एफएमसीजी निर्देशांकाची घसरण सुरुच
वृत्तसंस्था/मुंबई
भारतीय शेअर बाजारामध्ये एफएमसीजी निर्देशांकाची गुरुवारीही 14 व्या सत्रामध्ये घसरण पहायला मिळाली. या निर्देशांकाने आतापर्यंत सर्वाधिक कालावधीत घसरण अनुभवली आहे. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे 2.7 कोटी रुपये स्वाहा झाले आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पाने करामध्ये सवलत देण्याची घोषणा केल्यानंतर आलेली तेजी एफएमसीजी निर्देशांकाने जास्तकाळ रोखून धरली नाही.
3 फेब्रुवारीपासून घसरण
पहायला गेल्यास 3 फेब्रुवारीपासून एफएमसीजी निर्देशांक सातत्याने घसरणीत राहिला आहे. आतापर्यंत हा निर्देशांक 11 टक्के इतका खाली आला आहे.
आयटीसी सर्वाधिक नुकसानीत
एफएमसीजी क्षेत्रातील कंपन्यांच्या बाजारातील कामगिरीकडे पाहता यामध्ये सर्वाधिक नुकसान सिगरेट बनविणारी कंपनी आयटीसी हिचे झाले आहे. दिग्गज कंपनी आयटीसीचे बाजार भांडवल मूल्य 14 दिवसांमध्ये 77600 कोटी रुपयांनी कमी झाले आहे. याचसोबत आणखी एक एफएमसीजी कंपनी हिंदुस्थान युनिलीव्हरचे बाजार भांडवलमूल्य 64500 कोटी रुपयांनी कमी झाले आहे. सध्याला या कंपनीचे एकूण बाजार भांडवलमूल्य 5.2 लाख कोटी रुपये राहिले आहे.
यांचे मूल्यही घसरणीत
नेस्ले इंडिया आणि वरुण बेवरेजेस यांचे बाजार भांडवलमूल्य अनुक्रमे 12400 कोटी रुपये, 30 हजार कोटी रुपये इतके घटले आहे.
समभागांची कामगिरी
गेल्या 14 दिवसांमध्ये पाहता वरुण बेवरेजेस आणि कोलगेट पॉमोलिव्ह इंडिया यांचे समभाग 16 टक्के इतके घसरणीत होते. रॅडीको खैतान, आयटीसी आणि गोदरेज कंझ्युमर यांच्या समभागात 14 ते 15 टक्के घसरण पहायला मिळाली. डिसेंबर 2024 ला संपलेल्या तिमाहीत छोट्या एफएमसीजी कंपन्यांनी 8 ते 10 टक्के वाढ दर्शविली आहे. ही कामगिरी मोठ्या एफएमसीजी कंपन्यांच्या तुलनेमध्ये अधिक सरस ठरली आहे. या अवधीमध्ये मोठ्या एफएमसीजी कंपन्यांच्या विक्रीमध्ये नाममात्र 0 ते 5 टक्के इतकीच वाढ नोंदविली गेली.