चिकुर्डेत चारा भुईसपाट आणि शेतात तळे
कुरळप :
चिकुर्डेसह करंजवडे, देवर्डे, ऐतवडे खुर्द, ठाणापुडे, कुरळपसह परिसरात वादळी वाऱ्यासह पावसामुळे दुधाळ जनावरांचा चारा भुईसपाट झाला आहे. तर शेतांमध्ये पावसाचे पाणी साठल्यामुळे शेततळे बनले आहे. एकंदरीत आगामी आणखी काही दिवस हा पाऊस राहणार असल्याने ओढ्या-नाल्यांना पूर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वाळवा तालुक्याच्या वारणापट्टा चिकुर्डे परिसराला वळीवाच्या पावसाने झोडपले. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मे महिना सुरू झाल्यापासून वाळवा तालुक्यासह सांगली जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली आहे. परंतु मे महिन्यातील पहिल्या आठवड्यापासून इतरत्र अनेक वेळा पाऊस पडला. परंतु चिकुर्डे परिसर वळीवाच्या पावसापासून वंचितच रहीला होता.
बुधवारपासून या परिसरात पावसाने दमदार हजेरी लावून बळीराजाला दिलासा दिला आहे. मे महिना सुरू झाल्यापासून दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढतच गेली. उकाड्याने आणि उष्णतेने नागरिक अक्षरशः हैराण होवून गेले होते. उकाड्याने हैराण झालेल्या माणसांबरोबरच मुक्य जनावरांचीही घालमेल होत होती. सोमवार, मंगळवार किरकोळ तर बुधवार पासून मुसळधार पाऊस बरसला अन् नागरिकांना दिलासा मिळाला.
कडक उन्हाच्या तीव्रतेने शेत पिके करपू लागली होती. खास करून चिकुर्डे, डोंगरवाडी, ठाणापुडे, करंजवडे, कुरळप या ठिकाणच्या माळरानावर असलेल्या ऊस पिकाला कडक उन्हाचा जास्त फटका बसला होता. ऊसाचे पीक करपून जावू लागले होते. पाण्याचा फेरा दिला तरीही दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पाण्याची गरज निर्माण व्हायची. उन्हाळा इतका कडक होता की, पाणी पाजले तरीसुद्धा पिकाला तजेलदारपणा येत नव्हता. त्यामुळे या परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी पाण्यासाठी हैराण झाला होता. परंतु गेल्या दोन दिवसापासून या परिसरात सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने थैमान घातले आहे. मुसळधार स्वरूपाचा पाऊस असून सलग तीन-चार तास पाऊस थांबायचे नावच घेत नाही.
सध्या वाळवा तालुक्यातील या वारणा पट्ट्यामध्ये जमिनीमध्ये पाणीच पाणी झाले असून शेतीकामाच्या प्रक्रियेत शिथिलता आली आहे. शेतकऱ्यांनी जमिनी नांगरून टाकलेल्या आहेत. नांगरलेल्या जमिनीवर फणकट मारून नंतर खरिपाच्या पीका योग्य जमिनी बनवल्या जातात. परंतु आता अचानक वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसामुळे ही सर्व कामे ठप्प झालेली आहेत. एका बाजूला खरिपाची कामे टप्प झाली असली तरी सुद्धा या पावसामुळे शेतकरी मात्र सुखावून गेलेला आहे.
एकंदरीत उन्हाळ्यात विहिरींनी तळ गाठलेला होता. विहिरीवरील मोटारी तास ते दोन तासच चालत होत्या. दोन तासांमध्ये विहिरीतील पाणी पूर्णपणे संपून जात होते. त्यामुळे ऊसाला पाणी फार मोठ्या प्रमाणात कमी पडत होते. उसाच्या वाढीचा वेग सुद्धा मंदावलेला होता. उसाचे पीक कोमेजून गेलेले होते. अशा कालावधीत आता मुसळधार पाऊस सुरू झाल्यामुळे ऊस पिकामध्ये व ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. या मुसळधार पावसामुळे ऊसाचे पीक तजेलदार स्वरूपाचे आले असल्याचे दिसून येत आहे.