दुर्गम भागात हिरवळ वाढविण्यावर भर द्या
जि. पं. सीईओ राहुल शिंदे : सामाजिक वनीकरण विभागाची आढावा बैठक
बेळगाव : 2025-26 या वर्षासाठी सामाजिक वनीकरण विभागाने कार्यक्रम आखताना लोकाभिमुख, समुदाय आणि रचनात्मक कामाची निवड करावी, त्याचबरोबर दुर्गम भागात अधिक रोपांची लागवड करून हिरवळ वाढवावी, अशा सूचना जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांनी केल्या आहेत. जिल्हा पंचायतमध्ये मंगळवारी सामाजिक वनीकरण विभागाची प्रगती आढावा बैठक झाली. यावेळी त्यांनी वनखात्याच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या. शिवाय 2024-25 या वर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध विकासकामांच्या प्रगतीबाबत सविस्तर चर्चा केली. येत्या वर्षात रोप लागवड करताना जागेची योग्य निवड करावी, एका ठिकाणी किमान 5 ते 10 हजार रोपे लावता येतील अशी जागा निवडावी. विशेषत: तलाव, कालवे, नाले या ठिकाणी रोप लागवडीला प्राधान्य द्यावे.
त्यामुळे तलावांचे आणि नाल्यांचे अतिक्रमण कमी होईल. शिवाय परिसरातील पाण्याची पातळीही टिकून राहील. तसेच रोहयो अंतर्गत वनक्षेत्रात नवीन तलावांची उभारणी करावी, अशा सूचनाही सीईओ शिंदे यांनी केल्या. जिल्ह्यात प्रत्येक झोनमध्ये हायटेक नर्सरी, वनऔषधी उद्यान आणि इतर उपक्रम राबविण्यासाठी आराखडा तयार करावा. याबाबतचा अहवाल पुढील बैठकीत सादर करण्याच्या सूचनाही सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना करण्यात आल्या. याप्रसंगी सामाजिक वनीकरण विभागाचे के. एस. गोरवार, चिकोडी विभागाचे केमासिंग राठोड, केंपण्णा व्हन्नूर यांसह सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.