कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

चिपळुणात 19 तासांनी पूर ओसरला

11:33 AM Aug 21, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

चिपळूण :

Advertisement

गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे मंगळवारी शहरात पूर आला. हा पूर तब्बल 19 तासांनी ओसरला. त्यानंतरही शहरातून वाहणारी वाशिष्ठी व शिवनदी दुथडी भरून वाहत होती. मात्र पावसाने विश्रांती घेतल्याने संकट टळले. पुरामुळे शहरात आलेला 17 टन कचरा उचलून नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी काही तासातच शहर चकाचक केले. त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर आले. व्यापारी आपले साहित्य लावण्यात गुंतले होते. ग्रामीण भागात पडझडीमुळे 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

Advertisement

मंगळवारी मध्यरात्रीपासून वाशिष्ठी व शिवनदीच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली. यामुळे पेठमाप, बाजारपूल, मुरादपूर, वडनाका, चिंचनाका, बाजारपेठेत पाणी घुसल्याने व्यापारी, नागरिकांची तारांबळ उडाली. अंतर्गत रस्तेही पाण्याखाली गेल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. मध्यरात्री 2.30 वाजता शहरातून पुराचे पाणी ओसरले. मात्र बाजारपूल, मच्छीमार्केट भागात बुधवारी दुपारी 12.30 वाजेपर्यंत पाणी होते. त्यानंतर तेही ओसरले.

पुरामुळे शहरात मोठ्या प्रमाणात कचरा वाहून आल्याने मुख्याधिकारी विशाल भोसले, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, आरोग्य निरीक्षक सुजित जाधव, आरोग्य विभाग प्रमुख वैभव निवाते यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी 6 वाजता शहरात सुमारे 150 सफाई कर्मचारी स्वच्छतेच्या कामाला लागले. त्यांनी काही तासातच शहर चकाचक करीत सुमारे 17 टन कचरा जमा केला. तो 8 घंटागाड्यांच्या माध्यमातून उचलून शिवाजीनगर येथील कचरा प्रकल्पात नेण्यात आला. बाजारपूल परिसरासह अन्य भागात व्यावसायिकांनी दुकांनासह परिसराची साफसफाई केली.

शहर परिसरात पूर आला असला तरी शहराचा काही भाग वगळता ग्रामीण भागातील वीजपुरवठा मंगळवारी सुरू ठेवण्यात महावितरणला यश आले होते. त्यामुळे त्यांच्या या कामगिरीचे ग्राहकांनी कौतुक केले आहे. बुधवारी मतेवाडी येथे 11 केव्हीचे वीजखांब पडल्याने शहरात 33 केव्हीच्या वीज वाहिनीत बिघाड झाला. उपक्रेंद्रात ब्रेकर निकामी झाल्याने वीजपुरवठा खंडीत झाला होता. मात्र अधिकारी, कर्मचाऱ्यांनी हे बिघाड दुरुस्त करीत टप्याटप्याने शहराचा वीजपुरवठा सुरळीत केला.

गेल्या 5 दिवसात कळकवणे मंडळात सर्वाधिक 1000 मि. मी पाऊस पडला. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बुधवारी चिपळूण मंडळात 136 मि.मी. खेर्डी 147 मि.मी, सावर्डे 163 मि.मी, वहाळ 156 मि.मी, असुर्डे 159 मि.मी, रामपूर 162 मि.मी, कळकवणे 230 मि.मी, शिरगांव 192 मि.मी, मार्गताम्हाणे 155 मि.मी. असा सरासरी 166.67 मि. मी, तर आतापर्यंत 3137.99 मि.मी पाऊस पडल्याची नोंद तहसीलदार कार्यालयातील मुख्य नियंत्रण कक्षात झाली आहे.

मुसळधार पावसामुळे कळकवणे येथील किशोर रघुनाथ शिंदे यांच्या घराजवळची संरक्षक भिंत कोसळून त्यांचे 30 हजार रुपये, कुशिवडे-भागडेवाडी येथील शंकर बाबू भागडे यांच्या घराच्या पडवीवर झाड पडून 2 हजार 700 रुपये, बोरगाव येथील संतोष यशवंत हळदणकर यांच्या घराची संरक्षण भिंत पडून 4 हजार 500, शिरगांव-धांगडेवाडी येथील सुनंदा आत्माराम होडे यांच्या घरावर झाड पडून सुमारे 13 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याचे सविस्तर पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.

पुराचा फटका एसटी आगारालाही बसला. आगार परिसरात पाणी आल्याने स्थानिकसह मुंबई, पुणे मार्गावरच्या सुमारे 508 एसटी फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. यामुळे आगाराचे साडेसहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसान टाळण्यासाठी आगारातील सर्व एसटी बसेस शिवाजी नगर बसस्थानकात उभ्या करण्यात आल्या होत्या. बुधवारी नेहमीप्रमाणे आगाराचा कारभार सुरू झाल्यानंतर नियोजनाप्रमाणे त्या-त्या मार्गावर एसटी बसेस रवाना झाल्या.

हेळवाक येथे रस्त्यावर पाणी आल्याने कराड मार्ग अद्यापही बंद आहे. याचा फटका व्यापाराला बसला असून घाटमाथ्यावरून येणारी भाजी, अंडी, कोंबड्या आदी वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article