पायाभूत सुविधांसोबत डिजिटल क्रांतीवर भर
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत 7 मोठे निर्णय : रेल्वे अपग्रेडेशन, सेमीकंडक्टर 2.0 ला मंजुरी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी सेमीकंडक्टर निर्मितीपासून ते मोबाईल फोन उत्पादनापर्यंतच्या अनेक मोठ्या निर्णयांना मंजुरी दिली. या निर्णयांमध्ये पायाभूत सुविधा, खते आणि रेल्वे प्रकल्पांशी संबंधित सात मोठ्या निर्णयांचा समावेश आहे. या पॅकेजमध्ये सेमीकंडक्टर 2.0, मोबाईल फोन निर्मिती योजना आणि युरिया-2026 साठी राष्ट्रीय गुंतवणूक धोरण यांचा समावेश आहे. यासाठी एकूण 2 लाख 19 हजार 353 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. पायाभूत विकासाबरोबरच डिजिटल क्रांतीच्या दिशेने उचललेले हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ आणि आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीची बुधवारी बैठक झाली. या बैठकीत सात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सेमीकंडक्टर मिशन 2.0 सोबतच 62,500 कोटी रुपयांच्या मोबाईल कॉरिडॉर प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. उत्तर प्रदेशातील वाराणसीमधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी, वरुणा नदीच्या काठाने एनएच-31 आणि वाराणसी रिंग रोडला जोडणाऱ्या 43.218 किलोमीटर लांबीच्या सहा आणि चार पदरी उन्नत मार्गाच्या (एलिव्हेटेड कॉरिडॉर) बांधकामालाही मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पाचा एकूण अंदाजित खर्च 10,998.32 कोटी रुपये असल्याचे केंद्रीयमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती देताना ते बोलत होते.
वाराणसीमधील सुविधांवर भर
मंत्रिमंडळाचे दोन निर्णय वाराणसीच्या विकासाशी संबंधित आहेत. हे निर्णय प्रमुख पायाभूत सुविधा प्रकल्पांशी संबंधित आहेत. मंत्रिमंडळाने राष्ट्रीय महामार्ग 19 ला वाराणसी रिंगरोडशी जोडणाऱ्या 46.039 किलोमीटर लांबीच्या लिंक कॉरिडॉरच्या बांधकामाला मंजुरी दिली. त्याचबरोबर लिंक कॉरिडॉरच्या विकासालाही मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पात प्रामुख्याने 6/4 लेनच्या उन्नत कॉरिडॉरचा समावेश आहे. यामध्ये मुख्य कॅरेजवे, फ्लायओव्हर्स, लूप्स, रॅम्प्स आणि सर्व्हिस रोड्स यांचा समावेश आहे. हा प्रकल्प एनएचएआयद्वारे हायब्रीड अॅन्युइटी मॉडेल अंतर्गत पूर्ण केला जाईल. वाराणसीमधील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या योजनेचा हा कॉरिडॉर एक महत्त्वाचा भाग आहे. यामुळे एनएच-31 आणि काशी रेल्वे स्टेशन दरम्यान अखंड कनेक्टिव्हिटी मिळेल. तसेच वाराणसी रिंग रोड, वाराणसी विमानतळ, काशी रेल्वेस्टेशन, वाराणसी सिटी रेल्वेस्टेशन, वाराणसी जंक्शन, दीन दयाळ उपाध्याय जंक्शन, रामनगर बंदर, संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठ, वाराणसीचे घाट आणि आसपासच्या चंदौली परिसरापर्यंत पोहोचणे लक्षणीयरीत्या सुधारेल.
सेमकॉन 2.0 मिशनला मंजुरी
मंत्रिमंडळाने इंडिया सेमीकंडक्टर मिशन, किंवा सेमीकॉन 2.0 मिशनच्या दुसऱ्या आवृत्तीला 1.27 लाख कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पासह मंजुरी दिली आहे. चिप उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासोबतच अश्विनी वैष्णव यांनी मोबाईल पीएलआय योजनेच्या विस्ताराची घोषणा केली. यासाठी 62,500 कोटी रुपयांचा निधी राखून ठेवण्यात आला आहे. तसेच मोबाईल फोन उत्पादन योजनेलाही मंजुरी देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे.
नऊ नवीन युरिया प्रकल्प उभारणार
आणखी एक महत्त्वाचा निर्णय भारताला युरियामध्ये आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्देशाने करण्यात आला असून युरियासाठीच्या राष्ट्रीय गुंतवणूक धोरणाला मंजुरी देण्यात आली. याअंतर्गत नऊ नवीन युरिया प्रकल्प उभारले जातील.
दोन नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
रेल्वे पायाभूत सुविधांच्या आघाडीवर मंत्रिमंडळाने दोन प्रकल्पांना मंजुरी दिली. 2,542 कोटी रुपये खर्चाने पारादीप-हरिदासपूर रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण आणि 1,365 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह डांगोआपोसी आणि राजखरसावन दरम्यान चौथ्या रेल्वे मार्गाच्या बांधकामाची घोषणा अश्विनी वैष्णव यांनी केली.
मोबाईल फोन निर्मिती प्रकल्पांबाबत निर्णय
वाराणसीमध्ये एलिव्हेटेड कॉरिडॉर बांधणार
युरियासाठी राष्ट्रीय गुंतवणूक धोरणाची घोषणा
पारादीप-हरिदासपूर रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण
डांगोआपोसी-राजखरसावन चौथी रेल्वेलाईन
रेल्वेसह पायाभूत सुविधा प्रकल्पांनाही मंजुरी