सावंतवाडी मच्छी मार्केटात सांडपाणी गटारावरील फरश्या तुटलेल्या स्थितीत
पाण्याचा निचरा न झाल्याने अनेक ग्राहक पडले घसरून
सावंतवाडी -
शहरातील मच्छी मार्केट मधील सांडपाण्याचा निचरा करणाऱ्या गटारावरील मजबूत जाळ्यांच्या फरश्या अनेक ठिकाणी तुटलेल्या व उघड्या स्थितीत असल्याने अनेक ग्राहक पाय घसरून पडल्याच्या घटना मंगळवारी घडल्या. यामध्ये वृद्धांसह महिला व लहान मुले यांना किरकोळ दुखापत झाली. या प्रकाराकडे नगरपालिका प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. शहरातील मच्छी मार्केट सर्व सोयींयुक्त उभारलेले आहे. त्यामुळे ग्राहकांची तालुक्यातून मोठी गर्दी येथे असते. मात्र मच्छी मार्केटच्या स्वच्छतेबाबत व देखभालीबाबत प्रशासन गांभीर्य घेत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. मच्छी मार्केटमध्ये मच्छीच्या सांडपाण्याचा निचरा व्हावा यासाठी त्या ठिकाणी गटार बांधून त्यावर मजबूत प्लॅस्टिक जाळ्यांच्या फरश्या बसवण्यात आल्या आहेत. परंतु या फरश्या काही वर्षातच कमकुवत झाल्याने काही ठिकाणी तुटलेल्या स्थितीत तर काही ठिकाणी फरश्या नसल्याने उघड्या स्थितीत गटार आहेत. ग्राहक ज्यवेळी मासे खरेदी करण्यासाठी फिरत असतो त्यावेळी त्या ठिकाणी असलेले माशाचे सांडपाण्यामध्ये पाय घसरला जातो. अशातच खरेदीसाठी आलेले जेष्ठ, महिला वर्ग व त्यांचे लहान मुले यांचा पाय घसरून पडल्याने अनेकांना दुखापतीला सामोरे जावे लागले. याबाबत नगरपालिका प्रशासनालाकळवूनही दखल घेतली जात नाही त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. ही परिस्थिती अशीच राहिल्यास अनेक ग्राहकांना मच्छी मार्केटमध्ये जाणे धोकादायक ठरणार आहे. त्यामुळे प्रशासनाने पाहणी करून तत्काळ उघड्या गटारावर नव्याने मजबूत फरशा बसवाव्यात व सर्व सांडपाण्याचे गटार बंदिस्त करावेत अशी मागणी ग्राहक व मच्छी व्यावसायिकांकडून केली जात आहे.