अमेरिकेत प्रथा-परंपरेचे पालन
भारतीय जेथे कुठे जातात, स्वत:ची संस्कृती, परंपरा आणि संस्कार सोबत नेत असतात. अमेरिका असो किंवा युरोप किंवा ऑस्ट्रेलिया भारतीय स्थलांतरित तेथे एक मिनी इंडियाच वसवितात. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत असून यात अमेरिकेत राहणाऱ्या एका भारतीय परिवाराने भारतीय संस्कृतीबद्दलचे प्रेम दाखवून दिले आहे. सॅन फ्रान्सिस्को येथे राहणाऱ्या भारतीय परिवाराने स्वत:च्या नव्या घरात गोमातेला गृहप्रवेशाच्या विधीत सामील केले. या परंपरेने केवळ भारतीय नव्हे तर विदेशी युजर्सचीही मने जिंकली. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला. या व्हिडिओत परिवाराने स्वत:च्या नव्या घरात सजविलेली गाय ‘बहुला’चा विधिवत प्रवेश करविला. एक पुजारी गोमातेला आत घेऊन येतो, गोमातेच्या शरीरावर हाताचे ठसे उमटविलेले दिसून येतात. गोमातेच्या पाठीवर पारंपरिक वस्त्र असून त्यावर गायींची चित्रे रेखाटलेली आहेत. घराच्या आत एका पात्रात गोमातेला भोजन करविण्यात आले. महिलांनी पूजा करत पूर्ण विधीपूर्वक हे शुभकार्य संपन्न करविले. पूर्ण परिवार गोमातेसोबत छायाचित्रे काढून घेताना दिसून येतो. या व्हिडिओवर लोकांनी कॉमेंट्स केल्या आहेत. अमेरिकेत भारतीय परंपरा जिवंत ठेवल्याबद्दल या परिवाराचे आभार असे एकाने नमूद केले. भारतीय जेथे कुठे जातात तेथे परंपरा अन् संस्कृती विसरत नसल्याचे अन्य युजरने म्हटले आहे.