मटण खरेदीसाठी खवय्यांची गर्दी
बेळगाव : होळीच्या दिवशी बेळगाव शहर व उपनगरामध्ये चंद्रग्रहण संपल्यानंतर मटण दुकानांसमोर नागरिकांची गर्दी पहावयास मिळाली. रंगपंचमीच्या संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी काही भागात मटणाचे जेवण बनविण्याची परंपरा आहे. त्यामुळे नागरिक रंगांचा उत्सव साजरा केल्यानंतर सायंकाळी मटण खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मंगळवारी सकाळपासूनच चंद्रग्रहणाचा कालावधी होता. रंगपंचमी आणि ग्रहण यांचा संयोग आल्याने मटण दुकानदारानीही दुकाने बंद ठेवून उत्सवाचा आनंद घेतला. सायंकाळी 7 च्या सुमारास ग्रहण संपताच नागरिकांची पावले मटण दुकानांकडे वळली.
दिवसभर रंगांच्या उधळणीमध्ये रमलेले नागरिक संध्याकाळी मटण, चिकण व मासे खरेदीसाठी दुकांनांसमोर जमले होते. अचानक वाढलेल्या गर्दीमुळे मटण दुकानांसमोर लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. तसेच सुटीचा फायदा घेण्याच्या हेतूने युवकांनी पार्ट्यांचा बेत आखला होता. मटण व इतर मांसाहार खरेदीसाठी नागरिकांची दुकानांसमोर एकच गर्दी पहावयास मिळाली. संध्याकाळी सर्वच दुकानांसमोर जरी गर्दीचा अनुभव आला तरी यावर्षी ग्रहणामुळे मोठ्याप्रमाणात नागरिक मांसाहारापासून दूर झाल्याचे गर्दीवरून दिसत होते. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे मटण, चिकन व मासे खरेदी झाली नसल्याचे दुकांनदारांनी सांगितले.