नेपाळमध्ये पूर, भूस्खलनामुळे 200 बळी
स्थिती भयावह : भारतातही मोठे नुकसान
वृत्तसंस्था/ काठमांडू
नेपाळमध्ये अतिवृष्टीमुळे आलेला पूर आणि भूस्खलनामुळे जीव गमाविणाऱ्या लोकांची संख्या वाढून 200 झाली आहे. तर कमीतकमी 30 लोक अद्याप बेपत्ता आहेत अशी माहिती पोलिसांनी सोमवारी दिली आहे. शुक्रवारपासून सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे पूर आला असून अनेक ठिकाणी भूस्खलन झाल्याने हिमालयीन देशात मोठी हानी झाले आहे. नैसर्गिक आपत्तीदरम्यान नेपाळ सरकारने बचाव, मदत आणि पुनर्वसन प्रयत्नांना वेग देण्याचा निर्णय घेतला आहे.
पूर आणि भूस्खलनानंतर मदतकार्यासाठी सर्व सुरक्षा यंत्रणांना तैनात केले आहे. तर नेपाळ सैन्य, पोलीस आणि सशस्त्र पोलीस दलाच्या जवानांनी आतापर्यंत सुमारे 4,500 लोकांना वाचविले आहे. जखमींवर मोफत उपचार केले असून पूरग्रस्त लोकांना अन्न आणि इतर आपत्कालीन मदतसामग्री प्रदान करण्यात आली आहे.
पुरामुळे वाहून गेले रस्ते
नैसर्गिक आपत्तीनंतर काठमांडूतील लोक अन्न, सुरक्षित पेयजलाच्या टंचाईला तोंड देत आहेत. भूस्खलनामुळे प्रमुख महामार्गांचे नुकसान झाल्याने देशाच्या अन्य जिल्ह्यांमधून तसेच भारतातून होणारा अन्नसामग्रीचा पुरवठा ठप्प झाला आहे. यामुळे अन्नधान्याच्या किमती नेपाळमध्ये वाढल्या आहेत. नेपाळमधील रस्त्यांचे मोठे नुकसान झाल्याने हजारो प्रवासी ठिकठिकाणी अडकून पडले आहेत. वाहतूक पूर्ववत करण्यासाठी महामार्ग दुरुस्तींचे काम हाती घेण्यात आल्याची माहिती नेपाळच्या गृह मंत्रालयाचे प्रवक्ते ऋषिराम तिवारी यांनी दिली आहे.
हवामान बदल कारणीभूत
हवामान बदलामुळे आशियामधील पावसाचे प्रमाण आणि कालावधीत बदल घडून येत आहे. पूराच्या प्रभावातील वृद्धीचे प्रमुख कारण पर्यावरणाच्या स्थितीतील बदल असल्याचे वैज्ञानिकांनी सांगितले आहे. याचबरोबर नेपाळमधील मैदानी भागांमध्ये अनियोजित बांधकामांमुळे पूरसंकटाची तीव्रता वाढली आहे. पूर आणि भूस्खलनामुळे देशाच्या अनेक हिस्स्यांमध्ये जलजीवन कोलमडले आहे.