भाटले भागात जलवाहिनी फुटून पूरसदृश स्थिती
अनेकांच्या घरात घुसले पाणी : घरातील साहित्यासह सहा घरांचे मोठे नुकसान
पणजी : राजधानीला इमेजीनेबल स्मार्ट सिटी बनविण्याची सरकारची घिसाडघाई आता लोकांच्या जीवावर बेतू लागली असून ‘तारीख पे तारीख’ देऊनही ही कामे संपता संपत नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तारखा ऐकून लोकांचे कान विटले पण तारखा देऊन स्मार्ट सिटी कंपनीचे तोंड कसे वळत नाही? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. इमेजीन पणजीच्या नावाने स्मार्ट सिटीची कामे करणाऱ्या कंत्राटदारांची मात्र चंगळ झाली असून एकेका भागात तब्बल आठ वेळा खोदणे-बुजविण्याचा खेळ खेळून झाला तरीही कामे संपत नसल्याचे दिसून येत आहे.
वाहिनी फुटून घरांमध्ये पाणी
भाटले भागाला गेल्या काही वर्षांपासून खोदकामांचे जसे ग्रहणच लागले आहे. एखाद्या कामामुळे त्या भागाचा चेहरामोहरा बदलला असता तर ठिक होते. मात्र येथे चित्र उलटे आहे. या स्मार्ट कामांमुळे परिसराची वाताहतच करून टाकली आहे. त्यात भर म्हणून काल रविवारी या भागात एक मोठी जलवाहिनी फुटल्याने भर उन्हाळ्यात लोकांना पूरसदृश स्थितीचा अनुभव घ्यावा लागला. हे पाणी लोकांच्या घरादारांत घुसून त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र ही जलवाहिनी फुटण्याशी आपल्या कामांचा कोणाताही संबंध नसल्याचे स्मार्ट सिटीने म्हटले आहे.
दुसऱ्यांदा घडला प्रकार
या भागात असा प्रकार दुसऱ्यांदा घडलेला आहे. वर्षभरापूर्वी सिवरेज चेंबरचे काम सुरू असताना ‘टायनी टॉटस्’ विद्यालयाजवळ उच्च दाबाची जलवाहिनी फुटली होती. त्यावेळीही लोकांच्या घरात मोठ्या प्रमाणात पाणी घुसून पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. तेथील सखल भागातील घरे तर पूर्णत: पाण्याने वेढली होती. त्यामुळे त्याची प्रचंड नुकसानी झाली होती.
सर्वांची उडाली तारांबळ
रविवारी सकाळी भाटले साईबाबा मंदिर परिसरात ही जलवाहिनी फुटली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाली. उच्च दाबाने आलेले हे पाणी सरळ लोकांच्या घरादारात घुसले. त्याचा फटका थेट तेथील धनलक्ष्मी इमारत परिसरातील घरांनासुद्धा बसला. लोकांना चक्क पाऊलभर पाण्यात राहावे लागले. त्यामुळे त्यांच्या घरातील सामानाचे नुकसान झाले. या प्रकाराबद्दल लोक संताप व्यक्त करत आहेत. भाटले भागात आतापर्यंत चार ते पाच वेळा स्मार्ट सिटीची कामे हाती घेण्यात आली आहेत. तरीही ती पूर्णत्वास येत नाहीत. येथील धनलक्ष्मी इमारत परिसरात रस्ता वारंवार खचत असतो. पावसाळ्यात तर परिस्थिती अधिकच वाईट होत असते. परिणामी अनेकदा डांबरीकरण करूनही त्याचा फायदा होत नसल्याने सहा महिन्यांपूर्वीच या भागातील अर्ध्याअधिक रस्त्याला पेव्हर्स बसविण्यात आले होते. मात्र या भागातील वाहनांची वर्दळ लक्षात घेऊन ते काम रात्रीच्या अंधारात करण्यात आले व त्याचा दर्जा घसरला. या पेव्हर्समय रस्त्यावरून वाहने चालविणे अवघड (धक्केदायक) बनू लागले. त्यातून लोकांच्या तक्रारी वाढल्या व आता हा सर्व खर्च पाण्यात टाकून संपूर्ण रस्त्याचे नव्याने बांधकाम हाती घेण्यात आले आहे.
रस्ता वाहतुकीसाठी बंद
सुमारे 20 दिवसांपूर्वी प्रारंभ करण्यात आलेल्या बांधकामामुळे सध्या हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णत: बंद करण्यात आला आहे. सर्व कामे 31 जानेवारी पर्यंत पूर्ण होतील असे त्यावेळी सांगण्यात आले होते. परंतु ती तारीख उलटून गेली तरी अद्याप बरेच काम पूर्ण होणे बाकी आहे. त्यामुळे आता रस्ता पूर्ण होण्यास आणखी किती दिवस लागतील हे कंत्राटदार तरी सांगू शकेल का, असा सवाल स्थानिक आणि वाहनचालकांमधून विचारला जात आहे.
सहा घरांमध्ये घुसले पाणी
दरम्यान, रविवारी सकाळी सदर पाईपलाईन फुटण्याच्या घटनेची स्थानिक नगरसेवक उदय मडकईकर यांनी पाहणी केली. सहा घरांमध्ये हे पाणी घुसले. पैकी चार घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मडकईकर यांनी या घरमालकांशी चर्चा करून त्यांना आश्वस्त केले. या पाण्यामुळे बशिरा मकंदर, अमजद मकंदर, मंतेश अवताळे आणि फरिदा मकंदर यांच्या घरांची जास्त नुकसानी झाल्याची माहिती मडकईकर यांनी दिली. आल्तीनो येथील आयटीआय जवळील टाकीतून ताळगाव आणि त्यापुढील भागाला या उच्च दाबाच्या वाहिनीतून पाणीपुरवठा करण्यात येतो. आता ती दुऊस्त होईपर्यंत सदर भागात लोकांना पाण्याची टंचाई जाणवणार आहे.