For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

संतांच्या उपदेशानुसार चालणे

06:59 AM Aug 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
संतांच्या उपदेशानुसार चालणे
Advertisement

अध्याय आठवा

Advertisement

भगवंत म्हणाले, मृत्यूसमयी माणसाचे मन ज्या गोष्टीभोवती स्थिर झालेले असते त्याचे त्या गोष्टीत रुपांतर होते. ह्या अर्थाचा जो जो आठवुनी भाव शेवटी देह सोडितो। मिळे त्या त्या चि भावास सदा त्यांत चि रंगला ।।6।। हा श्लोक आपण अभ्यासत आहोत. श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतांनी असं सांगितलं की, अंतकाळी माझी आठवण करून जे देहत्याग करतात ते मद्रूप होतात. वाघ पाठीमागे लागलेला मनुष्य सैरावैरा धावत असताना अचानक पाय घसरून आडात पडला त्याप्रमाणे मृत्यूच्या प्रसंगी जीवाला जे काही आठवते त्याप्रमाणे होणे कोणत्याही प्रकारे चुकत नाही. जेव्हा मनुष्य जागा असतो त्यावेळेला ज्याचा ध्यास त्याने घेतलेला असतो तेच त्याला स्वप्नात दिसते. त्याप्रमाणे ज्या ज्या वस्तूचे स्मरण करत मनुष्य अंतकाली देहाचा त्याग करतो, त्या वस्तूवर त्याचे चित्त एकाग्र झाल्याने तो तीच वस्तू होतो. आवडीने अंत:करणात राहणाऱ्या गोष्टीची मरताना आठवण होत असल्याने त्याच वस्तूच्या गतीला मनुष्य जातो, म्हणून अर्जुना तू नेहेमी माझेच स्मरण कर. भगवंतांनी नेहमी माझे स्मरण करा असे सांगितले पण काही मंडळी त्यातून गैर अर्थ काढून इतर कामधंदे बाजूला ठेऊन देवाने त्याचे स्मरण करायला सांगितले आहे असे म्हणतील. लोकांच्या ह्या म्हणण्याला उत्तर म्हणून पुढील श्लोकात भगवंत सांगतात की, अर्जुना सर्व प्रसंगी माझे स्मरण कायम ठेव आणि युद्ध कर. मन व बुद्धी माझ्या ठिकाणी अर्पण करून राहिलास म्हणजे तू नि:संशय मलाच येऊन मिळशील. येथे भगवंत अर्जुनाला युद्ध करणे हे त्याचे कर्तव्य आहे आणि ते त्याने केले पाहिजे हे सांगायला विसरत नाहीत. म्हणूनि सगळा काळ मज आठव झुंज तू। मन बुद्धि समर्पूनि मज नि:शंक

पावसी ।। 7 ।। श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितले की, जीवनातले सर्व व्यवहार करताना डोळ्यांनी जे जे पाहशील किंवा कानांनी जे जे ऐकशील, मनाने ज्या ज्या कल्पना करशील, वाणीने जे जे बोलशील त्या प्रत्येकवेळी माझी आठवण काढ म्हणजे मी सर्वत्र व्यापून आहे हे सदैव तुझ्या लक्षात राहील. काम करत असताना देवाचे नाव घेत ते करणे ही सवय चांगलीच आहे पण ती अंगवळणी पडेपर्यंत सतत देवाचे नाव आठवेलच असे नाही. म्हणून संत मंडळी सांगतात की, सदैव देवाचे नाव घ्यायचा सराव करा आणि देवाचे नाव घेत घेत नित्याचे काम करा. देवाचे नाव घेण्यासाठी सदैव एकाग्रता हवी. त्यासाठी मन आणि बुद्धी ईश्वराला अर्पण करावी म्हणजे मनात अन्य विचार येत नाहीत आणि बुद्धी त्यांना फाटे फोडत नाही. श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात मन आणि बुद्धी ईश्वराला अर्पण करणे म्हणजे संतांच्या उपदेशानुसार चालणे. त्यांच्या उपदेशावर जसजशी श्रद्धा दृढ होत जाईल तसतसे नि:शंकपणे नामात दंग होऊन नित्यकर्मे केली जातील. संत मंडळी अशा पद्धतीने देवाचे नाव घेत काम करत असताना प्रत्येक गोष्टीत देवाला पहात असतात. संत सावता माळी नामस्मरणात इतके दंग होत असत की, त्यांना सगळीकडेच ईश्वराचे दर्शन घडत असे. म्हणून ते म्हणतात, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी.

Advertisement

क्रमश

Advertisement
Tags :

.