'अन्न व औषध'च्या कारवाया संशयास्पद
कोल्हापूर :
जनतेच्या जीवनाशी, खाद्याशी निगडीत असणारे, कोल्हापूरचे अन्न व औषध प्रशासन काही वर्षांपासून वादग्रस्त ठरत आहे. जनतेचे आरोग्य घडवण्यापेक्षा बिघडवण्याचे काम या खात्याकडून सुरू आहे. आजपर्यंत झालेल्या अन्न व औषध विभागाच्या कारवाया आता वादग्रस्त व संशयास्पद होऊ लागले असल्याची चर्चा सुरू आहे. आजअखेर झालेल्या कारवायामधून काय निष्पण्ण झाले ? हे अजून तरी गुलदस्त्यात आहे. कारवायापेक्षा हे अधिकारी ‘वसुली’ च्या मागे असल्याने, यातून अनेक अधिकारी ‘जाळ्यात’ अडकले आहेत. यामध्ये महिला अधिकाऱ्यांच्या ही समावेश असल्याचे चित्र दिसून येत आहे.
दोन वर्षापूर्वी कोल्हापुरात झालेली अग्नीवीर सैन्य भरतीत युवकांकडून उर्जावर्धक स्टेरॉईड इंजेक्शनचा वापर केला होता. यामध्ये किमान 12 तास तरी उर्जा व उत्साह टिकून राहतो. हे इंजेक्शन कोणत्या कंपनीचे आहे. त्याचे डिस्ट्रीब्युटर्स कोण, चिठ्ठी देणारे डॉक्टर कोण याची माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घेतली होती. यातून शाहूपुरी येथील एका मुख्य औषध डिस्ट्रीब्युटर्सचे नाव बाहेर आले. त्याच्यावर काय कारवाईं झाली का? हे अजूनही गूढ आहे. काही दिवसापूर्वी एका मोहिमेत अन्न पदार्थ उत्पादक, कोल्ड स्टोरेज, घाऊक विक्रेते, हॉटेल्सच्या तपासण्या केल्या. यात अनेक गंभीर त्रुटी आढळल्या, पण पुढे काय झाले? हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.
बनावट गोळ्यांचा पुरवठा करणारा विक्रेता मोकाट
कोल्हापुरातील शासकीय दवाखान्याच्या औषध पुरवठ्यामध्ये अनेक घोटाळे उघडकीस आले. तर दुसरीकडे कोल्हापुरातूनच बनावट औषध गोळ्यांचा पुरवठा राज्यभरामध्ये सुरू असल्याचे उघडकीस आले. या औषधाचा विक्रेता ‘विशाल’ होलसेलदार असून त्याच्यावर कोणतीच कारवाई झालेली नसून उलट अन्न व औषध विभागाचा वरदहस्त असल्याची चर्चा आहे. वर्धा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये या बनावट औषध गोळ्यांचा पुरवठा कोल्हापुरातील या होलसेल औषध विक्रेत्याकडून होत आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या अहवालामधून हे उघडकीस आले असून, या गोळ्या बनावट असल्याचे जाहीर केले आहे.
गुलालाबाबत अन्न व औषध विभाग अनभिज्ञ
होळी, यात्रा व निवडणुकीमध्ये उधळण्यात येणारा गुलाल आता नुकताच ज्वलनशील ठरला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महागाव येथील मिरवणुकीमध्ये उमेदवाराचे औक्षण करताना, गुलालामुळे आगीचा भडका उडाला. यामुळे गुलालाचे उत्पादन व विक्री कोणत्या कायद्यानुसार होते ? हे वादग्रस्त ठरू लागले आहे. गुलाल उत्पादन व विक्रीबाबत कोणता नियम आहे की नाही ? याबाबत अन्न व औषध विभाग अनभिज्ञ असल्याचे दिसून येते. या प्रकरणामुळे होळी, यात्रा व निवडणुकीमध्ये विक्री होणाऱ्या गुलालाची तपासणी होणार काय? हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
केकचा रिपोर्ट कधी येणार ?
गेल्या आठवड्यात केकमुळे दोन चिमुकल्यांना आपला जीव गमवावा लागला. वाढदिवस, उत्सव, विवाह, नाताळसाठी केकची मोठी विक्री होत असते. यामध्ये 30 ते 40 प्रकारचे व विविध आकारातील केकला मोठी मागणी असते. हा केक ंपुठठयाच्या पांढऱ्या वा इतर बॉक्समधून विकला जातो. पण या बॉक्सवर न्यूट्रीशन व्ह्@ल्यू म्हणजे प्रॉडक्शन डेट, एक्स्पायरी डेट, त्याचा दर्जा, यामध्ये कोणते घटक वापरले जातात याचा कोणताच उल्लेख नसतो. याकडे अन्न व औषध प्रशासन ‘अर्थ’पूर्वक दुर्लक्ष करत असून, याच रिपोर्ट कधी मिळणार याची प्रतिक्षा आता जनतेला लागून राहिली आहे.
अपुरे कर्मचारी व प्रलंबित निर्णय
गेल्या दोन वर्षांत स्टेरॉईड इंजेक्शन, बनावट औषधे व गुलाल याबाबतच्या कारवाया सुरू आहेत. स्टेरॉईड इंजेक्शन विक्रेत्याचे दुकान सील केले होते. पण त्या डिस्ट्रीब्युटर्सने मंत्र्यांकडे अपिल केली आहे. नवीन मंत्रीमंडळानंतरच पुढील निर्णय होणार आहे. बनावट औषध गोळ्यांची खरेदी-विक्रीबाबत विशाल डिस्ट्रीब्युटर्सचे मालक यांच्यावर वर्धा येथे एफआयआर नोंद झाली. कोल्हापुरात याची तक्रार दाखल झाल्यानंतर पुढील कारवाई होईल. गुलालाचे सँपल घेतले असून, याची तपासणी केली. गुलाल हा सौंदर्य प्रसाधनामध्ये येत नसल्याने, कारवाई कोणत्या नियमावर करता येईल हे अजून स्पष्ट झालेले नाही. केक हा अन्न विभागाकडे असून, याचे रिपोर्ट अजून आलेला नाही. अपुऱ्या कर्मच्याऱ्यावर या विभागाचे काम सुरू आहे.
मनोज अय्या, सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन