व्हिएतनाममध्ये पूरामुळे हाहाकार
50 हजार घरे पाण्याखाली 41 जणांचा मृत्यू
हनोई:
व्हिएतनाममध्ये अतिवृष्टीनंतर आलेल्या पूरामुळे स्थिती बिघडली आहे. तसेच तेथील काही क्षेत्रांमध्ये भूस्खलनामुळे मोठे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत 41 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर व्हिएतनाममध्ये पूरामुळे सुमारे 51 हजार घरे पाण्याखाली गेली आहेत. तर जवळपास 62 हजार लोकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे लागले आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे मध्य व्हिएतनमामध्ये पूर आला आहे. पूर्ण क्षेत्रात बचावकार्य राबविले जात असून बुडालेल्या घरांच्या छतांवर लोक अडकून पडले आहेत. मागील 3 दिवसांमध्ये अनेक ठिकाणी 150 सेंटीमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. तर कॉफी उत्पादक क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागातच पूर आला आहे. तसेच हा भाग पर्यटनासाठी ओळखला जातो. 6 प्रांतांमध्ये एकूण 41 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अद्याप 9 जण बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात असल्याचे व्हिएतनामच्या पर्यावरण मंत्रालयाने सांगितले आहे. पूरामुळे अनेक रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. तर सुमारे 10 लाख घरांमधील वीजपुरवठा ठप्प झाला आहे.