पादत्राणांच्या उद्योगाला हवे बळ, उत्पादन वाढीव, निर्यात अल्पशी
वृत्तसंस्था/कानपूर
भारत जागतिक उत्पादनात अग्रेसर व्हायचा असेल तर मोठी गुंतवणूक व मजबूत पायाभूत सुविधांचीच गरज आहे असे नाही. देशात अशा उद्योगांनाही प्राथमिकता द्यायला हवी जे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करतात, एमएसएमईना मजबूत करतात, निर्यात वाढवतात व देशाच्या विविध क्षेत्रात आर्थिक संधी तयार करत असतात. यात फुटवियर अर्थात पादत्राणांचा उत्पादन उद्योग येतो.
उत्पादन प्रमाण निर्यातीत तफावत
भारत सध्याला पाहता पादत्राणांच्याबाबतीत जगातला दुसऱ्या नंबरचा सर्वात मोठा उत्पादक आणि ग्राहक देश आहे. असे असतानाही उत्पादन क्षमता व जागतिक व्यापारातली हिस्सेदारी यात मोठे अंतर दिसून येते. एका आर्थिक सर्वेक्षणानुसार जागतिक पादत्राणांच्या उत्पादनात भारताची हिस्सेदारी जवळपास 13 टक्के इतकी आहे, पण जागतिक स्तरावर निर्यात मात्र केवळ 2.2 टक्के इतकी आहे.
2.5 अब्ज डॉलर्सच्या पादत्राणांची निर्यात
आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये भारतातून 2.5 अब्ज डॉलर्सच्या पादत्राणांची निर्यात केली गेली आहे. याकडे आव्हान म्हणून बघितले गेल्यास त्यास संधीत रुपांतर करण्यास वाव नक्कीच आहे. भारतात आपल्या उत्पादन क्षमतेचा योग्य वापर करुन जागतिक स्तरावर पादत्राणांच्या बाजारात आपली हिस्सेदारी वाढवता येते. इतर देशांनाही निर्यातीच्या माध्यमातून भारताला आपले योगदान वाढवण्याची संधी आहे.
रोजगार देणारे क्षेत्र
फुटवियर अर्थात पादत्राणांचा उद्योग आणि त्याशीसंबंधीत रोजगाराची व्याप्ती खूप मोठी आहे. इन्वेस्ट इंडियानुसार पाहता हे क्षेत्र 40 लाख जणांना रोजगार देते आहे आणि देशाच्या जीडीपीमध्ये जवळपास 2 टक्के इतके योगदान देत आहे. या उद्योगात गुंतवणूक अधिक झाल्यास रोजगाराच्या संधी वाढवण्याची क्षमताही या उद्योगात आहे, हे लक्षात घ्यायला हवे. अंदाजानुसार 1 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीतून जवळपास 250 जणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. या संधी पादत्राणे निर्मितीसह भागांचा पुरवठा, लॉजिस्टीक्स कंपन्या, पॅकेजिंग उद्योग, रिटेलर्स, डिझाइनर्स, कामगार व हजारो एमएसएमईशी जोडलेल्यांना उपलब्ध होत असतात.