गणेशोत्सवाची लोकपरंपरा
श्री गणेश ही भारतीय लोकमानसाने शेकडो वर्षांपासून पूजनीय मानलेली देवता असून, आज शैव परिवारातील एक प्रमुख देवता म्हणून तिला महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे. शरीर मानवाचे आणि शिर हत्तीचे असलेल्या या देवतेचा उद्गम आर्येतर दैवतांतून झालेला आहे, असे मत देवासंदर्भात सविस्तरपणे मांडलेले पहायला मिळते. काही आर्येतर गण किंवा समूह हत्तीची पूजा करीत आणि त्यातून गणेश पूजा विकसित पावली, असे मत त्यांनी मांडलेले आहे. एखाद्या वृक्षाखाली एक ग्रामदेवता म्हणून तिला पूजले जायचे. पुराणातल्या काही कथांत, हा देव पार्वतीने आपल्या अंगाच्या मळापासून निर्माण केल्याचा तर काही कथांत शिवाने आपल्या तप:सामर्थ्याने त्याची निर्मिती केल्याचे म्हटलेले आहे. पंडित श्री. दा. सातवळेकर यांच्यामते प्राचीन काळात भूतानाच्या प्रबळ शिवराजाच्या कारकिर्दीत तेथील लोकसमूह विविध प्रकारच्या प्राण्याचे मुखवटे धारण करून नृत्य करायचे आणि त्यातून कालांतराने गजमुखी देवतेचा उगम झाला.
बौद्धांच्या तंत्रग्रंथांतही गणेश ही देवता असून, बुद्धाने आनंद या शिष्याला रहस्यमय गणपती हृदयमंत्र सांगितला होता. चिनी विद्वान भारतात येऊन नालंदासारख्या विद्यापीठातून त्यांनी बौद्ध धर्माबरोबर भारतीय संस्कृती आणि गणेश यांना चीनमध्ये नेले. चीन आणि जपानमध्ये गणेशाला कांगि-तेन म्हटले जायचे. म्यानमार, कंबोडिया, जावा, बाली, बोर्नियो, तुर्कस्थान, मेक्सिको आदी देशांत गणेशमूर्ती आढळतात. गणेशाच्या सुरुवातीच्या मूर्ती द्विभूज असून, त्यांच्या एका हातात परशू व दुसऱ्या हातात मुळा दाखवला होता. नंतर चार, आठ, सोळा हातांच्या गणेश मूर्ती निर्माण झाल्या. त्रिमुख गणेशाच्या मूर्ती जपानमध्ये तर चतुर्मुख मूर्ती कंबोडियात आढळतात. तिबेटात गणेशाला नारीरुपात पूजतात. उंदीर हे गणेशाचे नित्याचे वाहन असले तरी हेरंब गणेशाचे वाहन सिंह तर मयुरेश्वराचे मोर आहे. गणेश मूर्ती कधी समभंद मुद्रेत, कधी पद्मसनस्थित तर कधी नृत्य मुद्रेत आढळते. गणेशाची मृण्मयी मूर्तीरुपात पूजा केली जात असली तरी दक्षिण भारतात पिळ्ळेयार या नावाने एका यज्ञकुंडाच्या स्वरुपात पूजा करतात. शंकराचार्यांनी निर्माण केलेल्या पंचायतनात श्री गणेश नर्मदेतल्या तांबड्या गोट्यांच्या स्वरुपात पूजतात. सर्वसामान्यपणे डाव्या सोंडेची गणेश मूर्ती पूजली जात असली तरी उजव्या सोंडेची मूर्ती ठराविक घराण्यांत पूजली जाते. इसवी सनाच्या चौथ्या व पाचव्या शतकांतल्या गणेशमूर्ती अफगाणिस्तानात सापडलेल्या असून युआनच्यांग या चिनी प्रवाशाला अफगाणिस्तानातील कपिशा शहरात हत्तीरुपी देवतेचे पूजन आढळले होते. इंडो-ग्रीक राजा युक्रेटायडिसच्या नाण्यावरती पिलुशार या हत्तीरुपी देवता आढळलेली आहे. इसवी सनाच्या पहिल्या-दुसऱ्या शतकात कुशाणांच्या काळातल्या गजमुखी गणेश मूर्ती आढळलेल्या आहेत. प्राचीन काळापासून गणेश मूर्तीची विविध स्वरुपात पूजा भारतीय उपखंडात होत असून भाद्रपद महिन्यातल्या शुक्ल पक्षातल्या चतुर्थीला साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला गोवा-कोकण आणि त्यांच्याशी संलग्न असणाऱ्या कर्नाटकातल्या प्रदेशात महत्त्वाचे स्थान लाभलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात प्रचलित असलेला गणेश चतुर्थीचा सण पेशवाईत लोकप्रिय झाला. सवाई माधवराव पेशव्याच्यावेळी हा उत्सव शनिवारवाड्यातील गणेश महालात भव्य स्वरुपात होऊ लागला.
पेशव्यांप्रमाणेच पटवर्धन, दीक्षित, मुजुमदार आदी सरदार घराण्यांतही गणेशोत्सव साजरा होऊ लागला. त्यात कीर्तन, प्रवचन, मंत्रजागर, गायनादी कार्यक्रम करण्याची प्रथा चालू होती. 1893 साली हिंदू धर्मियांत एकात्मता निर्माण व्हावी म्हणून पुण्यातील वैद्य भाऊसाहेब रंगारी यांच्या घरी सभा आयोजित करून, त्यावेळी सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. परंतु गणेशोत्सवाला सार्वजनिक उत्सव म्हणून साजरा करण्यास मात्र लोकमान्य टिळकांनी ‘केसरी’त लेख लिहून प्रोत्साहित केले आणि त्यामुळे 1894 पासून सार्वजनिक गणपतीची संख्या वृद्धिंगत होत गेली. लोकमान्य टिळकांनी पुण्यातल्या विंचुरकराच्या वाड्यात सार्वजनिक गणपती बसविला. हिंदू समाजाला संघटित करावे आणि राजकीय स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेण्यासाठी प्रेरित करण्याचा हेतू टिळकांचा होता. सर्वसामान्य समाजात एकोपा निर्माण होईल आणि देशप्रेमाची भावना वाढीस लागेल म्हणून आयोजित होणारे सार्वजनिक गणेशोत्सव त्याकाळी पोवाडे, देशभक्तीपर गीतगायन, प्रवचनाचे आयोजन करण्यात पुढाकार घेत असल्याने राष्ट्रीय प्रवृत्तीची जोपासना या उत्सवामुळे होऊ लागली होती. लोकजागृतीचे एक साधन म्हणून त्यावेळच्या नेत्यांनी गणेशोत्सवाला व्यापक, सार्वजनिक व ज्ञानसत्रात्मक स्वरुप प्रदान करण्यात महत्त्वाचे योगदान केले होते. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीसाठी सार्वजनिक गणेशोत्सवाने केलेले लोकजागृतीचे कार्य उल्लेखनीय ठरले होते. पुणे, मुंबईसारख्या शहरांत सार्वजनिक उत्सव साजरा करण्यासाठी निर्माण झालेल्या मंडळांनी त्याकाळी देशाभिमान जागृत करण्यासाठी बहुश्रुत पंडित, निष्णात वक्ते, राष्ट्रीय पुढारी यांना निमंत्रित केले होते.
लोकमान्य टिळकांप्रमाणे न. चिं. केळकर, कृ. प्र. खाडिलकर, चिंतामणराव वैद्य, दादासाहेब खापर्डे, सरोजिनी नायडूसारख्या नेत्यांना सार्वजनिक गणेशोत्सवाच्या प्रसंगी निमंत्रित केले होते. धार्मिक, सामाजिक, शास्त्रीय, राजकीय, आर्थिक विषयांवरच्या व्याख्यानांद्वारे मांडलेले विचार समाजाला प्रेरणादायी ठरायचे. स्वातंत्र्यपूर्वकाळात या उत्सवाचे स्वरुप धार्मिक, सामाजिक व राष्ट्रीय होते. त्यात राजकीय स्वातंत्र्याप्रती, एकात्मता, स्वदेशी वापराच्या विचारांवरती भर दिला जायचा. भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीसंदर्भातल्या पुस्तकात बिपीन चंद्रा यांनी 1893 पासून लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाचा वापर राष्ट्रवादी विचारांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी केला. देशभक्तीपर गीतं आणि भाषणांच्या माध्यमांतून टिळकांनी राष्ट्रवादाचा प्रचार केला. 1904-05 पर्यंत तर गणेशोत्सवाचा वापर राष्ट्रभक्तीच्या कार्यासाठी केला जात आहे, याची कल्पनादेखील इंग्रजांना लागली नव्हती. 1914 ला मंडालेच्या तुरुंगातून टिळक परत आल्यावर इंग्रजांनी त्यांना कुणी भेटायला येऊ नये म्हणून वटहुकूम काढला होता. गणेशोत्सवाचा फायदा टिळकांनी राष्ट्रभक्तीचा प्रचार करण्यासाठी करू नये म्हणून इंग्रजांनी पावलं उचलली होती. 1886 साली प्रकाशित झालेल्या ‘ए इंडिया पोर्तुगेझा’ ग्रंथात लोपिस मेंडिस यांनी गोव्यातल्या गणेश चतुर्थीच्या उत्सवाचे सविस्तरपणे वर्णन केलेले असून, मांडवी नदीत होड्यांद्वारे करण्यात येणाऱ्या मूर्ती विसर्जनाचे चित्र समाविष्ट केलेले आहे. यावरून या उत्सवाची महती जुन्या काळी किती होती, हे समजते.
- राजेंद्र पां. केरकर