For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

म्हैसूर मॉडेलच्या धर्तीवर बेळगाव मनपात दोन शववाहिन्या दाखल

11:20 AM Jan 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
म्हैसूर मॉडेलच्या धर्तीवर बेळगाव मनपात दोन शववाहिन्या दाखल
Advertisement

बेळगाव : म्हैसूर मॉडेलप्रमाणेच बेळगावातदेखील नव्या प्रकारच्या दोन शववाहिका महानगरपालिकेच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. दोन्ही शववाहिन्या सदाशिवनगर येथील पार्किंगमध्ये उभ्या करण्यात आल्या असून त्यामध्ये आणखी काही बदल करण्याची सूचना महापौरांनी दिली आहे. आवश्यक बदल झाल्यानंतर शववाहिन्यांचे लोकार्पण केले जाणार आहे. बेळगाव शहर आणि उपनगरात मृत्यू झालेल्यांचे पार्थिव नेण्यासाठी महानगरपालिकेच्या शववाहिन्यांचा वापर केला जातो. सध्या उपलब्ध असलेल्या शववाहिन्या जुन्या आहेत. त्या वारंवार नादुरुस्त होण्याचे प्रकारही घडत आहेत. काही सेवाभावी संस्थांनीही शववाहिन्या उपलब्ध करून दिल्या आहेत. महापालिकेच्या शववाहिन्या वेळेत उपलब्ध होत नाहीत, अशी ओरड कायम आहे.

Advertisement

सध्या उपलब्ध असलेल्या शववाहिन्यांतून पार्थिव बंद दरवाजाआड नेले जातात. त्यामुळे अत्याधुनिक शववाहिन्या बेळगाव शहरासाठी उपलब्ध करून देण्यासंदर्भात  यापूर्वीच्या आरोग्य स्थायी समिती बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. यासाठी म्हैसूर येथील शववाहिन्यांची पाहणी करून त्याप्रकारचे मॉडेल तयार करण्याची ऑर्डर उद्यमबाग येथील एका कारखान्याला देण्यात आली होती. त्यानुसार सुमारे 39 लाख रुपयांच्या निधीतून दोन्ही वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. शववाहिन्यांचे काम पूर्ण झाले असल्याने ती वाहने सदाशिवनगर स्मशानभूमीतील पार्किंगमध्ये उभी करण्यात आली आहेत. सदर शववाहिन्यांमध्ये आणखी काही सुधारणा करण्याच्या सूचना महापौर मंगेश पवार यांनी दिल्याने आवश्यकती दुरुस्ती झाल्यानंतर नवीन शववाहिन्यांचे लोकार्पण केले जाणार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.