For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अन्नसाखळी

06:09 AM Dec 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
अन्नसाखळी
Advertisement

अध्याय तिसरा

Advertisement

ब्रह्मदेवानी लोकांना सांगितले की, स्वधर्माचे आचरण केल्याने देव तृप्त होतील आणि तुम्हाला प्रिय व हितकर अशा भोग वस्तू देतील. त्यांचा उपभोग घेण्याचा मोह तुम्हाला होईल परंतु त्यांचा उपभोग स्वत: घेण्यापूर्वी देवांचा वाटा त्यांना द्या. स्वधर्माचे पालन करून जे फळ मिळेल त्यांतून याचक, गरजू ह्यांना काही भाग देऊन उर्वरित भाग जे स्वत:च्या चरितार्थासाठी वापरतात ते महान पुरुष सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्त होतात. जे स्वत:साठीच ते धन वापरतात ते अन्नाच्या रूपाने केवळ पापच भक्षण करत असतात. इतरांना त्यांचा उचित वाटा देऊन, जे उर्वरित भाग खातात त्यांचा स्वधर्माचा यज्ञ सिद्धीस जातो आणि परमेश्वरही संतोष पावतो, असे अन्न ब्रम्हरूप असते कारण अन्न हे सर्व जगाला जगण्याचे साधन आहे.

ज्याप्रमाणे ब्रह्मनिष्ठ माणसाला ब्रह्म हे सर्वत्र भरून राहिलेले आहे ह्याची खात्री असल्याने त्याला इतर कुणीही काहीही सांगितले तरी त्याच्या मनावर त्याचा कोणताही परिणाम होत नाही त्याप्रमाणे यज्ञशेष सेवन करणाऱ्याच्या हातून गैरकृत्य कधीच घडत नसल्याने तो पापाच्या तडाख्यात सापडत नाही. म्हणून स्वधर्माच्या आचरणाने जे मिळेल, त्याचा विनियोग स्वधर्मासाठीच करावा. मग जे शिल्लक राहील, त्याचा संतोषाने उपभोग घ्यावा. जे अन्न इतरांना वाटून उर्वरित भाग खाल्ल्याने स्वधर्माचा यज्ञ सिद्धीस जातो आणि परमेश्वरही संतोष पावतो, ते अन्न ब्रह्मरूप असते कारण अन्न हे सर्व जगाचे जगण्याचे साधन आहे.

Advertisement

आपण म्हणजे देह आहोत आणि विषय हे उपभोग घेण्यासाठी आहेत असे समजणारे, बहकलेले लोक आपल्याजवळ असलेली संपत्ती देवाची आहे हे लक्षात न घेता त्याचा स्वत:साठी वापर करतात. स्वत:ला आवडणारे चविष्ट पदार्थ तयार करतात आणि त्याचे सेवन करतात, फक्त आपल्यापुरते पाहणारे हे पापी लोक, या पदार्थाच्या रूपाने पातकांचेच सेवन करत असतात असे समज. वास्तविक पाहता जेवढी आपली संपत्ती आहे, ती सर्व यज्ञात उपयोगी पडणारी सामग्री आहे, असे समजावे आणि ती संपत्ती स्वधर्मयज्ञाने आदिपुरुषाला अनासक्त भावनेने अर्पण करावी.

ब्रह्मदेवानी पुढील श्लोकात अन्नसाखळी कशी काम करते ते सांगायला सुरवात केली. ते म्हणाले, अन्नापासून सर्व प्राणी उत्पन्न होतात, अन्नाची उत्पत्ती पावसापासून होते, पाऊस हा यज्ञापासून उत्पन्न होतो आणि तो यज्ञ कर्मापासून उत्पन्न होणारा आहे.

अन्नापासूनि ही भूते पर्जन्यातूनि अन्न ते । यज्ञे पर्जन्य तो होय यज्ञ कर्मामुळे घडे ।। 14 ।।

श्लोकाच्या विवरणात माऊली म्हणतात, अन्नापासून सर्व प्राणिमात्रांची वाढ होत असते आणि पावसापासून अन्न निर्माण होते. त्या पावसाची उत्पत्ती यज्ञापासून आणि यज्ञ कर्मापासून प्रकट होते कर्माची उत्पत्ती वेदरूप ब्रम्हापासून होते.

अन्नसाखळी बद्दल सांगणे पुढील श्लोकात भगवंतानी चालू ठेवले असून ते म्हणाले, कर्म हे वेदांपासून उत्पन्न झालेले आहे. वेद अविनाशी परमात्म्यापासून उत्पन्न झालेले आहेत म्हणून सर्वव्यापी परमात्मा सदैव यज्ञामध्ये प्रतिष्ठीत असतो.

प्रकृतीपासुनी कर्म ब्रम्ही प्रकृति राहिली । ऐसे व्यापक ते ब्रम्ह यज्ञात भरले सदा ।। 15 ।।

श्लोकाच्या विवरणात माऊली म्हणतात, ह्या वेदांची उत्पत्ती अविनाशी अशा ब्रह्मापासून होते म्हणून हे चराचर विश्व ब्रह्मामध्ये सामावलेले आहे. हे सुभद्रापती अर्जुना! ऐक. कर्माचे मूर्त स्वरूप असलेल्या यज्ञामध्ये सर्व वेद तात्पर्यरूपाने निरंतर राहत असतात.

क्रमश:

Advertisement

.