फ्रान्समधील भारतीयांच्या विमानाला उड्डाणाची अनुमती
मानव तस्करीच्या संशयातून रोखले होते विमान
वृत्तसंस्था/ पॅरिस
फ्रान्समध्ये रोखण्यात आलेल्या भारतीय प्रवाशांच्या विमानाला उड्डाणाची अनुमती मिळाली आहे. मानवतस्करीच्या संशयापोटी पॅरिसनजीकच्या एका विमानतळावर हे विमान रोखण्यात आले होते. दीर्घ चौकशीनंतर फ्रान्सच्या न्यायालयाने विमान आता पुढील उड्डाणासाठी स्वतंत्र असल्याचे म्हटले आहे. या प्रवाशांना भारतात पाठविले जाणार असल्याची चर्चा आहे. तर भारतीय अधिकाऱ्यांनी यासंबंधी अद्याप पुष्टी दिलेली नाही. 303 प्रवाशांसोबत हे विमान फ्रान्सच्या विमानतळावर 3 दिवसांपर्यंत अडकून पडले होते.
लिजेंड एअरलाइन्सचे एअरबस ए340 विमान शुक्रवारी फ्रान्सच्या वेट्री विमानतळावर इंधन भरण्यासाठी उतरले होते. विमान लँड झाल्यावर विमानतळ कर्मचारी आणि सुरक्षारक्षकांनी त्यावर नियंत्रण मिळविले होते. विमानातून मानव तस्करी होत असल्याची माहिती फ्रान्सला मिळाली होती. याचमुळे ही कारवाई करण्यात आली होती.
फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी वेट्री विमानतळावर या सर्व प्रवाशांना रोखले होते. पोलीस आणि अन्य अधिकाऱ्यांनी या प्रवाशांची तसेच विमानाच्या चालक दलाची दीर्घ चौकशी केली होती. ही चौकशी पूर्ण झाल्यावरच विमानाला उड्डाणाची अनुमती देण्यात आली आहे. आमच्या कंपनीचा मानवतस्करीत कुठल्याही प्रकारे सहभाग नसल्याचा दावा लिजेंड एअरलाइन्सच्या वकील लिलियाना बाकायोको यांनी केला होता. तर भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी देखील घटनास्थळी पोहोचून स्थिती जाणून घेतली होती.
विमानातून प्रवास करणाऱ्या 10 प्रवाशांनी अधिकाऱ्यांकडे आश्रयाची मागणी केली होती. यामुळे फ्रेंच अधिकाऱ्यांना मानवतस्करीचा संशय आला होता. विमानाच्या प्रवाशांमध्ये 11 अल्पवयीनांचा समावेश असून त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय नव्हते असे फ्रेंच अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.