कोल्हापूरला ठेंगा, सोलापुरातून गोव्यासाठी विमानसेवा
कोल्हापूर / विनोद सावंत :
दोन वेळा घेतलेल्या ट्रायलवेळी प्रवाशांचा प्रतिसाद उत्स्फुर्त असतानाही कोल्हापूर-गोवा विमानसेवा कायम स्वरूपी सुरू होऊ शकलेली नाही. या उलट नुकत्याच सुरू झालेल्या सोलापूर विमानतळावरून गोवा विमानसेवा सुरू होत आहे. कोल्हापूरला पुन्हा ठेंगा दाखविण्याचे काम यानिमित्ताने झाले असून राजकीय नेत्यांची ताकद कुठे तरी कमी पडली, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
कोल्हापुरातून गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. एसटी, खासगी ट्रॉव्हलर्ससह खासगी वाहनांचा वापर होत आहे. परंतू सध्या कोल्हापुरातून गोव्याला जाण्यासाठीचा गगनबावडा मार्ग बंद आहे. इतरही मार्गावरील रस्ते खराब आहेत. त्यामुळे बाय कार, ट्रॅव्हलर्सने अथवा एसटीने जाताना प्रवाशांना नाहकत्रास सहन करावा लागतो. यामुळे कोल्हापूर-पुणे गोवा विमानसेवा सुरू व्हावी, अशी मागणी अनेक वर्षापासून कोल्हापूरकरांकडून होत आहे. सध्या कोल्हापूर विमानतळ हायटेक झाले आहे. नाईट लॅडींगचीही सेवा सुरू आहे. त्यामुळे कोल्हापुरातून गोव्याला विमानसेवा सुरू करणे सहज शक्य आहे.
कोल्हापूर विमानतळ येथून एका खासगी प्रवासी वाहतूक कंपनीने कोल्हापूर ते गोवा या मार्गावर ट्रायल बेसवर विमानसेवा सुरू केली होती. पहिल्या टप्प्यात 19 व 22 सप्टेंबर या दोन दिवसांसाठी गोव्याला विशेष विमानसेवेचे आयोजन केले होते. दोन्हीवेळा प्रवाशांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. विमानातील सर्व 50 सीट फुल्ल झाल्या होत्या. एका तासातच प्रवासी गोव्यात पोहोचले. खड्ड्यांचा कोणताही त्रासा शिवाय सुलभ प्रवास झाल्याने कायम स्वरूपी ही सेवा सुरू व्हावी, अशी कोल्हापूरकरांची मागणी होती. परंतू ट्रायल यशस्वी होऊन दोन महिन होऊन गेले तरी पुन्हा काही गोव्यासाठी विमानाचे उड्डाण झालेले नाही.
जर प्रतिसाद चांगला मिळाल्याचा दावा कंपनी करत होती. तर मग कोल्हापुरातून ही सेवा नियमित का सुरू केली नाही, असा सवाल आता उपस्थित होत आहे. कंपनीकडून केवळ दोन दिवसांसाठीच ही सेवा सुरू केली होती का असा प्रश्नही निर्माण होत आहे.
सोलापुराने संधी साधली
कोल्हापूर-गोवा विमानसेवा सुरू होण्यासाठी प्रयत्न झाले होते. परंतू येथील राजकीय नेत्यांना यामध्ये यश आले नाही. खासगी कंपनीने कोल्हापूरला ठेंगा दाखवून ही सेवा सोलापुरातून सुरू केली आहे. कोल्हापूरच्या पदरी पुन्हा निराशा आली आहे. विशेष म्हणजे सोलापूर विमानतळ येथून अगोदर बुकींग केल्यास ट्रॅव्हलर्सच्या दरात 689 रूपयांत गोव्याला जात येणार आहे. एका कंपनीने तसे दर पत्रकही जाहीर केले आहे. जर सोलापूरमधून ही सेवा सुरू होत असेल तर कोल्हापूरमधून का ही सेवा सुरू होऊ शकत नाही, असा संतप्त सवालही प्रवाशांतून होत आहे.
कोल्हापूरवर अन्याय केव्हा थांबणार
कोल्हापूरवर शासकीय पातळीवरून वारंवार अन्यायच होत आला आहे. कोल्हापूर-मुंबई वंदेभारतची मागणी केली असताना कोल्हापूर-पुणे वंदेभारत सुरू केली. कोल्हापुरातून मुंबईला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. तरीही सह्याद्री एक्स्प्रेस अद्यपी मुंबईपर्यंत सुरू केलेली नाही. देशातील इतर मंदिराना कोट्यावधींचा निधी दिला जातो. परंतू साडेतीन शक्तीपीठापैकी एक असणाऱ्या अंबाबाई मंदिरातील विकासकामांसाठी केंद्रातून काहीच निधी मिळालेला नाही. केंद्रीय आणि राज्य पातळीवरील नेत्यांना निवडणूकीवेळी कोल्हापूर दिसते. प्रचाराचा नारळ येथून फोडला जातो. मात्र, विकासकामावेळी कोल्हापूरकडे कानडोळा केला जातो, हे यापूवीही अनेक वेळा दिसून आले आहे.
कोल्हापूरमधून गोव्यासाठी विमानसेवा सुरू करण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी केली होती. परंतू सोलापूरातून प्रथम ही सेवा सुरू झाल्याचे समजते. कोल्हापूर-दिल्ली विमानसेवेसाठी काही तांत्रिक बाबी पूर्ण केल्यानंतरच परवानगी मिळू शकणार आहे. यासाठी विमानतळ प्राधिकरण तयारी करत आहे. लोकप्रतिनिधीही यासाठी पाठपुरावा करत आहेत. संबंधित कंपनी यावर अंतिम निर्णय घेणार असून कोल्हापूर-दिल्ली विमानसेवेसाठीही अवधी लागणार आहे.
अनिल शिंदे, संचालक कोल्हापूर विमानतळ प्राधिकरण