फ्लिपकार्टची उबरसोबत हातमिळवणी
आता दररोजच्या राईड्सवर सुपरकॉइन्स होणार उपलब्ध
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
ई-कॉमर्स क्षेत्रातील प्रमुख कंपनी फ्लिपकार्ट आणि राईड-हेलिंग प्लॅटफॉर्म उबरने नुकतीच भागीदारीची घोषणा केली. याअंतर्गत, फ्लिपकार्टचा सुपरकॉइन्स रिवॉर्ड प्रोग्राम उबरच्या मोबिलिटी सर्व्हिसेसमध्ये समाविष्ट केला जाईल. वापरकर्त्यांना दैनंदिन सेवांमध्ये अतिरिक्त लाभ देणे आणि दोन्ही प्लॅटफॉर्मवरील त्यांची सक्रियता वाढवणे हा याचा उद्देश आहे. या उपक्रमांतर्गत, वापरकर्त्याला आता प्रत्येक पात्र उबर राईडवर सुपरकॉइन्स मिळवण्याची संधी निर्माण होणार आहे.
हा उपक्रम सुपरकॉइन्सना एक जीवनशैली लॉयल्टी प्रोग्राम म्हणून प्रोत्साहन देतो, ज्यामुळे वापरकर्त्यांना त्यांच्या दैनंदिन प्रवासादरम्यान रिवॉर्ड्स मिळवता येतात. या निर्णयामुळे भारतात एक व्यापक लॉयल्टी इकोसिस्टम तयार करण्याच्या फ्लिपकार्टच्या दूरदृष्टीला बळकटी मिळते. त्याच वेळी, उबरसोबतची ही भागीदारी दैनंदिन प्रवासाला अतिरिक्त मूल्य प्रदान करते.
सुपरकॉइन्सवर 4 टक्केपर्यंत रक्कम मिळवा
आपले फ्लिपकार्ट आणि उबर अकाउंट लिंक करून, वापरकर्ते प्रत्येक पात्र उबर राइडवर त्यांच्या भाड्याच्या 4 टक्के रक्कम सुपरकॉइन्सच्या स्वरूपात मिळवू शकतात. हे रिवॉर्ड्स प्रति ट्रिप 150 कॉइन्सपर्यंत मर्यादित आहेत, मात्र एकूण कमाईवर कोणतीही मर्यादा नाही. हे सुपरकॉइन्स थेट वापरकर्त्याच्या फ्लिपकार्ट अकाउंटमध्ये जमा केले जातील आणि फ्लिपकार्ट मिनिट्स, क्लिअरट्रिप आणि इतर पार्टनर ऑफर्ससारख्या फ्लिपकार्ट इकोसिस्टमवर रिडीम केले जाऊ शकतात.
उबर इंडियाचे संचालक अर्णब कुमार म्हणतात की, उबरमध्ये आमचे लक्ष वापरकर्त्यांसाठी दैनंदिन मोबिलिटी अधिक सोपी आणि चांगली बनवण्यावर आहे. फ्लिपकार्टसोबतची ही भागीदारी रायडर्सना सोप्या आणि सहज मार्गाने अतिरिक्त लाभ मिळविण्यात मदत करेल.
या भागीदारीमुळे फ्लिपकार्टला आपला सुपरकॉइन्स कार्यक्रम आणखी विस्तारता येईल, तर उबर आपल्या वापरकर्त्यांना अतिरिक्त मूल्य प्रदान करून स्पर्धात्मक फायदा मिळवू शकेल. फ्लिपकार्टचे 50 कोटींहून अधिक वापरकर्ते आहेत आणि ते 80 पेक्षा जास्त श्रेणींमध्ये 15 कोटींहून अधिक उत्पादने उपलब्ध करते. त्याच वेळी, उबर भारतातील 125 पेक्षा जास्त शहरांमध्ये आपली सेवा देत आहे.