सिना नदीला पूरधोका; नागरिकांनी स्थलांतर करावे : दिलीप माने
सोलापूर :
सिना नदीतील पाण्याची पातळी धोकादायक स्तरापेक्षा वाढली असून अजून वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या शिवणी, तिर्हे, पाथरी, तेलगाव, नंदूर आदी गावांतील नागरिकांनी पाण्याची वाट न पाहता तात्काळ सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, असे आवाहन माजी आमदार दिलीपराव माने यांनी केले आहे.
स्थलांतरित नागरिकांसाठी बी.एम.आय.टी कॉलेज आणि वळसंगकर प्रशाला येथे निवारा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. “आपली सुरक्षा हीच सर्वोच्च प्राथमिकता आहे, प्रशासन आणि आम्ही पूर्णपणे कटिबद्ध आहोत,” असे दिलीपराव माने यांनी सांगितले.
माजी आमदार माने यांनी सिना नदीकाठची पुरस्थितीची पाहणी केली. यावेळी तहसीलदार निलेश पाटील, गटविकास अधिकारी राजाराम बोंग, डॉ. पृथ्वीराज माने, ग्रामपंचायत पदाधिकारी व इतर संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून, स्थलांतरित नागरिकांना आवश्यक त्या सर्व सुविधा देण्याचे निर्देश दिले. माने यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे व प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.