फुलांच्या कुंड्या बनल्या कचराकुंड्या
महापालिकेकडे हस्तांतरानंतर अवकळा, लाखोचा निधी वाया
बेळगाव : स्मार्टसिटी योजनेतून शहर व उपनगरात रस्त्याच्या कडेला कुंडी ठेवून त्यामध्ये आकर्षक फुलांची झाडे लावण्यात आली होती. मात्र, त्यांच्या योग्य देखभालीअभावी कुंड्यांमधील झाडे गायब झाली आहेत. तसेच कुंड्यांचीही दुरवस्था झाली असून यासाठी खर्च केलेला लाखो रुपयांचा निधी वाया गेला असल्याने बेळगावकरातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. स्मार्टसिटी योजनेतून शहरात रस्ते, गटारी, पथदीप, सायकल ट्रॅक यासह इतर कामे करण्यात आली. कामे पूर्ण झाल्यानंतर महापालिकेकडे कामांचे हस्तांतरण करून त्यासाठीचा लागणारा देखभाल निधीही मनपाला देण्यात आला आहे. मात्र, स्मार्टसिटी योजनेतील कामांची देखभाल करण्यात मनपा अपयशी ठरली आहे. त्यातच एल अँड टी कंपनीकडून 24 तास पाणी योजनेसाठी जिकडे तिकडे खोदकाम केले जात असल्याने रस्त्यांची चाळण बनली आहे. सायकल ट्रॅकही उखडून टाकण्यात आले आहेत.
मध्यंतरी महापालिकेकडून दुभाजकावरील झाडांना पाणी देण्यासाठी प्लास्टीकच्या बाटल्यांचा वापर करून ठिबक सिंचन योजना सुरू करण्यात आली होती. मात्र नव्याचे नऊ दिवस या म्हणीप्रमाणे अवघ्या काही दिवसातच ही योजना बंद पडली. महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या दुर्लक्षपणामुळे ठिबक सिंचन योजना बंद पडली आहे. इतकेच नव्हे तर लाखो रुपये खर्च करून विविध ठिकाणी कुंड्यांमध्ये लावण्यात आलेली झाडे गायब झाली आहेत. पण त्याकडे महापालिकेने दुर्लक्ष केले आहे. खरेतर त्यामध्ये पुन्हा नवीन झाडे लावणे आवश्यक आहे. पण मनपाच्या उदासीन भूमिकेमुळे ते होऊ शकत नाही. अलीकडेच केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत मिशनमध्ये चांगला क्रमांक पटकावण्यासाठी नागरिकांकडून मते जाणून घेतली जात आहेत. एकीकडे शहरातील कचरा समस्या गंभीर असतानाच दुसरीकडे मनपाकडून अशा प्रकारे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याने मनपाचे हसे होत आहे.