पीव्ही सिंधू, सेन यांच्या कामगिरीवर लक्ष
महिला, पुरूष एकेरीच्या सामन्यांना आज प्रारंभ
वृत्तसंस्था, निंगबो (चीन)
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे मंगळवारपासून सुरू झालेल्या 2026 च्या आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत पी.व्ही. सिंधू आणि लक्ष्य सेन हे दोन अव्वल बॅडमिंटनपटू एकेरीत भारताचे आव्हान जीवंत ठेवलण्यासाठी प्रयत्नशील राहतील. मात्र या स्पर्धेत सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या अव्वल जोडीने दुखापतीमुळे माघार घेतली आहे. दरम्यान मिश्र दुहेरीत पहिल्याच फेरीत भारतीय जोड्यांना पराभव पत्करावा लागला आहे.
आशिया खंडातील ही स्पर्धा सलग तिसऱ्यांदा यावेळी निंगबोमध्ये भरविली जात आहे. पुरूष दुहेरीच्या प्रकारात भारताच्या आव्हानाला फार मोठा धक्का बसला आहे. यापूर्वी सदर स्पर्धेत पुरूष दुहेरीत विजेतेपद मिळविणाऱ्या सात्विक साईराज आ णि चिराग शेट्टी दुखापतीमुळे शेवटच्या क्षणी माघार घेतली आहे. त्यामुळे आता एकेरीमध्ये पी.व्ही. सिंधू आणि लक्ष्य सेन यांच्या कामगिरीवर भारताची भिस्त राहील. आतापर्यंत दोनवेळा ऑलिम्पिक पदक तसेच माजी विश्वविजेती पी. व्ही. सिंधूने गल्या जानेवारीनंतर प्रथमच या स्पर्धेत आपला सहभाग दर्शवित आहे. जानेवारीत झालेल्या इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत 30 वर्षीय सिंधूने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला होता. तर अखिल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत तंदुरुस्तीच्या समस्यामुळे सिंधूने माघार घेतली होती. निंगबो स्पर्धेत सिंधूच्या सहभागामुळे भारताला पदकाची आशा निर्माण झाली आहे.
पुरूष एकेरीत भारताचे प्रतिनिधीत्व लक्ष्य सेन करीत आहे. अलिकडेच झालेल्या अखिल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत 24 वर्षीय लक्ष्य सेनने उपविजेतेपद मिळविले होते. लक्ष्य सेन सध्या चांगल्याच फार्ममध्ये असून सध्या त्याला या स्पर्धेत जेतेपदाची आशा निर्माण झाली आहे. सदर स्पर्धेत लक्ष्य सेनसमवेत एच.एस.प्रणॉय, किदांबी श्रीकांत, आयुष शेट्टी, सहभागी होत आहेत.1965 आणि 2023 साली झालेल्या या स्पर्धेत भारताने दोन सुवर्णपदके मिळविली होती. पुरूष एकेरीत दिनेश खन्नाने 1965 साली तर सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी 2023 साली या स्पर्धेत पुरूष सुवर्णपदक मिळविले होते.
आता सदर स्पर्धेत सात्विक आणि चिराग या जोडीची उणीव भारताला चांगलीच भासेल. त्यांच्या गैरहजेरीत पुरूष दुहेरीत हरिहरन आणि एम. आर. अर्जुन तसेच पृथ्वी के.आर. आणि साईप्रतिक भारताचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. महिला एकेरीमध्ये पी.व्ही. सिंधू, मालविका बनसोड, उन्नती हुडा आणि तन्वी शर्मा सहभागी होत आहेत. महिला दुहेरीत भारताच्या तीन जोड्या सहभागी होत आहेत. मात्र त्रिशा जॉली आणि गायत्री गोपिचंद यांनी या स्पर्धेतून माघार घेतली आहे. मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला-तनिषा क्रेस्टो यांनी गेल्या वर्षी या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. पुन्हा या जोडीकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा बाळगली जात आहे. रोहन कपूर-ऋत्विका शिवानी, असित सूर्या-अमृता या भारतीय जोड्या मिश्ा़dर दुहेरीत सहभागी होत आहेत. आशिया खंडातील या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत यावेळी भारतीय स्पर्धक अधिक पदके जिंकण्यासाठी प्रयत्न करतील.
मंगळवारपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत मिश्र दुहेरीत भारतीय स्पर्धकांना सलामीच्या फेरीतच हार पत्करावी लागली. मिश्र दुहेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात मलेशियाच्या आठव्या मानांकीत हुआत आणि जीमी यांनी भारताच्या रोहन कपूर आणि ऋत्विका ग•s यांचा 34 मिनिटांच्या कालावधीत 21-13, 21-19 अशा गेम्समध्ये पराभव केला. मिश्र दुहेरीच्या अन्य एका सामन्यात भारताच्या असित सूर्या आणि अमृता प्रमुथेश यांचे आव्हान संपुष्टात आले. मलेशियाच्या वाँग सी आणि लीम सीएन यांनी असित आणि अमृता यांचा 21-16, 21-15 असा पराभव केला.
या स्पर्धेतील पुरूष आणि महिला एकेरीच्या सामन्यांना बुधवारपासून प्रारंभ होत आहे. पुरूष एकेरीत लक्ष्य सेनचा सलामीचा सामना हाँगकाँगच्या ली यीयु बरोबर होत आहे. तर पी.व्ही. सिंधूचा सलामीचा सामना मलेशियाच्या चिंगबरोबर होईल.
-सात्विक-चिरागची या स्पर्धेत भारताला उणिव
-लक्ष्य सेन, सिंधूकडून पदकाची अपेक्षा