के.एल. राहुलच्या कामगिरीवर लक्ष
इंग्लंड लायन्सविरुद्ध दुसरी चारदिवसीय अनधिकृत कसोटी आजपासून
वृत्तसंस्था/नॉर्दम्प्टन
भारताचा यष्टीरक्षक आणि फलंदाज के.एल. राहुल याचे लक्ष प्रामुख्याने चांगल्या कामगिरीवर राहिल. जूनच्या उत्तरार्धात सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या इंग्लंड विरुद्धच्या मालिकेपूर्वी इंडिया अ आणि इंग्लंड लायन्स यांच्यात दोन सामन्यांची अनधिकृत कसोटी मालिका खेळविली जात आहे. या मालिकेतील दुसऱ्या आणि शेवटच्या सामन्याला येथे शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे.
शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ शुक्रवारी उशीरा इंग्लंडला कसोटी मालिकेसाठी रवाना होत आहे. रोहीत शर्मा आणि विराट कोहली हे अनुभवी क्रिकेटपटू कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर आता भारताच्या कसोटी संघामध्ये अनेक नवोदितांना चांगली कामगिरी करण्याची संधी मिळत आहे. इंडिया अ आणि इंग्लंड लायन्स यांच्यातील या अनधिकृत मालिकेतील भारताचे नवोदित क्रिकेटपटू चांगली कामगिरी करु शकलेले नाहीत. इंग्लंडच्या भूमीवर के. एल. राहुलने आतापर्यंत बऱ्यापैकी यश संपादन केले आहे. राहुलने यापूर्वी इंग्लंडविरुद्ध दोन शतके नोंदविली आहेत. राहुलने 58 कसोटीत फलंदाजीत 33.57 धावांची सरासरी राखली आहे. शुभमन गिल आणि साई सुदर्शन हे आघाडीचे फलंदाज आयपीएल स्पर्धेत गुंतले असल्याने त्यांना शुक्रवारच्या सामन्यात खेळणे अशक्य आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिली क्रिकेट कसोटी लिड्स मैदानावर होणार आहे.
पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी इंग्लंडच्या खेळपट्ट्यांची माहिती आणि वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी दोन सामन्यांची अनधिकृत कसोटी मालिका आयोजित केली. दरम्यान या मालिकेतील पहिला सामना अनिर्णीत राहिला. शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात वेगवान गोलंदाज आकाशदीप, यशस्वी जैस्वाल, अभिमन्यु ईश्वरन आणि करुण नायर यांचा समावेश राहिल. ऋतुराज गायकवाड आणि इशान किशन यांना मधल्या फळीत फलंदाजीसाठी पाठविले जाईल.
शार्दुल ठाकुर आणि नितीश रे•ाr यापैकी एका वेगवान गोलंदाजाला दुसऱ्या सामन्यात संधी मिळेल. मात्र कॅन्टरबेरीच्या पहिल्या सामन्यात या दोघांनाही संधी देण्यात आली होती. इंग्लंड लायन्स संघामध्ये जोश टंग आणि ख्रिस वोक्स यांच्या वेगवान गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांचा कस लागेल. इंग्लंडचे हे दोन वेगवान गोलंदाज पहिल्या कसोटीत अंतिम 11 खेळाडूंत संधी मिळवतील, असा अंदाज आहे. दरम्यान इंग्लंडचे अनुभवी आणि वेगवान गोलंदाज मार्क वूड आणि आर्चर यांना दुखापतीची समस्या अद्याप भेडसावत असल्याने त्यांना भारताविरुद्धच्या मालिकेला मुकावे लागेल, असा अंदाज आहे. त्याच प्रमाणे अॅटकिनसन पहिल्या कसोटीत खेळण्याची खेळणार नाही. इंडिया अ संघाचे नेतृत्व ईश्वरनकडे असून ध्रुव जुरेल उपकर्णधार राहिल.
भारत अ संघ : अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), जैस्वाल, नायर, जुरेल, नितीश कुमार, शार्दुल ठाकुर, इशान किशन, मानव सुतार, तनुष कोटियन, मुकेश कुमार, आकाश दीप, हर्षित राणा, अन्शुल कंबोज, खलील अहमद, रुतुराज गायकवाड, सर्फराज खान, तुषार देशपांडे, हर्ष दुबे.