तावडे हॉटेल-शिवाजीपूल उड्डाणपुलाची घोषणा ‘हवेत’च !
वर्ष झाले तरी डीपीआर तयार होईना : मंजुरी, निधी मिळणे लांबच, महापालिका, नॅशनल हायवे अॅथॉरिटीची एकमेंकाकडे बोट; प्रशासकीय पातळीवरील अनास्थेचा विकासकामांना फटका; वाहतुकीची कोंडी फुटणार कशी
विनोद सावंत कोल्हापूर
शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी, महापुरातही रस्ते सुरू रहावे यासाठी शहरांतर्गत काही रस्त्यांवर उड्डाणपुल होणे आवश्यक आहे. तावडे हॉटेल ते कावळा नाका, दाभोळकर कॉर्नर ते दसरा चौक, दसरा चौक ते शिवाजी पूल, शिये ते कसबा बावडा या चार उड्डाणपुलाच्या उभारण्यासाठी हालचाली सुरू झाल्या होत्या. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यासाठी निधी देण्यासाठी सकारात्मक होते. परंतु प्रशासकीय पातळीवरील अनास्थेमुळे निधी मंजुरी लांबच., वर्ष झाले तरी डीपीआर तयार झालेला नाही. अशीच स्थिती राहिली तर शहरातील वाहतुकीची कोंडी फुटणार कशी आणि कधी? असा प्रश्न आहे.
बास्केटब्रिज भूमिपूजन कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी तावडे हॉटेल ते शिवाजी पुलापर्यंत उड्डाणपूल उभारण्याचा आराखडा महापालिकेने पाठवावा, त्याला मंजुरी देऊ, अशी ग्वाही दिली होती. त्यामुळे 14 फेब्रुवारी 2023 रोजी महापालिकेत नॅशनल हायवे अॅथॉरिटी, सार्वजनिक बांधकाम विभागांची संयुक्त बैठक झाली. त्यानंतर प्रस्तावित उड्डाणपूल परिसराचे सर्व्हेक्षणही केले. या उड्डाणपुलाचा 5 मार्च 2023 रोजी प्रस्ताव डीपीआरसह तयार करण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. परंतु वर्ष झाले तरी डीपीआर तयार नाही.
डीपीआर नेमका रखडला कोणामुळे?
चार उड्डाणपुलचा डीपीआर कोणी करायचा, हा प्रश्न आहे. डीपीआरसाठी आवश्यक मनुष्यबळ, तज्ञ नाहीत. त्यामुळे डीपीआरसह सर्व प्रक्रिया आपल्या कार्यालयाकडूनच राबवावी, असे पत्र महापालिकेने नॅशनल हायवे अॅथॉरिटीला सहा महिन्यांपूर्वी दिले आहे. यावर त्यांच्याकडून कोणतीच कार्यवाही झालेली नाही. त्यांच्याकडून ही जबाबदारी मनपाची असल्याचा दावा होत आहे. डीपीआरला झालेल्या विलंबाबाबत दोन्ही विभाग एकमेंकाकडे बोट दाखवत आहेत.
भूसंपादन झाले असतानाही विलंब का?
प्रशासनाकडून भूसंपादनाचे कारण पुढे केले जात आहे. परंतु आयआरबी कंपनीने रस्ते करताना भूसंपादन केले आहे. यामध्ये प्रस्तावित उड्डाणपुलाचा चार पैकी तीन रस्त्याचा समावेश आहे. या रस्त्यावर उड्डाणपूलास कोणतीच अडचण नाही. तरीही प्रशासकीय पातळीवर ब्रेक का लागतोय, हा संशोधनाचा विषय आहे.
शिये ते कसबा बावडा येथील उड्डाणपुलही बारगळला
पुरावेळी शिये ते कसबा बावडा रस्ता बंद होतो. रस्त्याची उंची 300 मीटरवर घेतल्यास महापुरातही येथील रस्ता सुरू राहू शकतो. येथील उड्डाणपूल प्रस्तावित होता. परंतु याबाबतही वर्षभरात कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत.
विकासकामाच्या आडवा येणारा व्हिलन कोण?
तावडे हॉटेल चौक ते शिवाजी पूल हे अंतर साडेसहा किलोमीटर असून उड्डाणपूलासाठी सुमारे 1 हजार कोटींची गरज आहे. मंत्री गडकरींकडूनही निधीसाठी ग्रीन स्ंिाग्नल मिळाला होता. परंतु प्रशासकीय पातळीवर उदासिनतेमुळे वर्ष झाले तरी प्रस्ताव तयार केला नाही. निधी मिळत असतानाही विकासकामांच्या आडवे येणारा नेमका व्हिलन कोण आहे, हे शोधण्याची वेळ आली आहे.
प्रशासकीय यंत्रणा कोणाच्या इशाऱ्यावर चालते?
विरोधला विरोध म्हणून विकासकामांना खोडा घालण्याचा प्रकार शहराला घातक आहे. कोट्यावधीचा निधी मंजूर होतो. परंतु त्या तुलनेत गतीने कामे होत नाहीत. प्रशासकीय यंत्रणेवर नेमका कोणाचा दबाव आहे का? विकासकामांमध्ये स्पर्धा झाली पाहिजे. याउलट दुसऱ्याने आणलेल्या निधीची कामे होताच कामा नये, अशी वृत्ती असता कामा नये. प्रशासकीय यंत्रणेनेही त्यांना खतपाणी घालू नये. तरच शहरातील प्रश्न सुटणार आहेत.
उड्डाणपुलाची आवश्यकता का?
तावडे हॉटेल ते सीपीआर चौक मार्गावर वाहतुकीची प्रचंड कोंडी होते. मुंबई-पुणे, कर्नाटकातून येणारी बहुतांशी वाहने कोकणात जाणारी असतात. त्यांनाही शहरातून जावे लागते. तावडे हॉटेल ते सीपीआर चौक उड्डाणपुल झाल्यास या वाहनांची वर्दळ कमी होऊन शहरातील वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न निकाली लागेल.