For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय संघाचे मालिकेत विजयी आघाडी घेण्यावर लक्ष

06:45 AM Jul 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारतीय संघाचे मालिकेत विजयी आघाडी घेण्यावर लक्ष
Advertisement

भारत-झिम्बाब्वे आज दुसरा टी-20 सामना, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, किशन यांच्याकडून सुधारित कामगिरीची अपेक्षा

Advertisement

वृत्तसंस्था, हरारे

तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील येथे शनिवारी यजमान झिम्बाब्वे आणि भारत यांच्यातील दुसऱ्या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 4.30 वाजता प्रारंभ होईल. या मालिकेत भारताने गुरुवारी पहिला सामना जिंकून आघाडी मिळविल्याने आता श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील हा संघ मालिकेत विजयी आघाडी घेण्यासाठी सज्ज झाला आहे.

Advertisement

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाला अलिकडेच आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यात पाठोपाठ मालिका गमवाव्या लागल्या आहेत. आयर्लंडने आपल्या घरच्या भूमीवर भारताचा 2-0 असा पराभव केला तर त्यानंतर इंग्लंडने भारताचा 4-0 असा एकतर्फी पराभव केला. या सलग पराभवामुळे भारतीय संघाची बरीच पिछेहाट या क्रीडा प्रकारात झाल्याचे दिसून आले. मात्र सलग सहा सामने गमविल्यानंतर झिम्बाब्वेच्या दौऱ्यात भारतीय संघाने पहिल्या सामन्यात झिम्बाब्वेचा दणदणीत पराभव करून पराभवाची मालिका खंडीत केली आहे.

गुरुवारच्या पहिल्या सामन्यात सलामीचा धडाकेबाज फलंदाज 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीची फटकेबाजी महत्त्वाची ठरली. त्याने या सामन्यात 19 चेंडूत अर्धशतक झळकविले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील वैभवचे हे पहिलेच अर्धशतक आहे तसेच या सामन्यात मयांक यादवने दमदार पुनरागमन करताना 18 धावांत 2 गडी बाद केले. या सामन्यात यादवला सामनावीर म्हणून निवडण्यात आले होते. भारताच्या गोलंदाजांनी झिम्बाब्वेला 126 धावांत गुंडाळले होते. त्यानंतर भारताने सहा षटके बाकी ठेवून तसेच 7 गड्यांनी हा सामना जिंकला. इशान किशनने 35 तर कर्णधार अय्यरने नाबाद 28 धावा केल्या होत्या.

भारताचा सलामीचा आणखी एक फलंदाज अभिषेक शर्माने दोन वर्षांपूर्वी हरारेच्या याच मैदानावर आपल्या टी-20 प्रवासाला प्रारंभ करताना पहिल्याच सामन्यात शतक झळकविले होते. मात्र अभिषेकला गुरुवारच्या सामन्यात दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. भारतीय संघातील आणखी एक वेगवान गोलंदाज प्रिन्स यादवने या पहिल्या सामन्यात बऱ्यापैकी गोलंदाजी करताना 29 धावांत 2 गडी बाद केले. मात्र टी-20 प्रकारात पदार्पण करणाऱ्या अशोक शर्माला पहिल्या सामन्यात एकही गडी बाद करता आलेला नाही.

झिम्बाब्वेच्या फलंदाजीची भिस्त प्रामुख्याने ब्रायन बेनेट, सिकंदर रझा यांच्यावर आहे. तसेच बेन करन, बॅड इव्हान्स हे या संघातील प्रमुख गोलंदाज आहेत. शनिवारच्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघ पुन्हा गोलंदाजी आणि फलंदाजीत दमदार कामगिरी करून या मालिकेत विजयी आघाडी घेण्यासाठी आतुरलेला आहे.

संघ

भारत : श्रेय अय्यर (कर्णधार), इशान किशन, प्रभसिमरन सिंग, वैभव सूर्यवंशी, तिलक वर्मा (उपकर्णधार), अभिषेक शर्मा,  शिवम दुबे, हर्ष दुबे, सूर्यांश शेडगे, रिंकू सिंग, अशोक शर्मा, प्रिन्स यादव, रवी बिश्नोई, मयांक यादव आणि यश ठाकुर.

झिम्बाब्वे : सिकंदर रझा (कर्णधार), बेन करन, इनोसेंट बाला, मारुमणी, मायर्स, सिगा, ब्रायन बेनेट, बर्ल, इव्हान्स, मधेवेरे, चिवांगा, वेलिंग्टन मासाकेझा, मुझाराबानी, निगरेव्हा आणि नॅमहुरी.

सामन्याची वेळ : सायंकाळी 4:30 वा.

थेट प्रक्षेपण : युनाईट8 स्पोर्ट्स टीव्ही

स्ट्रीमिंग : फॅनकोड अॅप व वेबसाईट

Advertisement
Tags :

.