For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्थलांतरित जनावरांना चाऱ्याची गरज

11:01 AM Jul 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
स्थलांतरित जनावरांना चाऱ्याची गरज
Advertisement

पूरपरिस्थितीमुळे प्रश्न गंभीर : प्रशासनाचे दुर्लक्ष : नदीकाठावरील 500 हून अधिक कुटुंबे हलविली

Advertisement

बेळगाव : जोरदार पावसाने जिल्ह्यात पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. निपाणी, चिकोडी परिसरातील काही कुटुंबीय आणि जनावरांचे स्थलांतर करण्यात आले आहे. दरम्यान,या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनू लागला आहे. नदीकाठावर अद्याप पूर आहे. तसेच शिवारातही पाणी साचून आहे. त्यामुळे जनावरांना चारा मिळणे मुश्कील झाले आहे. विशेषत: स्थलांतरित केलेल्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत आता प्रशासन आणि पशुसंगोपन खाते कोणती भूमिका घेणार, हे पहावे लागणार आहे.

आठ-दहा दिवसात मुसळधार पावसाने नदी-नाले आणि जलाशये ओसंडून वाहू लागली आहेत. वेदगंगा, हिरण्यकेशी, कृष्णा नदीकाठ जलमय झाला आहे. अद्याप पूरपरिस्थिती कायम आहे. त्यामुळे जनावरांच्या आरोग्याबाबतही चिंता व्यक्त होऊ लागली आहे. पूरपरिस्थितीमुळे रोगराई पसरण्याची भीतीही निर्माण झाली आहे. जिल्ह्यात पूरपरिस्थिती ओढवलेल्या भागातील जनावरे स्थलांतरित झाली आहेत. त्यामुळे दूध व्यवसायावरही परिणाम झाला आहे. स्थलांतरित कुटुंबीय आर्थिक अडचणीत सापडली आहेत. चिकोडी, हुक्केरी, निपाणी, अथणी, कागवाड भागात जनावरांची संख्याही मोठी आहे. मात्र, पूरपरिस्थितीमुळे जनता धास्तावली आहे. प्रशासनाने चारा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही पूरग्रस्तांनी केली आहे.

Advertisement

नदीकाठावर पूर असल्याने चारा आणायचा कोठून ?

नदीकाठावरील 500 हून अधिक कुटुंबे हलविण्यात आली आहेत. त्यांच्याबरोबर असलेली जनावरे आणि शेळ्या-मेंढ्याही स्थलांतरित झाल्या आहेत. त्यांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याबरोबर नदीकाठावर आणि पूर आलेल्या भागात चारा मिळणे अशक्य बनले आहे. त्यामुळे जनावरांचे हाल होताना दिसत आहेत. नदीकाठावर सर्वत्र पूर आल्याने चारा कोठून आणावा, असा मोठा प्रश्नही पशुपालकांसमोर  आहे.

चारा छावण्या सुरू करा

स्थलांतरित झालेल्या जनावरांसाठी आणि पूर आलेल्या भागातील जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी होत आहे. पशुसंगोपन खात्याने यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. त्याबरोबर रोगराईला आळा घालण्यासाठी प्रतिबंधक लसीकरण मोहीमही राबवावी, अशी मागणी होत आहे.

Advertisement
Tags :

.