पंजाबमध्ये पूरसंकट तीव्र, बचावकार्याला वेग
नवोदय विद्यालयात अडकून पडले 400 विद्यार्थी : मदत अन् बचावकार्यात सैन्य सामील
वृत्तसंस्था/ गुरदासपूर
मागील अनेक दिवसांपासून होत असलेली अतिवृष्टी आणि हिमाचल तसेच जम्मू-काश्मीरमधून वाहत येणाऱ्या नद्यांना उधाण आल्याने पंजाबच्या अनेक भागांमध्ये पूरसंकट निर्माण झाले आहे. गुरदासपूर जिल्ह्यात जवाहर नवोदय विद्यालयच अचानक पूराच्या तडाख्यात सापडले. पूर्ण परिसर पाण्यात भरून गेला आणि तळमजल्यावरील सर्व वर्गांमध्ये पाणी भरले आहे. हे नवोदय विद्यालय गुरदासपूर येथून सुमारे 12 किलोमीटर अंतरावरील डाबुरी गावात असून तेथे 400 विद्यार्थी आणि 40 कर्मचारी अडकून पडले होते.
या शाळेपर्यंत जाणारे रस्तेही पाण्याखाली गेल्याने बचावकार्य करण्यास अडचणी येत आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री भगवंत मान हे दिनानगर विभागाच्या दौऱ्यावर असल्याने अधिकारी त्यांच्यासोबत व्यग्र असल्यानेही बचावकार्याला विलंब झाल्याचे समोर आल्याने संताप व्यक्त होत आहेत. दिनानगर विभागातच गुरुदासपूर जिल्हा मोडतो.
गुरदासपूरचे उपायुक्त याचे अध्यक्ष म्हणून कामकाज पाहतात. याप्रकरणी प्रशासनाच्या शिथिलतेला पाहून मुलांच्या पालकांमध्ये मोठी नाराजी दिसून आली. पूरामुळे स्थिती खराब होत असताना मुलांना पूर्वीच का बाहेर काढण्यात आले नाही असा प्रश्न पालकांनी विचारला आहे. पूर येणार आणि स्थिती बिघडणार याची तीन दिवसांपासून पूर्वकल्पना असलेल्या जिल्हा प्रशासनाने गुरदासपूर जिल्ह्यातील सर्व शाळांना तीन दिवसांची सुटी जाहीर केली होती.
पंजाबमध्ये बिघडली स्थिती
पंजाबमध्ये 1988 मध्ये देखील मोठा पूर आला होता, सध्या आलेल्या पूराने 1988 ची पातळी देखील ओलांडली असल्याचे बोलले जात आहे. पंजाबमधील अनेक गावे आणि सखल भाग जलमय झाले आहेत. केंद्रीय तसेच राज्याच्या यंत्रणांसोबत सैन्याचे पथकही लोकांना सुरक्षित स्थळी हलवित आहे. हवामान विभागाने राज्यात अतिवृष्टीचा इशारा जारी केल्याने मुख्यमंत्री भगवंत मान यांनी 27-30 ऑगस्टपर्यंत राज्याच्या सर्व शाळा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. पौंग, भाखडा आणि रणजीत सागर धरणांमधून अधिक पाणी सोडण्यात आल्याने पंजाबच्या अनेक जिल्ह्यांमधील गावांची समस्या वाढली आहे, तेथील शेतकऱ्यांना पिकाच्या हानीची भीती सतावू लागली आहे.
या जिल्ह्यांना सर्वाधिक फटका
पठाणकोट, गुरदासपूर, फाजिल्का, कपूरथळा, तरनतारन, फिरोजपूर आणि होशियारपूर या जिल्ह्यांना पूराचा मोठा फटका बसला आहे. पंजाबमध्ये पूरसंकटाला सामोरे जात तत्काळ मदत अन् बचावकार्य सुनिश्चित करण्यासाठी जालंधर येथे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. राज्यात आतापर्यंत अतिवृष्टीमुळे 2 जणांना जीव गमवावा लागला असून 44,899 हेक्टर क्षेत्रातील पीक प्रभावित झाले आहे.