वीज उपकेंद्र उभारणीसाठी आ. निलेश राणेंचा पाठपुरावा सुरु
कंत्राटी वीज कर्मचारी संघटनेचे नेते अशोक सावंत यांची माहिती
मालवण | प्रतिनिधी : मालवण शहर तसेच वायरी, तारकर्ली, देवबाग यांसह तालुक्यातील अनेक गावात कमी दाबाचा वीज पुरवठा ही मोठी समस्या आहे. याठिकाणी असणाऱ्या होम स्टे, हॉटेल व्यावसायिक तसेच बाजारपेठातील व्यापारी व नागरिक यांना या वीज समस्यांचा सामना करावा लागतो. ही समस्या कायमस्वरूपी मार्गी लागावी यासाठी अति उच्चदाब वीज उपकेंद्र उभारणी मालवणात व्हावी. यासाठी आमदार निलेश राणे यांचा वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा सुरु आहे. अशी माहिती कंत्राटी वीज कर्मचारी संघटनेचे नेते तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांनी दिली.काही दिवसांपूर्वी आमदार निलेश राणे यांनी अनेक वीज ट्रान्सफार्मर व वीज साहित्य मंजूर करून घेतले. त्यांच्या उभारणीचे काम सुरु आहे. सोबतच शासनाच्या माध्यमातून भूमिगत वीज वाहिन्या जोडणीचे काम सुरु आहे. येथील वीज समस्या कमी व्हाव्यात यासाठी ही सर्व कामे सुरु आहेत. सोबतच येथील कमी दाबाचा वीज पुरवठा यावर कायमस्वरूपी काय मार्ग काढता येईल याचीही माहिती आमदार निलेश राणे यांनी जाणून घेतली आहे. मालवणात सध्यस्थितीत 33 केवी क्षमतेची चार वीज उपकेंद्र पेंडूर, कुंभारमाठ, मालवण, आचारा याठिकाणी आहेत. मात्र 132*33 केवी क्षमतेचे अति उच्चदाब वीज उपकेंद्र मालवण तालुक्यात आवश्यक आहे. या दृष्टीने आमदार निलेश राणे यांनी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा सुरु केला आहे. अनेक भागात गेल्या वर्षांची मागणी असणारे वीज ट्रान्सफार्मर आमदार निलेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी मंजूर करून वीज ग्राहकांना दिलासा दिला. त्याच प्रमाणे अति उच्चदाबाचे वीज उपकेंद्र ही त्यांच्या माध्यमातून लवकरच मंजूर होईल. अशी माहिती अशोक सावंत यांनी दिली आहे.