For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नेपाळमध्ये पुन्हा पुराचा अलर्ट

07:00 AM Sep 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
नेपाळमध्ये पुन्हा पुराचा अलर्ट
Advertisement

नद्यांच्या पातळीत वाढ : बळींचा आकडा 1 हजाराच्या पार : चितवनमध्ये सर्वाधिक 321 मृतदेह हस्तगत

Advertisement

वृत्तसंस्था/काठमांडू

नेपाळमध्ये नद्यांची पातळी वाढल्यावर 7 जिल्ह्यांमध्ये पुराचा नवा अलर्ट जारी करण्यात आला आहे. रसुवा, नुवाकोट, धादिंग, गोरखा, तनहूं, नवलपरासी आणि चितवन जिल्ह्यांमध्ये नदीकाठावर वसलेल्या भागांसाठी हा इशारा जारी करण्यात आला आहे. यापूर्वी 26 ऑगस्ट रोजी तिबेटमध्ये हिमखंड तुटल्यावर नेपाळच्या अनेक भागांमध्ये अचानक पूर आणि भूस्खलन झाले होते. या आपत्तीतील बळींचा आकडा आता वाढून 1 हजाराच्या पार पोहोचला आहे. नेपाळमध्ये 987 तर तिबेटमध्ये 16 जणांचा मृत्यू झाला आहे. तर चितवन येथे आतापर्यंत सर्वाधिक 321 मृतदेह हस्तगत झाले आहेत. तर 4400 हून अधिक जण अद्याप बेपत्ता आहेत.

Advertisement

एका मृतदेहावर तीन परिवारांचा दावा

नेपाळमध्ये पुरानंतर मृतदेहांची ओळख पटविणे अवघड ठरले आहे. पोखराच्या एका रुग्णालयात ठेवण्यात आलेल्या एका मृतदेहावर तीन परिवारांनी दावा केला आहे. यामुळे आता त्याची ओळख डीएनए चाचणीद्वारे केली जाणार आहे. मोठ्या संख्येत परिवार आता स्वत:च्या बेपत्ता स्वकीयाची ओळख पटविण्याची डीएनए चाचणीची प्रतीक्षा करत आहेत. काही परिवार छायाचित्रे, कपडे, दागिने, टॅटू आणि शरीरावरील खुणांच्या आधारावर ओळख पटविण्याचा प्रयत्न करत आहेत.

तिबेटमध्ये मदतकार्य जारी

तिबेटमध्ये पूर अन् भूस्खलनाच्या एक आठवड्यानंतरही बचाव अभियान जारी आहे. चीन-नेपाळ सीमेपर्यंत जाणाऱ्या अखेरच्या 1 किमी लांब रस्त्याला पुन्हा जोडण्यासाठी काम सुरू आहे. तीव्र प्रवाह आणि सतत पडणाऱ्या पावसामुळे मदतकार्यात अडथळे निर्माण होत आहेत. प्रशासनाने नवे भूस्खलन आणि हिमखंड तुटण्याचा धोकाही व्यक्त केला आहे. तिबेटमध्ये आतापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला असून 546 जण बेपत्ता आहेत.

अनोळखी मृतदेहांचे सामूहिक दफन

नेपाळमध्ये मृतदेह ठेवण्यासाठीची सुविधा अपुरी पडत असल्याने आणि आरोग्यासंबंधी धोका वाढल्याने अधिकाऱ्यांनी अनोळखी मृतदेहांना सामूहिक स्वरुपात दफन करण्यास सुरुवात केली आहे. नंतर ओळख पटण्याची शक्यता असल्याने प्रत्येक मृतदेहाला एक वेगळा क्रमांक देण्यात आला आहे.

11 हजारांहून अधिक जणांना वाचविले

नेपाळमध्ये पूरप्रभावित भागांमध्ये मदत अन् बचावकार्य जारी आहे. अधिकाऱ्यांनुसार आतापर्यंत 11 हजार लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. बचाव अभियानात नेपाळ सैन्यासमवेत 22 हजारांहून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात आहेत. प्रभावित भागांमध्ये शोध अन् बचाव अभियानात 16 हेलिकॉप्टर्सची मदत घेतली जातेय. नेपाळ सरकारने रसुवा येथील भोटेकाशी नदीमुळे प्रभावित भागांमध्ये 21 दिवसांच्या आत आवश्यक काम पूर्ण करण्यासाठी एक कृतिदल स्थापन करत लोकांचे जीवन लवकरात लवकर सुरळीत करण्याचा प्रयत्न चालविला आहे. कृतिदल रस्ते, पूल, पेयजल, झुलता पूल, दूरसंचार आणि आरोग्य सेवा पुन्हा सुरू करण्याचे काम पाहणार आहे. पुरामुळे सर्वाधिक नुकसान झालेल्या ठिकाणी प्रथम काम केले जाईल.

चिलिमेममध्ये भुयारापर्यंत पोहोचली भारतीय टीम

भारतीय टनेल रेस्क्यू टीम नेपाळी सैन्यासोबत चिलिमे आणि लांगटांगच्या जलविद्युत प्रकल्पांमध्ये शोधमोहीम राबवत आहे. चिलिमेमध्ये प्रतिकूल हवामान आणि अवघड मार्गावर मात करत टीम भुयारापर्यंत पोहोचली असून शोधकार्याला वेग देण्यात आला आहे. लांगटांगमध्ये टीमने भुयाराच्या आत 185 मीटरपर्यंत तपासणी केली आहे. भारताची फॉरेन्सिक आणि टनेल रेस्क्यू टीम्स नेपाळमध्ये शोध अन् बचाव अभियानात सामील झाल्या आहेत.

Advertisement
Tags :

.