जीवनात नियम-नैतिकता जपा
डॉ. चंद्रकांत वाघमारे : मराठा बँकेतर्फे गुणी विद्यार्थ्यांचा गौरव
► प्रतिनिधी / बेळगाव
छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, म. जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गाडगे बाबा या महापुरुषांनी माणसांसाठी मोठे कार्य केले आहे. त्यांचे हे कार्य अफाट असून ते जतन करण्याचे काम मराठा बँकेने केले आहे. जीवनात येणाऱ्या प्रत्येक संकटावर मात करून ध्येयाने पुढे गेले पाहिजे. त्याचबरोबर जीवनात काही नियम आणि नैतिकता जपल्या पाहिजेत. प्रचंड आत्मविश्वास ठेवून जीवनाला सामोरे गेले पाहिजे, असे उद्गार राणी चन्नम्मा विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. चंद्रकांत वाघमारे यांनी काढले.
मराठा को-ऑप. बँकतर्फे रविवारी सभासदांच्या गुणी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर चेअरमन दिगंबर पवार, संचालक बाळासाहेब काकतकर, लक्ष्मण होनगेकर, बाळाराम पाटील, बाबुराव पाटील, विश्वनाथ हंडे, विनोद हंगिरकर, मोहन चौगुले, सुनील अष्टेकर, लक्ष्मण नाईक, रेणू किल्लेकर आदी उपस्थित होते.
प्रारंभी बाळासाहेब काकतकर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन झाले. यावेळी सीए परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. याचबरोबर दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर परीक्षेत यश संपादन केलेल्या सभासदांच्या मुलांचा गौरव करण्यात आला.
डॉ. वाघमारे पुढे म्हणाले, श्वास आणि मरण यातील अंतर म्हणजे जीवन होय. मात्र, अलीकडे माणसे पैशाच्या पाठीमागे पडून जीवनाची नासाडी करू लागले आहेत. यासाठी चंगळवादी जीवनामध्ये कसे जगायचे हे पहिल्यांदा शिकले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. यावेळी बी. एस. पाटील यांनी आभार मानले. याप्रसंगी बँकेचे संचालक, सभासद, हितचिंतक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.