एफएमसीजी कंपन्या किमती वाढवणार
डाबर, हिंदुस्थान युनिलिव्हर, नेस्लेसह इतर कंपन्यांची तयारी : साबण, तेल, बिस्कीटांसह इतर वस्तू महागणार
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
पॅकेजिंग साहित्याच्या वाढत्या किमती त्याचप्रमाणे मध्य आशियातील तणाव या कारणास्तव आगामी काळामध्ये एफएमसीजी कंपन्यांकडून किमतीत वाढ केली जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात डाबर या कंपनीने किमती वाढवल्या असल्याचे स्पष्ट केले आहे.
येणाऱ्या काळात या कंपनीसोबतच हिंदुस्थान युनिलिव्हर व नेस्ले इंडिया या कंपनीकडूनही त्यांच्या उत्पादनांच्या किमती वाढवल्या जातील असे म्हटले जात आहे. घरासाठी आवश्यक असणाऱ्या साबण, तेल, बिस्किट यासारख्या रोजच्या गरजेच्या वस्तू काहीअंशी महाग होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
डाबरने वाढवल्या किमती
आर्थिक वर्ष 2026-27 पहिल्या तिमाहीमध्ये म्हणजे एप्रिल ते जून या कालावधीत किमती वाढणार असल्याचे संकेत डाबर इंडिया यांनी व्यक्त केले आहेत. डाबरने सध्याच्या तिमाहीमध्ये आपल्या वस्तूंच्या किमती जवळपास 4 टक्के इतक्या वाढवल्या आहेत. कच्चा साहित्याच्या वाढत असणाऱ्या किमती हे मुख्य कारण यामागचे सांगितले जात आहे. त्याचप्रमाणे मध्य आशियामध्ये असणारा तणाव, कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये सातत्याने होणारी वाढ व पुरवठ्या संबंधातील आव्हाने या पार्श्वभूमीवर मालवाहतुकीचा खर्च वाढताना दिसत आहे. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे मालवाहतूक खर्चावर, उत्पादनांच्या पॅकेजिंगवर त्याचप्रमाणे केमिकल्सवर दबाव निर्माण होतो आहे.
ग्रामीण भागात मागणी मजबूत
दुसरीकडे ग्रामीण भागामधून वस्तूंच्या मागणीमध्ये सुधारणा दिसून आली आहे. दीर्घकाळानंतर ही परिस्थिती परतली असल्याचे समजते. वाढत्या मागणीचा पुरवठा करण्याची वेळ आली तेव्हा कंपन्यांना कच्च्या मालाच्या संकटाला तोंड द्यावे लागले. खाद्यतेल, दूध आणि पॅकेजिंग साहित्याच्या किमती पुन्हा वाढीच्या दिशेने सरकत आहेत.
मासिक खर्चात वाढ
एफएमसीजी क्षेत्रामध्ये असणाऱ्या हिंदुस्थान युनिलिव्हर, नेस्ले इंडिया, मेरीको, आयटीसी, ब्रिटानिया आणि गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्ट यासारख्या कंपन्यांनीही त्यांच्या उद्योगांमध्ये अडचणी येत असल्याचे मान्य केले आहे. उद्योगातील तज्ञांच्या माहितीनुसार यंदा मान्सूनचे प्रमाण कमी राहिले आणि जागतिक स्थितीमध्ये सुधारणा झाली नाही तर घराच्या मासिक बिलामध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. म्हणजे घरचे मासिक आर्थिक बजेट वाढण्याचे संकेत आहेत.