खाद्यतेलाच्या 'मापात पाप', पॅकिंग मोठे अन् तेल कमी; कंपन्यांची नामी शक्कल
खाद्यतेलाच्या मापात पाप, अजूनही ग्राहकांचे वजन आणि दराकडे दुर्लंक्ष
By : विद्याधर पिंपळे
कोल्हापूर : खाद्यतेल कंपन्यांमधील वाढत्या स्पर्धेतून पॅकिंग तेच मात्र त्यातील वजन घटू लागले आहे. वजनाच्या सेस्ट, पॅकिंगबाबत पुरेशी सुसुत्रता नसल्याने खाद्यतेलाशी निगडीत तक्रारीं महिलांमधून वाढू लागल्या आहेत. नवीन खाद्यतेलाच्या वजनाबाबतची ही संभ्रमावस्था दूर करण्यासाठी सरकारने पॅकिंग वजन आणि तेलाच्या दरामध्ये सुसुत्रता आणण्यासाठी जागरूकता दाखवावी, अशी मागणी पुढे येत आहे.
खाद्यतेल उद्योगामध्ये सध्या वजनाच्या सेस्टबाबत (पॅकींग) सुसुत्रता नसल्याने, मोठी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. दर तोच पण वजन मात्र कमी, असे चित्र बाजारपेठेत दिसत आहे. त्यामुळे खाद्यतेलाच्या पॅकिंगच्या वजन आणि दराबाबत ग्राहकांच्या विशेषत: महिलांकडून तक्रारी येत आहेत. त्यामुळे खाद्यतेलाच्या मापात सुध्दा पाप सुरू आहे. पण अजूनही ग्राहकांचे वजन आणि दराकडे दुर्लंक्ष असल्याचे चित्र आहे.
पूर्वी खाद्यतेल किलोमध्ये विकले जात होते. आता 15 किलोचा डबा अथवा पावशेर (250 ग्रॅम) किंवा अर्धा किलो (500 ग्रॅम) असे खाद्यतेंल विकले जात होते. काळानुसार खाद्यतेल हे पॅकिंगमध्ये आले. तसेच अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या खाद्यतेल उद्योगामध्ये उतरल्या आहेत. त्यामुळे त्याचे पॅकींग आणि वजनही बदलले आहे. तसेच 80 टक्के खाद्यतेल आयात होत आहे. आयात खाद्यतेल रिफायनिंग करून, आपल्या ब्रॅन्डने विकले जात असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात शेंगतेला व्यतिरिक्त सरकी, सुर्यफूल तेलाला मोठी मागणी आहे. तीन वर्षांपूर्वी सरकी, सुर्यफूल खाद्यतेलाचा दर शंभर रूपयांच्या आत होता. त्यानंतर खाद्यतेलाचा दर वाढतच गेला. आता हा दर दुप्पट झाला आहे. त्यामुळे घरातील फोडणीही महाग झाली आहे. काळानुसार खाद्यतेलाचे वजन किलोमधून लिटरमध्ये आले. आता खाद्यतेल ग्रॅममध्ये विकले जाऊ लागले आहे. सध्या बाजारपेठेत खाद्यतेल पॅकिंगचे वजन घटवले असून, दर मात्र आहे तेवढाच आहे. तसेच 15 किलो तेलाचा डबा आता 13.600 किलोचा झाला.
आता हाच डबा 13.00 किलोचा होणार आहे. दर मात्र तोच राहणार आहे. परिणामी ग्राहकांचे 600 ग्रॅमचे आर्थिक नुकसान होणार आहे. आता एक लिटर म्हणजेच 910 ग्रॅमचे खाद्यतेंल पॅकींगमध्ये विकले आहे. आता हे वजन कमी केले आहे. सर्वात जास्त मागणी असलेले सरकी आणि सुर्यफूल खाद्यतेल पॅकांगमध्ये आहे. सध्या बाजारपेठेत सरकी तेलाचा किरकोळ दर लिटरला 145 रूपये तर सुर्यफूलचा दर अंदाजे 158 ते 160 रूपये आहे. कंपनीनुसार नवीन वजनानुसार या खाद्यतेलाचा दर राहणार काय? हा प्रश्न सध्या अनुत्तरीत आहे.
सरकारने ग्राहकांमध्ये जनजागृती करावी
"आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या खाद्यतेलामध्ये अंतर्गत स्पर्धा सुरू आहेत. कायद्यातील पळवाट काढून, या कंपन्या वजन कमी करू लागल्या आहेत. या नवीन वजनाची गरज नाही. त्यापेक्षा पूर्वीचे 250, 500, 1000 ग्रॅममध्येच खाद्यतेलाचे पॅकींग असावे, यासाठी पॅकींगवरील वजन आणि दराबाबत सरकारने जागरूकता आणावी."
- हितेश कापडिया, कोल्हापूर प्रतिनिधी (अखिल भारतीय खाद्यतेल असोसिएशन)
- वजनाच्या सेस्ट, पॅकिंगबाबत सुसूत्रतेचा अभाव
- नवीन खाद्यतेल वजनाबाबत महिलांकडून तक्रारी वाढल्या
- पॅकिंग वजन आणि दराबाबत सरकारने जागरूकता दाखवावी
- बहुराष्ट्रीय कंपन्यांतील स्पर्धामुळे पॅकिंगचे वजन घटले