पोटार्थ आणि परमार्थ
पोटाचा यज्ञ सुरू आहे तोपर्यंतच शरीराचे जीवन आहे. हा यज्ञ बंद होईल तेव्हा शरीराचा मृत्यू होईल. म्हणूनच म्हटले आहे उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म. आपले भोजन हे पोटाचे यज्ञकर्म आहे. आयुष्यभर पोटासाठी माणसाची धडपड चालते. त्यात बऱ्याचदा वणवण फिरावे लागते. पोटाचे निमित्त करून दिवसरात्र पैसा जमवणे हेच एक उद्दिष्ट समाजात दिसते.
श्रीमद् भगवद् गीतेच्या तिसऱ्या अध्यायात भगवंताने यज्ञसंकल्पना सांगितली आहे. त्यात ते म्हणतात, परमेश्वराने प्रजा उत्पन्न केली आणि यज्ञ निर्माण केले. यज्ञ केल्याने कामनापूर्ती होईल. मनुष्य यज्ञ करून देवाला तृप्त करेल आणि देव उपभोग घेऊन मनुष्याला संतुष्ट करतील. एकमेकांना सहाय्य केल्याने साऱ्यांचे कल्याण होईल. पुरुषार्थबोधिनी टीकेमध्ये पद्मभूषण भट्टाचार्य डॉ. श्रीपाद दामोदर सातवळेकर यांनी यावर अप्रतिम विवेचन केले आहे. ते म्हणतात, ‘आपल्या शरीरात स्वभावत: यज्ञ सुरू असतो. आपले शारीरिक जीवन हे पूर्णपणे यज्ञावरच अवलंबून आहे. शरीराचे सगळे अवयव आपापल्या शक्तीची पराकाष्ठा करून नि:स्वार्थपणे कार्य करीत आहेत.
आत्मसमर्पण हाच अवयवांचा यज्ञ आहे. डोळे दर्शनशक्तीचे समर्पण शरीराच्या कल्याणासाठी करतात; त्याप्रमाणे कान, नाक, हात, पाय, सर्व इंद्रिये आपापली कार्ये स्वार्थ न बाळगता करीत आहेत.’ ते पुढे म्हणतात, तोंडाने खाऊन पोटाकडे पाठवून दिलेले अन्न पोट पचवून त्याचा रस बनवून रक्त तयार करून सर्व शरीरातील अणुरेणूंकडे पाठवून देते. समजा पोटाने हे याज्ञिक कार्य बंद केले आणि माझ्याकडे आलेले अन्न फक्त माझे आहे असे समजून अन्न पोटातच राखून ठेवण्यास आरंभ केला तर पोट फुगून, वातप्रकोप वाढून शेवटी मृत्यूला सामोरे जावे लागेल. पोटाचा यज्ञ सुरू आहे तोपर्यंतच शरीराचे जीवन आहे. हा यज्ञ बंद होईल तेव्हा शरीराचा मृत्यू होईल. म्हणूनच म्हटले आहे उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म. आपले भोजन हे पोटाचे यज्ञकर्म आहे.
आयुष्यभर पोटासाठी माणसाची धडपड चालते. त्यात बऱ्याचदा वणवण फिरावे लागते. पोटाचे निमित्त करून दिवसरात्र पैसा जमवणे हेच एक उद्दिष्ट समाजात दिसते. या प्रवृत्तीवर जगद्गुरू संत तुकाराम महाराज कठोर प्रहार करतात. एका अभंगात ते म्हणतात, ‘पोटासाठी खटपट करिसी अवघा वीळ । राम राम म्हणता तुझी बसली दातखीळ?’ अरे बाबा, दिवसभर सर्वकाळ पोटासाठी मेहनत करतोस, परंतु रामनाम घेण्यासाठी तुझी दातखीळ बसते. नंतर महाराज अतिशय कठोरतेने म्हणतात, ‘हरीचे नाम कदाकाळी का रे न ये वाचे । म्हणता राम राम तुझ्या बा चे काय वेचे ?’ तू वाचेने कधीही राम राम म्हणत नाहीस. राम म्हटल्याने तुझ्या बापाचा काही खर्च होतो की काय? द्रव्यासाठी, त्याच्या आशेसाठी तुला हिंडताना दाही दिशा पुरत नाहीत आणि कीर्तनाला जाताना तुझा देह जड होतो काय रे? संत तुकोबाराय यानंतर तर आसूडाचे प्रहार करतात. ते म्हणतात, ‘तुका म्हणे ऐशा जीवा काय करू आता?। राम राम न म्हणे त्याचा गाढव मातापिता?’ रामनाम न घेणाऱ्या जिवाचे माता-पिता गाढव आहेत असे समजा.
परमात्म्याने पोट दिले आहे म्हणून त्याची चिंता तर करावीच लागते. तसे न करून कसे चालेल? उपाशीपोटी मन आणि देह परमात्म्याच्या भजनाकडे वळत नाही. संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘पोटापुरते काम । परि अगत्य तो राम?’ उदरभरणसाठी तू काम कर चिंतनात मात्र सतत राम ठेव. ‘प्रारब्धी हेवा । जोडी देवाची ती सेवा?’ प्रारब्धामध्ये देवाच्या भजनाने धन मिळावे ही इच्छा निर्माण कर. शक्ती व बुद्धी खर्च करून पांडुरंगाला चित्तात साठव. जे पोटासाठी परमार्थाचा वेध घेतात अशा नाटकी लोकांचे तोंडसुद्धा पाहू नये, असे महाराज म्हणतात. पैशासाठी जे भजन कीर्तन करून लोकांना भुलवतात ते कथा करणारे आणि पैसे देऊन ती कथा ऐकणारे दोघेही नरकात जातात.
षोडशोपचार पूजेमध्ये नैवेद्य हा एक उपचार आहे. बरेचदा त्यालाच जास्त महत्त्व दिले जाते. भक्ती, उपासना, नामजप यापेक्षा नैवेद्यात काय करायचे याची चर्चा जास्त होते. माणूस खाण्याची चिंता जास्त करतो. संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘नित्य उठोनिया खावयाची चिंता’..चिंता कशाची वाटायला हवी? तर, ‘काय मी उद्धार पावेन । काय कृपा करील नारायण?’ दुर्मिळ असा नरदेह लाभला आहे तर त्याचे सोने होईल का? नारायण कृपा करेल का? तुकोबाराय म्हणतात, परमेश्वरा, तुझे भजन करण्यासाठी, बुद्धी स्थिर राहण्यासाठी मला फक्त पोटापुरते दे. ‘पोटापुरते देई । मागणे लई नाही, लई नाही । पोळी साजूक अथवा शिळी । देवा देई भुकेच्या वेळी?’ पोळी ताजी असो वा शिळी, ती भुकेच्या वेळी मिळावी ही अपेक्षा आहे. ‘कळणा अथवा कोंडा । आम्हा देई भुकेच्या तोंडा । तुका म्हणे आता । नका करू पाया परता’. कळणा म्हणजे गरिबांचे अन्न. कोंडा म्हणजे धान्य काढताना जे भूस येते ते. हे एवढे फक्त भुकेच्या वेळी दे. तेवढेच पुरे. मी जास्त काही मागत नाही. मला तुझ्या पायापासून दूर करू नको.
माणसाचा जन्म हा मातेच्या उदरात आहे. जगताना पोट हे मध्यवर्ती आहे. नुसते खाण्यासाठी नाही, तर जगण्याचे मर्मही ते सांगते. एक सांप्रदायिक भजन आहे... ‘राम कृष्ण नरहरी विठोबा, राम कृष्ण नरहरी । कधी करशील बा दया दयाळा, गर्भवास हा पुरे ?’ गर्भवासाचे दु:ख नको म्हणून सर्व संतांची विनवणी आहे. संत तुकाराम महाराजांनी विठ्ठलाकडे जे पसायदान मागितले आहे त्यात ते गर्भवास मागतात. महाराज म्हणतात, ‘हेचि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा । न लगे मुक्ती धनसंपदा । संतसंग देई सदा?’. तुझा कधीही विसर पडू नये हे दान दे. मोक्ष, मुक्ती, धनसंपदा यांपेक्षा हा लाभ मला मिळू दे. ‘तुका म्हणे गर्भवासी । सुखे घालावे आम्हासी?’ तुझ्या नामाचे दान देशील तर गर्भवासाचे दु:ख हे दु:ख कसे राहील? भक्तीच्या पोटी शाश्वत आनंदाचा जन्म आहे. तुकोबाराय म्हणतात, ‘पाठीपोटी देव । कैसा हरिदासा भेव?’ मागेपुढे देव उभा असल्यावर भक्तांना भीती कसली? भयभीत न होता आनंदाने नामसंकीर्तन करा. नामात दंग असल्यावर तो काळ काय बळ करू शकेल? महाराज म्हणतात, आमचा देव सर्वगुणसंपन्न हा जवळ उभा असल्यावर आम्हाला काय कमी आहे?
संत सावता माळी यांच्या चरित्रात एक आख्यायिका आहे. एकदा संत ज्ञानदेव व संत नामदेवांना घेऊन विठोबा लहूळ या गावी कुर्मदासाला भेटायला चालला होता. वाटेत सावता माळी यांचे गाव व मळा लागला, तेव्हा या दोघांना सावतोबा यांचा परमार्थिक अधिकार कळावा म्हणून विठोबाने एक लीला केली. विठोबा या दोघांना म्हणाला, तुम्ही इथेच थांबा. मी सावताला भेटून येतो. ते तिथेच थांबले आणि विठोबा मळ्यात जाऊन सावतोबाला म्हणाला, माझ्यामागे चोर लागलेत. मला कुठेतरी पटकन लपव. तेव्हा क्षणाचाही विचार न करता सावतोबाने आपले पोट विळ्याने चिरले आणि तो विठोबाला म्हणाला, लप माझ्या पोटात. मग विठोबाने बालरूप धारण केले आणि त्याच्या पोटात प्रवेश केला. थोड्यावेळाने विठोबाचा शोध घेत ज्ञानोबा व संत नामदेव मळ्यात आले आणि विठोबाची चौकशी करू लागले. सावता भजनात दंग होता तो काही बोलेना तेव्हा संत नामदेवांनी आर्ततेने पांडुरंगाला हाक मारली. त्यावेळी पांडुरंग सावतोबाच्या पोटातून बाहेर आला. संत तुकोबारायांचा एक अभंग आहे- ‘ऐके ऐके गे विठ्ठले । आम्ही तुझे काय केले?’ विठ्ठला, तू एकनाथ महाराजांकडे पाणी भरलंस. ते काय तुझे काका आहेत? कबीरांचे शेले विणलेस. ते काय तुझे मामा आहेत? नंतर म्हणतात, ‘सावता माळी काय बाप? । त्याचे उदरी झाला गप?’ तू सावतामाळ्याच्या पोटात गडप झालास. तो काय तुझा पिता होता?
चुका पोटात घेणारा, काळाचे भय नाहीसे करून पोटात गोळा उठू न देणारा आणि पोटात फक्त प्रेम असणारा, संतांना पाठीपोटाशी घेणारा लेकुरवाळा विठोबा! त्याला प्रार्थना करावी-‘पोटी तुझे नाम असो आणि तेच ओठी येवो. बाकी पोट रिकामे असू दे.’
- स्नेहा शिनखेडे