For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

औषध न लगे मजला

06:57 AM Mar 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
औषध न लगे मजला

औषधेष्वपि सर्वेषु हास्यं श्रेष्ठं वदन्ति ह ।

Advertisement

स्वाधीनं सुलभं चापि आरोग्यानन्दवर्धनम् ।

अर्थ- सर्व औषधांमध्ये हसणे हे औषध श्रेष्ठ आहे असे म्हणतात. ते सोपे; स्वत:च्याच जवळ असते आणि तब्येत सुधारते आणि आनंद वाढवते. हा हा ह़ा

Advertisement

एकदा एका राजाची छोटी मुलगी काही केल्या हसत नव्हती. सारखी दु:खी आणि उदास असायची. राजाने राज्यात दवंडी पेटवली की जो कोणी ह्या मुलीला हसायला लावेल त्याला मी माझे अर्धे राज्य बक्षीस देईन. अशा गोष्टी लहानपणी खूप आवडायच्या. मतीला हसवणारे विदूषक वेगवेगळे नकलाकार किंवा वेगवेगळ्या कृती करून दाखवणारे लोक पाहिले की आपल्याला गंमत वाटायची पण आपल्या अवतीभवतीसुद्धा असे अनेक आनंद नसलेले हजारो व्यक्ती वावरत असतात. अशा वेळेला हे सुभाषित अगदी योग्य वाटतं. आनंद ही खरंतर जगण्याची गुरुकिल्ली. जो माणूस आनंदाने खळखळून असतो त्याचे आरोग्य उत्तम राहते. म्हणून अनेक ठिकाणी हास्य क्लब चालू असलेले आपण पाहतो. आपल्याच हातावर हात देऊन टाळी मारणं, दुसऱ्याच्या हातावर टाळी देणं आणि एकाच वेळेला हसणं आणि टाळ्या देणं हा कार्यक्रम सुरू असतो. बाहेरून पाहणाऱ्याला ती गंमत वाटते परंतु ती प्रत्येकाची गरज असते. कोणी पडलं म्हणून हसणं, कुणाचं वाईट झालं म्हणून हसणं अशा अनेक गोष्टी आपण सर्वत्र पाहत असतो परंतु एखाद्याला आनंदी करून त्या माणसाच्या चेहऱ्यावरती समाधान पाहिल्यानंतर जे हसू आपल्या चेहऱ्यावर येतं तो खरा आनंद. असा आनंद मिळवणारे जगामध्ये अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतके आहेत. आनंदही अंतर्मनाला होणारी गोष्ट आहे ती कशी आणि कोणत्या गोष्टीने होईल हे सांगता येत नाही. म्हणूनच आनंद ही मनाची संकल्पना असते तर सुख हे इंद्रियांसाठी असते. आपण बघतो, आपण खूप जेवण करत असताना भरपूर गोडाचे पदार्थ खात असतो. आपली जीभ आणखीन आणखीन ते पदार्थ मागून घेत असते. परंतु पोटाला मात्र नको नको होत असतं. बिचारं पोट काहीच करू शकत नाही. ठराविक वजन आहे ते पदार्थ पोटात आले की त्याच्यावर ताण आलेला असतो. म्हणूनच सुख हे इंद्रियांना होतं तर आनंद हा अंतर्मनाला. आपण श्रीखंड खाल्ल्यानंतर आपली जीभ आणखीन आणखीन श्रीखंड मागते. ते सुख त्यावेळेस जरी वाटत असलं तरी पुढे ते त्रासदायक ठरतं. वेगवेगळ्या व्याधींच एक निमित्त ठरतं. म्हणूनच ‘मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण’ ते यासाठीच म्हणतात. ज्याचं मन प्रसन्न असेल जो दुसऱ्याच्या मदतीला, दुसऱ्याच्या दु:खांसाठी सतत धावत असेल अशा व्यक्तीचे मन प्रसन्न असतं.

Advertisement

Advertisement
Tags :
×

.