फाेंड्याच्या लाडक्या डॉक्टरची ‘एक्झिट’
डॉ. केतन भाटीकर यांच्यावर अंत्यसंस्कार’: अंत्यदर्शनाला लोटला हजारोंचा जनसमुदाय : अनमोड येथे सर्पदंशामुळे निधन
फोंडा : साश्रू नयनांनी आणि भरल्या अंत:करणाने फोंड्याचे लाडके डॉ. केतन भाटीकर यांना शुक्रवारी सायंकाळी अखेरचा निरोप देण्यात आला. केवळ फोंड्यातूनच नव्हे तर संपूर्ण गोव्यातून आणि परराज्यातूनही हजारो चाहत्यांनी अंत्यदर्शनाला उपस्थिती लावली. फोंड्याचा बुलंद आवाज आता कायमचा बंद झाल्याच्या प्रतिक्रिया यावेळी व्यक्त करण्यात आल्या. अवघ्या 41 वर्षांच्या आयुष्यात एक यशस्वी फिजिओथेरेपी डॉक्टर म्हणून नावलौकिक मिळवतानाच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपल्या उत्तुंग कार्याचा ठसा उमटवणाऱ्या डॉ. केतन भाटीकर यांनी अचानक जगाचा निरोप घेतला आहे. गुरुवारी रात्री उशिरा दांडेली येथून अनमोडमार्गे फोंडा येथील घरी परतताना वाटेत सापाने दंश केल्याने त्यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदनात फुरशे किंवा नागाचा दंश झाल्याचे स्पष्ट होत असून त्याबद्दल सविस्तर खुलासा होण्यासाठी रक्तातील विषाचे नमुने हरियाणा येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येतील.
मुख्यमंत्र्यांसह, केजरीवालांनी घेतले अंत्यदर्शन
अंत्यदर्शनाला उपस्थिती लावलेल्या मान्यवरांमध्ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल, दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, मगो पक्षाचे नेते तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर, मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर, बांधकाममंत्री दिगंबर कामत, जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर, समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, दक्षिण गोव्याचे खासदार विरियातो फर्नांडिस, आमदार विजय सरदेसाई, गोविंद गावडे, जीत आरोलकर, कार्लोस फेरेरा, एल्टन डिकॉस्ता यांच्यासह अन्य आजी माजी आमदार व मंत्री तसेच विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी उपस्थिती लावली. डॉ. केतन भाटीकर यांनी हल्लीच काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता व फोंडा मतदारसंघातील विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसतर्फे उमेदवारी केली होती. त्यामुळे काँग्रेस पक्षाचा झेंडा त्यांच्या पार्थिवावर घालून मानवंदना देण्यात आली.
शुक्रवारी पहाटे आली दु:खद वार्ता
डॉ. भाटीकर यांच्या निधनाची वार्ता शुक्रवारी पहाटे सर्वत्र पसरल्यानंतर सकाळपासूनच साईनगर दुर्गाभाट, फोंडा येथील निवासस्थानी सकाळपासूनच लोकांची गर्दी उसळली. भर उन्हात घराबाहेर थांबलेले हजारो चाहते व हितचिंतकांना डॉ. भाटीकर यांच्या अत्यंदर्शनासाठी आस लागली होती. त्यामध्ये हिंदू, ख्रिस्ती व मुस्लीम या सर्व धर्मीय चाहत्यांचा समावेश होता. दुपारी 2.45 वा. सुमारास त्यांचे पार्थिव निवासस्थानी पोहोचले.
अंत्यदर्शनासाठी गर्दी
अंत्यदर्शन घेण्यासाठी एकच झुंबड उडाली. गर्दीवर नियंत्रण ठेऊन सर्वांना आतमध्ये पाठविणे अवघड बनल्याने अखेर त्यांचे पार्थिव फुलांनी सजवलेल्या वाहनातून राजीव गांधी कलामंदिरसमोर ठेवण्यात आले. ‘डॉ. केतन भाटीकर अमर रहे’ अशा घोषणा देत फोंडा शहरातून वारखंडे येथील मुक्तीधाम स्मशानभूमीपर्यंत अंत्ययात्रा काढण्यात आली. वडील किर्तीकुमार प्रभू भाटीकर यांनी चितेला मंत्राग्नी दिला. डॉ. भाटीकर हे अविवाहित होते. त्यांच्या पश्चात वडील किर्तीकुमार प्रभू भाटीकर, आई निवृत्त मुख्याध्यापिका कादंबरी भाटीकर, थोरले बंधू शिरोडा कामाक्षी देवी हॉमियोपॅथी इस्पितळाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कौतुक भाटीकर व भावजय असा परिवार आहे.
डॉ. केतन भाटीकर यांनी गेल्या बारा वर्षांच्या समाजकार्यातून तळागाळातील लोकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले होते. लोकांच्या अडीअडचणींना अहोरात्र धावणारे व सर्व स्तरातील समाजघटकांना विविध प्रकारे सेवा देणाऱ्या भाटीकरांबद्दल एकप्रकारची आपुलकी व आधार वाटत होता. त्यांच्या आकस्मिक जाण्याने फोंड्यातील विविध समस्यांवर सातत्याने आवाज उठविणारा हा आधारच गेल्याची भावना अनेकांच्या मनात निर्माण झाली आहे. त्यामुळे अंत्यदर्शन घेताना अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या तर काहींना आपले हुंदके अनावर झाले. त्यांची ही अकाली एक्झिट मनाला कायमचा चटका लावून गेली. त्यांच्या जाण्याने फोंड्याच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात निर्माण झालेली पोकळी कधीच भऊन येणारी नाही, अशा प्रतिक्रियाही व्यक्त करण्यात आल्या.
फिजिओथेरेपी घरोघरी पोचविण्यात मोलाचा वाटा
फिजिओथेरेपिस्ट म्हणून डॉ. भाटीकर यांची व्यावसायिक कारकीर्दही अत्यंत यशस्वी ठरली होती. फिजिओथेरेपीचा गोव्यात अत्यंत प्रभावीपणे प्रचार आणि प्रसार करण्यात ते अग्रेसर होते. ही उपचार पद्धती सर्वसामान्यपर्यंत पोचविण्याचे श्रेय त्यांनाच द्यावे लागेल. अनेक गरजूंवर मोफत उपचार करून आपल्या व्यवसायाला समाजसेवेची जोडही त्यांनी दिली होती. रणजी क्रिकेट संघ यासह राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रीडा स्पर्धांमध्ये फिजिओ म्हणून त्यांनी काम पाहिले होते. त्यांच्या प्रेरणेतून अनेक युवा युवती या क्षेत्रात वळल्या असून काहींनी शिक्षण पूर्ण कऊन आपला स्वत:चा व्यावसायही सुऊ केला आहे. गोवा क्रिकेट संघटनेवर त्यांनी कार्य केले होते.
दीड वर्षांत तीघांची ‘एक्झिट’... 15 तारीख !
मागील दीड वर्षांत फोंडा मतदारसंघातून आकस्मिक मृत्यू झालेल्या राजकीय नेत्यांपैकी भाटीकर हे तिसरे आहेत. जरी ते आमदार किंवा कुठल्याही पक्षाचे पदाधिकारी नसले तरी फोंड्याच्या राजकारणावर त्यांचा प्रभाव होता. आणखी एक दुर्दैवी योगायोग म्हणजे हे तीनही नेते गेले ती तारीख 15 होती. गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात 15 तारखेला फोंड्याचे माजी आमदार लवू मामलेदार यांचा बेळगाव येथे आकस्मिक मृत्यू झाला. त्यानंतर ऑक्टोबरच्या 15 तारखेला फोंड्याचे आमदार व माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांनी अशीच अचानकपणे एक्झिट घेतली आणि आता डॉ. भाटीकर यांचा झालेला धक्कादायक मृत्यू या सर्व घटना 15 तारखेला घडलेल्या आहेत.
डॉ. भाटीकरांच्या रक्ताचे नमुने पाठविणार हरियाणात,तीन डॉक्टरांच्या पॅनलने केले शवविच्छेदन
डॉ. केतन भाटीकर यांचा मृत्यू हा सर्पदंशाने झाल्याचे निदान शवविच्छेदनातून झाले असले तरी त्यांना नेमक्या कोणत्या प्रकारच्या सापाने दंश केला होता हे स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे सखोल तपासणीसाठी त्यांच्या रक्ताचे नमुने हरियाणा येथील प्रयोगशाळेत पाठवले जाणार असल्याची माहिती डॉक्टरांकडून मिळाली. भाटीकर यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र बोरकर यांनी तीन डॉक्टरांचा गट गठीत केला. या गटात डॉ. आंद्रे व्ही. फर्नांडिस (प्राध्यापक व विभागप्रमुख, न्यायवैद्यकशास्त्र विभाग, गोवा वैद्यकीय महाविद्यालय), डॉ. सुनील चिंबलकर (व्याख्याता, न्यायवैद्यकशास्त्र विभाग, गोवा वैद्यकीय महाविद्यालय) व डॉ. सियानो फर्नांडिस (वरिष्ठ रोगशास्त्र, दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय) यांचा समावेश होता. डॉ. केतन भाटीकर व डॉ. मधु घोडकिरेकर यांची खूप जवळची मैत्री. काल जेव्हा डॉ. भाटीकर यांना सर्पदशांने मृत्यू झाला, तेव्हा शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. याठिकाणी डॉ. मधु घोडकिरेकर हे शवविच्छेदन करतात. मात्र, जवळच्या मित्राचे शवविच्छेदन करण्यासाठी त्यांच्या मनाची तयारी होईना. तसेच फोंड्यातील राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन तीन डॉक्टरांचे पॅनल गठीत करून शवविच्छेदन करावे, असा प्रस्ताव त्यांनी दिला. त्यानंतर पॅनल गठीत करून शवविच्छेदन करण्यात आले.