खाद्यपदार्थ बाजारपेठ : उलाढाल 2 लाख कोटींची होणार
बेन अँड कंपनी, स्विगीच्या अहवालात माहिती : 2030 पर्यंत साध्य
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय खाद्यपदार्थ पुरवठा बाजारात सध्याला बहर आला असून आगामी काळात 2030 पर्यंत ही बाजारपेठ 2 लाख कोटींची होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. खाद्यपदार्थ पुरवठ्यात ऑनलाइन सेवांचा वाटा हा 20 टक्के इतका असणार आहे.
भारतीय खाद्यपदार्थ पुरवठा क्षेत्र वार्षिक स्तरावर 18 टक्क्यांनी विकसित होत असून 2030 पर्यंत या क्षेत्राची बाजारातील उलाढाल वर म्हटल्याप्रमाणे 2 लाख कोटी रुपयांवर पोहचेल. हा अंदाज बेन अँड कंपनी आणि स्विगी यांच्या संयुक्त अहवालात नोंदवण्यात आला आहे.
ऑनलाइन सेवा क्षेत्राचा वाटा वाढणार
हॉटेलांतून खाद्यपदार्थ मागवण्याचे प्रमाण भारतात दिवसेंदिवस वाढत असून ऑनलाइन खाद्यपदार्थ सेवा देणाऱ्या क्षेत्राचा वाटा 20 टक्क्यापर्यंत पुढील 7 वर्षात पोहचू शकतो, असे अहवालात म्हटले आहे. सध्याला हे प्रमाण 12 टक्के आहे. देशातील खाद्यपदार्थ पुरवठा करण्याच्या प्रक्रियेत 2023 च्या अखेरच्या टप्प्यात काहीशी संथता आली होती. पण असे जरी असले तरी 2024 च्या सुरुवातीपासून खाद्यपदार्थ पुरवठा उद्योग पुन्हा उभारी घेत आहे.
स्विगी, झोमॅटोचे प्रस्थ
सध्याला बाजारात स्विगी आणि झोमॅटो या दोन कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात खाद्य पदार्थांचा पुरवठा केला जात आहे. परवा टीट्वेंटीच्या अंतिम सामन्यात तर ग्राहकांनी विक्रमी स्तरावर ऑनलाइन खाद्य पदार्थांची ऑर्डर घरी मागवल्याची बाब समोर आली आहे. झोमॅटो व स्विगीचे कर्मचारी त्यादिवशी सर्वात व्यस्त होते.