कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर पुराचे पाणी वाढले ! कोणत्याही क्षणी वाहतूक बंद होण्याची शक्यता
प्रयाग चिखली वार्ताहर
पावसाचा जोर कायम असल्याने पुराच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होत असून मंगळवारी सकाळीच कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर केर्ली गावाजवळील जगबुडी पुल येथे महामार्गावर पुराचे पाणी पसरले आहे. अजूनही पाणी वाढत आहे त्यामुळे या मार्गावरील वाहतूक कोणत्याही क्षणी बंद होणार आहे. सध्या येथील रस्त्यावर सहा इंच पाणी असून त्यातून नागरिक प्रवासी ये-जा करत आहेत.
दरम्यान याच मार्गावरील आंबेवाडी गावाजवळील रेडेडोह ठिकाणी पाणी रस्त्याच्या अगदीच कडेला आले असून आणखी एक फूट पाणी वाढले तरी या ठिकाणीही पुराचे पाणी रस्त्यावर येण्याची शक्यता आहे.
दरम्यान पुराचे पाणी वाढले आणखी दोन फुटाणे वाढली तर प्रयाग चिखली गावाला बेटाचे स्वरूप प्राप्त होण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर थोडा कमी झाला असला तरी पाणी वाढतच आहे त्यामुळे प्रयाग चिखली आंबेवाडी येथून ग्रामस्थांचे स्थलांतर वाढत आहे.
दरम्यान शासकीय पातळीवर पूरप्रवण भागातील लोकांनी सुरक्षित स्थलांतर करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
अलमट्टीतील विसर्गाची चर्चा
राधानगरी धरण भरलेले नाही शिवाय पावसाचा जोर म्हणावा तितका नाही तरी देखील पुराचे पाणी वाढत आहे. त्यामुळे कदाचित अलमट्टीतून विसर्ग कमी झाला की काय? अशी चर्चा पूरग्रस्तांच्या मध्ये चालू असून त्याबाबत जिल्हा प्रशासनाने योग्य ती कार्यवाही सुरू ठेवावी अशी मागणी होत आहे