या बळावर त्यातून मार्ग काढतात, काही कमालीची अस्वस्थ चिडचिडी होतात, तर काही चिंताग्रस्त बनतात!
खूप दिवसांनी एका ट्रिपच्या निमित्ताने ‘फॅमिली फ्रेंड्स’ एकत्र आलो होतो. हसत खेळत प्रवास सुरू होता. गाडीमध्ये गप्पा, थट्टा-मस्करी, हशा हे सार सुरू होतं. गप्पा अगदी रंगल्या होत्या. एकमेकांवर शाब्दिक कुरघोडी सुरू होत्या. कोणी आपापल्या नोकरी व्यवसायातील अनुभव सांगत होते, कुणी टेन्शन, धावपळ स्ट्रेस हे सारं जीवनाचा अविभाज्य घटक कसे बनले आहे यावर शिक्कामोर्तब करत होते. थोड्या वेळाने एका मैत्रिणीने माझ्याकडे मोर्चा वळवला.. ए ..ए तू काउन्सेलिंग वगैरे करतेस ना? तुला एक चॅलेंजिंग केस आहे. इतकी दुनियादारी करतेस थोडे आमच्याकडे पहा की जरा!
काय झालं? तुझं उगीच काहीतरी? कसली केस?
अगं, या माझ्या नवऱ्याची केस! ‘तो’ तिच्याकडे पाहून शांतपणे हसला. हे पहा ती लगेच म्हणाली. हाच
प्रॉब्लेम आहे. हा माणूस सदैव निवांत असतो. त्याला टेन्शन येतच नाही. कुठच्याही प्रसंगात हा शांतच!
अगं हो हो..पण तुमची काळजी घेत नाही असं तर नाही ना? किंवा आलेल्या संकटापासून, प्रसंगापासून पलायन करतोय असं नाहीये ना? छे..छे बिलकुलच नाही. तो शांत राहून आमच्यापेक्षा हुशारीने मार्ग काढतो.
मग झालं तर, त्याला चिंता वाटत नाही याची तुला काय एवढी चिंता? चेहरा त्रिकोणी करून समस्या सुटतात का? आपण काळजी करताना दिसलो नाही तर लोक काय म्हणतील म्हणून चेहरा उदास असल्यासारखं भासवणं कितपत योग्य आहे? उलट शांत राहून नीट विचार करता येतो ते त्याच्याकडून शिकण्यासारखं आहे.
झालं... तेवढ्यात ड्रायव्हरने करकचून ब्रेक लावला. आमच्या पुढच्या गाडीच्या चालकाने ब्रेक लावल्याने यालाही गाडी थांबवणे आवश्यक होतं. सर्वत्र गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
डोकावून पाहिलं तर रस्त्याच्या अगदी मध्येच एक ‘मोठी गाय’ अत्यंत शांतपणे उभी होती. कुणी उशीर होतोय म्हणून वैतागत होते. काही गाडीतूनच हॅट-हॅट करत होते. कुणी आजचा दिवसच कसा वाईट आहे आणि एक काम धड होईल तर शपथ.. असं बडबडत अस्वस्थ होत होते.
परंतु या साऱ्या कोलाहलात ती ‘गाय ध्यान धारणेत मग्न असल्यासारखी’ शांत उभी होती. मी अगोदरच्या संवादाचा धागा पकडत मैत्रिणीला म्हटलं ‘ए नेत्रा तुझा नवरा असा शांत राहतो ना? पहा बरं किती अवघड आहे असं शांत राहणं.. तुला जमेल का?’
तू मलाच आता लेक्चर दे.. ती पहा गाईची समाधी भंग पावली तिने विषय बदलला.
खरोखरच सारी माणसं धावपळ, काळजी, ताण तणाव याचं ओझं वाहत असताना रस्त्यावर दुतर्फा गर्दी होऊनही अगदी ध्यान लावल्यासारखी शांत असलेली ती गाय, तिचं ते शांत राहणं कोणत्याही माणसाला हेवा वाटावं असंच होतं!
विविध प्रकारच्या समस्यांमध्ये अडकलेला माणूस खूप धावपळ करत, बळ एकवटत जुन्या समस्या सोडवत नव्या समस्यांना सामोरा जात असतो. हे चक्र अव्याहतपणे, अविरतपणे सुरू असतं! काही माणसं शांत राहत जबरदस्त इच्छाशक्तीच्या बळावर त्यातून मार्ग काढतात, काही कमालीची अस्वस्थ चिडचिडी होतात, तर काही चिंताग्रस्त बनतात! पूर्वीच्या जीवनाच्या अवघड वाटचालीपेक्षा आज अनेक गोष्टी सहज सोप्या झाल्या. माणसाचं जीवन अनेक सुख सुविधांनी समृद्ध झालं असलं तरी दडपण, काळजी, चिंता त्याची पाठ सोडत नाही. पूर्वी जंगलात वावरणाऱ्या आदिमानवांना जगण्यासाठी थंडी, वारा, ऊन पाऊस, वणवे, प्राण्यांचे हल्ले, अन्नाचा शोध यासाठी झगडावे लागत असे.
त्यावेळची तशी सततची अनिश्चितता, त्यातून वाटणारी भीती, काळजी हे बहुदा त्यामुळेच माणसाची अनुवंशिकता झाली असेल! खरंतर वास्तविक चिंता हा माणसाच्या जीवनातील एक अविभाज्य आणि आवश्यक घटक आहे. जी चिंता सावधानतेचा इशारा देते, बेफिकिरीला लगाम घालते, जबाबदारीची आठवण करून देऊन कामाला लावते ती व्यक्तिमत्व विकासाला पोषक ठरते. परंतु सततची काळजी, अवास्तव चिंता मात्र मानसिक आणि शारीरिक आरोग्य धोक्यात आणू शकते.
खरंतर आज आपण सगळेच एका गतिमान जीवनशैलीमधून जात असलो तरी... अनेक सुखसुविधांनी माणसाचे जीवन तसे सहज केलं. जीवनामध्ये एक प्रकारची सहजता आली. परंतु अफाट महागाई, माणूस घराबाहेर पडल्यानंतर घरी येईपर्यंतच्या विविध समस्यांना सामोर जाणं, विविध प्रकारचे आजार, प्रदूषण अपघात, अस्थिर जीवन आणि त्यातून उद्भवणारे ताण-तणाव, त्यातून पुन्हा उद्भवणाऱ्या समस्या ही एक साखळीच असते. पिढ्यानपिढ्या विविध प्रकारे ही साखळी कार्यान्वित राहिल्याने चिंता हा जगण्याचा अविभाज्य घटक बनला असावा. एखादा माणूस एखाद्या गंभीर प्रसंगातून जाताना शांत दिसला तर लोकांचे याला काळजीच कशी वाटत नाही? काहीतरी गडबड नक्कीच आहे असे वाटू लागते.
एकदम बेफिकीर असणं धोकादायक तसेच सतत चिंता करणं हेही धोकादायकच! सतत त्या चिंतेमुळे अस्वस्थता वाढत जाते त्याच गोष्टी भोवती लक्ष एकवटून इतर अनेक चांगल्या गोष्टींचा विसर पडतो आणि नकारात्मकता वाढू लागते. उदाहरणार्थ एखाद्या माणसाला माझी गाडी चुकणार ही चिंता आहे तर तेवढ्यानेच त्याचे विचार थांबत नाहीत. गाडी चुकणार.. ऑफिसला उशीर होईल. साहेब रागावतील कदाचित नोकरीवरून काढून टाकतील तसं झालं का आपल्या संसाराचं काय होईल? मुलांचं कसं होईल? वगैरे वगैरे विचार वाढत जातात.
एखादी घटना घडण्यापूर्वी चिंतातूर माणूस चिंतेच्या जाळ्यात विचित्र पद्धतीने अडकत जातो आणि समस्या सुटण्याऐवजी अधिक गुंतागुंतीची बनत जाते. कोणाचे जीवन हे समस्या विरहित नसते. उद्या कसे व्हायचे हा विचार आज कष्ट करायला प्रवृत्त करत असतो परंतु त्याचे जर चिंतेत रूपांतर झाले तर तो प्रश्न इतका त्रासदायक होतो की आपली दैनंदिन कामेही नीट करता येत नाहीत. मन एकाग्र करता येत नाही. त्याचा प्रकृतीवरही अनिष्ट परिणाम होऊ लागतो. अशावेळी योग्य मार्गदर्शन घेऊन यावर उपाययोजना करत नकारार्थी अस्वस्थ करणारे विचार प्रयत्नपूर्वक बाजूला करणे हिताचे ठरते. मागच्या एका लेखात म्हटल्याप्रमाणे घोडा का उधळला? घडा का फुटला? प्रश्न का चिघळला? त्या यक्षाच्या प्रश्नांना युधिष्ठीराने दिलेले उत्तर सदैव लक्षात ठेवण्याजोगे आहे. ‘पकड सुटली म्हणून’!
आपले विचार, भावभावना यावरची आपली पकड जर व्यवस्थित असेल, साऱ्यांचे लगाम प्रयत्नपूर्वक हाती ठेवले तर अविवेकी प्रतिक्रियांमधून सुटून विवेकी प्रतिसादाकडे पोहोचता येते. हे साध्य झाले तर चिंतेतून निर्माण होणारे त्रास व समस्यातून सुटका होऊन जीवन यात्रा आनंददायी होईल हे मात्र खरे!
अॅड. सुमेधा देसाई